गुरूवार, 7 नोव्हेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. लोकप्रिय
Written By
Last Modified: बंगळुरू , शुक्रवार, 25 मे 2018 (16:37 IST)

कुमारस्वामी यांनी विश्वासदर्शक ठराव जिंकला

जनता दल (सेक्युलर)चे एच. डी. कुमारस्वामी यांनी कर्नाटकच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर आज विधानसभेत बहुमत सिद्ध करण्यात यशस्वी झाले आहेत. काँग्रेस-जेडीएस आघाडीने विधानसभेत बहुमत सिद्ध केले. दरम्यान, मतदान होण्यापूर्वीच भाजपने सभात्याग करतानाच शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी सोमवारी कर्नाटक बंदची हाक दिली आहे.
 
विधानसभेत विश्वासदर्शक ठराव मांडण्यापूर्वी कुमारस्वामी यांनी विधानसभेत भूमिका स्पष्ट करत भाजपवर जोरदार टीका केली. २००४ प्रमाणेच यावेळीही जनतेने कौल दिला आहे, असे सांगत काँग्रेस-जेडीएस आघाडीला जनतेचा कौल नव्हता या भाजपच्या दाव्यातील हवाच कुमारस्वामी यांनी काढून टाकली. ‘निवडणूक निकालाच्या दिवशी काँग्रेस नेते परमेश्वर यांनी मला फोन केला होता. त्यानंतर काँग्रेस नेते गुलाम नबी आझाद यांनीही मला फोन केला. दोन्ही नेत्यांनी कुणालाच बहुमत मिळत नसल्याचं सांगत आपण सरकार स्थापन केले पाहिजे, असा सल्ला दिला,’असे कुमारस्वामी म्हणाले.
 
‘केवळ मुख्यमंत्री बनण्याची माझी इच्छा होती म्हणून ही आघाडी झालेली नाही. केवळ सत्ता स्थापन करण्यासाठी ही आघाडी झालेली नाही. भाजपशिवाय कर्नाटकात कोणीही सत्ता स्थापन करू शकत नाही, असे पंतप्रधान म्हणाले होते. त्यांची ही भाषा योग्य नव्हती, म्हणून पुढचा घटनाक्रम घडला,’ असे कुमारस्वामी स्पष्ट केले.
 
दरम्यान, कुमारस्वामी यांनी मांडलेल्या विश्वासदर्शक ठरावावर मतदान होण्यापूर्वीच भाजपने सभात्याग केला. कुमारस्वामी सरकारने शेतकऱ्यांची कर्जमाफी केली नाही तर सोमवारपासून राज्यव्यापी आंदोलन करण्यात येईल, असा इशारा भाजप नेते येडीयुरप्पा यांनी यावेळी दिला. तसेच सोमवारी कर्नाटक बंदची हाकही त्यांनी दिली.