बुधवार, 8 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. अर्थजगत
  3. महाराष्ट्र बजट
Written By
Last Modified: मंगळवार, 8 मार्च 2022 (20:34 IST)

फडणवीसकडून 125 तासांचे व्हीडिओ जारी, ठाकरे सरकारवर भाजप नेत्यांना गोवल्याचा आरोप

सरकारी वकिलाच्या माध्यमातून महाविकास आघाडी सरकार विरोधी पक्षातील नेत्यांना लक्ष्य करत आहे, असा आरोप माजी मुख्यमंत्री आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे. हा आरोप करताना त्यांनी 125 तासांच्या स्टिंग ऑपरेशनचे फुटेज विधानसभेत जमा केले आहे.
 
महाविकास आघाडी सरकारमधील बड्या नेत्यांच्या सांगण्यावरुन हे काम होत असल्याचं फडणवीस म्हणाले.
 
नेमकं प्रकरण काय आहे?
महाविकास आघाडीचे अनेक नेते एका सरकारी वकिलाच्या माध्यमातून भाजपाच्या अनेक नेत्यांचा सूड उगविण्याचं षडयंत्र रचत आहेत, साक्षीदारापासून ते पुराव्यांपर्यंत सारे कसे मॅनेज केले जाते आहे, असा आरोप देवेंद्र फडणवीस यांनी आज विधानसभेत केला आहे. त्यासाठी त्यांनी एक स्टिंग ऑपरेशन सभागृहात सादर केलं.
"हा महाविकास आघाडीचा महाकत्तलखाना आहे आणि सरकारी वकील अ‍ॅड. प्रवीण चव्हाण यांच्यामार्फत अनेक महानायक हा खेळ खेळत आहे," असा आरोप भाजपने केला आहे.
 
सुमारे 125 तासांच्या या स्टिंगमधील महत्त्वाचा भाग 29 वेगवेगळ्या पेनड्राईव्हच्या माध्यमांतून फडणवीस यानी सादर केला. भाजप नेते गिरीश महाजन यांच्याविरोधात खोटं कुंभाड रचून एकूण 28 लोकांवर कसा एफआयआर दाखल करण्यात आला, याचा संपूर्ण लेखाजोखा त्यात असल्याचा दावा, फडणवीस यांनी केला आहे.
 
"पडद्याआडून कोण कोण मोठे नेते कसे खेळ करीत आहेत, हेही या स्टिंग ऑपरेशनमधून पुरतं स्पष्ट होतं आहे. या प्रकरणातील संपूर्ण एफआयआर या वकिलांनीच तयार करून दिला असून, रेडच्या वेळी संपूर्ण बारकाईने नियोजन त्यांनीच केले आहे," असा गंभीर आरोप फडणवीस यांनी केला आहे.
 
"ड्रग्जच्या व्यापाराचा उल्लेख करून मोक्का लावायला कसा सांगितले, त्यातून शासन पातळीवर कशा बैठका झाल्या, त्यात मुख्यमंत्र्यांपासून ते पोलीस आयुक्त, पोलीस महासंचालक कसे उपस्थित होते, याचा संपूर्ण उलगडा या वकिलांनी केला आहे. प्रकरण निगेटिव्ह असताना ते आपण कसे पॉझिटिव्ह केले, याची संपूर्ण कथा ते यातून सांगताना दिसत आहे," असं भाजपने आपल्या प्रसिद्धिपत्रकात म्हटलं आहे.
 
या स्टिंग ऑपरेशमध्ये माजी आमदार अनिल गोटे आणि सरकारी वकील प्रविण चव्हाण एकमेकांशी चर्चा करत असल्याचं दिसत आहे.
 
शरद पवार देखील सामील?
शरद पवार यांना आपल्याला संपवून टाकायचे आहे, असं देवेंद्र फडणवीस विधानसभेत म्हणाले.
 
