मंगळवार, 26 ऑगस्ट 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. लोकप्रिय
Written By
Last Modified: शुक्रवार, 11 जानेवारी 2019 (09:18 IST)

बाळासाहेब ठाकरेयांचे स्मारक, कोर्टात जनहित याचिका दाखल

Balasaheb Thackeray
दिवंगत शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे स्मारक महापौर बंगल्यात बांधण्यासाठी अनेक कायद्यांचे उल्लंघन करण्यात आले आहे. सीआरझेडच्या नियमांनुसार अस्तित्वात असलेल्या जमीन वापरात बदल करता येत नाही. या नियमाचे उल्लंघन करून महापौर निवासस्थानात बाळासाहेबांचे स्मारक बांधण्यात येत आहे. राज्य सरकारचा हा निर्णय रद्द करावा, अशी मागणी करणारी एक जनहित याचिका उच्च न्यायालयात दाखल केली आहे.
 
बाळासाहेबांचे स्मारक महापौर निवासस्थानात उभारण्यासाठी सीआरझेडसह, हेरिटेज इमारत, हरित क्षेत्राच्या नियमांचेही उल्लंघन करण्यात आले आहे. सर्वोच्च न्यायालयाने एका निकालात स्पष्ट म्हटले आहे की, कोणतेही सरकारी निवासस्थान हे स्मारकासाठी देऊ नये. पण राज्य सरकार सर्वोच्च न्यायालयाच्या याही आदेशाचे उल्लंघन करीत आहे.  संबंधित वैधानिक प्राधिकरणांनी नियमांचे उल्लंघन करून बाळासाहेब ठाकरे यांचे स्मारक महापौर बंगल्यात बांधण्यास परवानगी दिली आहे. त्यामुळे त्या सर्व परवानगी रद्द कराव्यात आणि बाळासाहेब ठाकरेंचे स्मारक महापौर बंगल्यात बांधण्यास मनाई करावी, अशी विनंती करणारी याचिका आरटीआय कार्यकर्ते संतोष दौडकर यांनी दाखल केली आहे.