शुक्रवार, 26 एप्रिल 2024
  1. वृत्त-जगत
  2. »
  3. लोकसभा निवडणूक 2014
  4. »
  5. निवडणूक बातम्या
Written By WD|
Last Modified: मुंबई , शुक्रवार, 7 मार्च 2014 (11:34 IST)

राज ठाकरेंची तिसरी आघाडी

शेतकरी कामगार पक्षाचे सरचिटणीस भाई जयंत पाटील, जनसुराज्य पक्षाचे नेते विनय कोरे हे अचानक राज ठाकरेंच्या भेटीसाठी त्यांच्या दादरच्या निवासस्थानी दाखल झाल्यामुळे राजकीय वतरुळात एकच खळबळ उडाली. विधानपरिषदेच्या निवडणुकीत मनसेच्या मदतीने अपक्ष व लहान पक्षांचा स्वतंत्र उमेदवार उभा करण्याचा या नेत्यांचा प्रयत्न असून महाराष्ट्राच्या राजकारणात येणार्‍या   काळात प्रभावी तिसरी आघाडी उभी करण्याचा प्रयत्न सुरू असल्याचे कोरे व पाटील यांनी स्पष्ट केले. 
 
मात्र त्याचवेळी महाराष्ट्र नवनिर्माण सेना लोकसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरणार का?, राज ठाकरेंच्या मनात नेमके चाललेय तरी काय? ते आपले शिलेदार लोकसभेच्या ङ्कैदानात उतरवणार का? नितीन गडकरींच्या ऑफरचे काय करणार?, इंजिन कुठे-कुठे धावणार? याबाबत आधीच संभ्रमात असलेले मनसैनिक अधिकच गोंधळात पडलेत. कारण, महायुतीची दारे बंद झाल्यानंतर ‘राजसाहेब’ आता तिसर्‍या आघाडीचा पर्यायही अजमावून पाहात असल्याचे संकेत मिळाले आहेत.
 
जनसुराज्य पक्षाचे आमदार विनय कोरे, शेकापचे नेते जयंत पाटील आणि नाशिकचे शिक्षक आमदार अपूर्व हिरे यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची भेट घेतली. हे त्रिकूट एकत्र ‘कृष्णकुंज’वर आल्याचे पाहून सगळ्यांच्याच भुवया उंचावल्या. छोटय़ा-छोटय़ा पक्षांना सोबत घेऊन तिसर्‍या आघाडीची मोट बांधण्याचा विचार राज यांच्या डोक्यात घोळतोय की काय, अशी शंका राजकीय जाणकारांना आली. या शक्यतेवर विनय कोरे यांनी बैठकीनंतर शिक्कामोर्तब केले. कोरे व पाटील यांनी असे संकेत दिले की विधानसभेमधून विधानपरिषदेत निवडून देण्याच्या नऊ जागांच्या निवडणुका आता बिनविरोध होणार नाहीत. एक दहावा उमेदवार आता रिंगणात उतरणार आहे. 
 
काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडी आणि महायुती वगळता महाराष्ट्रातील अन्य पक्ष एकत्र येऊन तिसर्‍या आघाडीसारखा प्रयोग करता येऊ शकतो का, याचा आढावा घेण्यासाठी राज ठाकरेंची भेट घेतल्याचे विनय कोरे यांनी प्रसारमाध्यमांना सांगितले. अर्थात, या बैठकीत या संदर्भात अगदीच प्राथमिक चर्चा झाल्याचेही त्यांनी नमूद केले. तिसरी आघाडी स्थापन झाल्यास त्यात छोटे पक्ष नक्कीच सहभागी होतील, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला आहे. त्यामुळे कोरे आणि जयंत पाटील यांच्या डोक्यात हे समीकरण जवळपास पक्के असल्याचे दिसते. ते राज यांना कितपत पटते आणि राज्यातील जनतेला खरोखरच तिसरा पर्याय मिळतो का, हे लवकरच स्पष्ट होईल. दरम्यान, येत्या 9 तारखेला होणार्‍या मनसेच्या मेळाव्यात राज ठाकरे काय बोलतात, नितीन गडकरींच्या ऑफरबद्दल काही खुलासा करतात का, शिवसेनेने केलेल्या टिप्पणीला प्रत्युत्तर देतात का, याबद्दल मनसैनिकांमध्ये उत्सुकता आहे. तेव्हाच ते तिसर्‍या आघाडीबाबतही आपली भूमिका स्पष्ट करू शकतात. त्यामुळे राज यांचे मेळाव्यातील भाषण अनेक प्रश्नांची उत्तरे देणारेच ठरणार आहे.