भाजपच्या प्रसिद्धिपत्रकात म्हटले आहे की, "पवार साहेबांना कसे देवेंद्र फडणवीस आणि भाजपाच्या इतर नेत्यांना संपवायचे आहे, त्यासाठी कोणते निर्देश त्यांना प्राप्त झाले आहेत, हे सर्व करण्यासाठी मुंबईच्या पोलीस आयुक्तपदी संजय पांडे यांना कसे बसविण्यात आलं. त्यासाठी त्यांनी कशी कबुली दिली, याचे संपूर्ण तपशील त्यांनी विस्तृतपणे सांगितले आहेत. मिडियाला कोणत्या बातम्या लीक करायच्या, आधीच ठेवलेल्या पुराव्यांचे चित्रीकरण कसं करायला लावायचं, याचेही तपशील त्यात आहेत."
 
कोणत्या नेत्यांना लक्ष्य करण्यात आले?
भाजपच्या दाव्यानुसार, "देवेंद्र फडणवीस, चंद्रकांत पाटील, गिरीश महाजन, जयकुमार रावल, सुभाष देशमुख, सुधीर मुनगंटीवार, चंद्रशेखर बावनकुळे इत्यादी नेते कसे टार्गेटवर आहेत आणि त्यांना कसे-कसे संपविण्यात येणार आहे, त्यातून कुणाचे काय लाभ होणार आहेत, याचेही तपशील यात आहेत."
 
काँग्रेसने फेटाळले आरोप
भाजपने इक्बाल मिर्चीकडून पक्षनिधी घेतला होता. त्यावर भाजपचं म्हणणं काय आहे. उद्या गृहमंत्री याबाबत निवेदन करतील. तेव्हा खरी परिस्थिती समोर येईल. तेव्हा मी त्यावर प्रतिक्रिया देईल," असं काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी म्हटलंय.
देवेंद्र फडणवीस यांनी माझं नाव घेतलं म्हणून मी आभारी आहे, अशी प्रतिक्रिया माजी आमदार अनिल गोटे यांनी दिली आहे.
 
माझी एक केस पुण्याच्या कोर्टात सुरू आहे. मला त्याठिकाणी चांगला वकील लावायचा होता, चव्हाण वकील सुरेश जैन यांच्या केसमध्ये आमच्या धुळ्याला सातत्याने येत होते. त्यामुळे त्यांना भेटावं आणि त्यांची मदत घ्यावी असं मला वाटलं. पण हाच केंद्रीय सत्तेचा दुरूपयोग आहे, अशी प्रतिक्रिया अनिल गोटे यांनी दिली आहे.
 
या स्टिंग ऑपरेशनवरून स्पष्ट होतं की रश्मी शुक्लांचं प्रकरण खरं आहे. त्यांनीच करायला लावलं रेकॉर्डिग. हे व्हीडिओ त्यांनी मॅन्युपुलेट केले आहेत, असा आरोप अनिल गोटे यांनी केला आहे.
 
चौकशीसाठी तयार - अॅड. प्रवीण चव्हाण
या प्रकरणात काहीच तथ्य नाही. या प्रकरणात चौकशी झाली तरी माझी काही हरकत नाही, अशी प्रतिक्रिया सरकारी वकील प्रवीण चव्हाण यांनी दिली आहे. झी 24 तास वृत्तवाहिनीशी बोलताना त्यांनी त्यांची भूमिका स्पष्ट केली आहे..
 
"या प्रकरणात आवाज कुणाचा आहे हे चेक करावं लागले, हे मॅन्युप्युलेटेड व्हीडिओ आहेत. वकिल असल्यामुळे लोक माझ्या ऑफिसला येत असतात. अनील गोटेंची एक केस पुण्यात सुरू आहे. त्यासाठी त्यांना सल्ला हवा होता. पण माझ्याकडे वेळ नसल्याचं मी त्यांना सांगितलं," असं चव्हाण यांनी स्पष्ट केलं आहे.
 
अनिल देशमुखांनासुद्धा कधीच भेटलो नसल्याचा दावा वकील चव्हाण यांनी केला आहे.