शुक्रवार, 27 डिसेंबर 2024
  1. मनोरंजन
  2. भटकंती
  3. माझा महाराष्ट्र
Written By

Rangana Fort रांगणा किल्ला

rangana killa
Rangana Fort  19 जुलै 1470, बहामनी सामाज्याचा वजीर महमूद गवान आपलं प्रचंड सैन्य घेऊन दक्षिण कोकणात उतरला होता. उद्देश होता रांगणा किल्लचा ताबा! सैन्याचा मुख्य तळ कोल्हापूर या ठिकाणी ठेवून बहामनी सैन्यानं रांगण्यावर हल्ला केला. पण रांगण्याचा  खपलाही पडण्याचा आधीच आलेल्या पावसामुळं लढाई थांबवून सैन्यास परतावं लागलं. महमूद गवाननं आपल्या पत्रात म्हटलं आहे की, ‘केवळ शौर्याने आपण हा भाग जिंकून घेऊ हा विचार व्यर्थ आहे.’ 19 जुलै 1470 ला ‘रांगणा’ हा बहामनी सत्तेकडे गेला खरा, पण तो तहामुळं, जिंकल्यानं नव्हे! आपला मित्र शमसोद्दिन बारी याला महमूद गवान कळवतो की, ‘संगमेश्वराच्या राजाचे दूत बादशहा आणि आमिर उमराव यांच्यापाशी   पोहोचले होते. म्हणून मी पुढील अटींवर तह करण्याची तयारी दाखवली. रांगण्याचा  किल्ला हवाली करावा. 12 लाखांची संपत्ती आणि जिन्नस दाखल करावे. आणि जखुरायच्या मुलाने दरबारात यावे’. 12 व्या शतकात उभ्या केलेल्या या बलदंड रांगणा किल्ल्याची उभारणी राणा भोज यानं केलेली असली तरीही 15 व्या शतकात हा किल्ला संगमेश्वराचा राजा जखुराय याच्या ताब्यात होता. या राजाचा मुसलमानांना त्रास होत असे. दरवर्षी हजारो मुसलमान व्यापारी आणि प्रवासी या राजाच्या कारवायास बळी पडतं. यामुळं बहामनी साम्राज्याचा वजीर महमूद गवान यानं हा किल्ला तहातून काबीज केला.
 
रांगणा! सह्याद्रीच्या मुख्य धारेशी लहान सोंडेनं जोडलेला असला तरी आकार विस्तीर्ण आहे. गडासमोरचा बुरूज भव्यतेमुळं लक्षवेधक आहे. बुरूजाच्या डाव बाजूनं वाट पुढं जाते. हा रस्ता डाव हातास खोल दरी आणि उजव हातास बुरूज असा आहे. रांगण्याचा  पहिला दरवाजा पडलेला असून काही अंतरावर दुसरा दरवाजा आहे. उजव्या बाजूस एक भिंत असून या भिंतीस असलेल्या लहान दरवाजतून प्रवेश केल्यानंतर निंबाळकर बावडी लागते. तटाजवळ आल्यानंतर एक चोर दरवाजा दिसतो. चांगल्या स्थितीत असलेल्या  तिसर्‍या दरवाजतून पुढे आल्यावर उजव्या हातास पाण्यानं भरगच्च तलाव व महादेवाचे भग्न मंदिर दिसतं. तलावाजवळ उजव्या बाजूस तटाच्या कडेला कोकण दरवाजा आहे. रांगणाई मंदिराच्या उजव्या बाजूस भग्न झालेले हनुमान मंदिर आहे. समोर दीपमाळ आणि डाव्या बाजूस बारव. तटाकडेनं चौथरे, मंदिरांचे अवशेष दिसतात.
 
सन 1658! सावंतवाडीचा लखम सावंत! होता तरी मराठी, पण शिवरायांच्या विरोधातच. विजापूरकरांचा सरदार रूस्तुम जमन यानं हा किल्ला लखम सावंताकडून घेतला खरा. पण त्यावर आदिलशाही निशाण लावण्याऐवजी 1666 मध्ये शिवरायांचा कोकणातील अधिकारी राहुजी पंडित याच्या स्वाधीन केला. त्यामुळं चिडलेल्या अदिलशाहानं रूस्तुम  जमान व त्याच्या सहकार्‍यांचा वध करण्याचा हुकूम दिला. पण रूस्तुम जमानच्या   दरबारातील सहानभूतीदारांनी अदिलशहास हा हुकूम रद्द करण्यास लावला. 14 एप्रिल ते 12 मे 1667 अदिलशाही सैन्यानं रांगण्यास वेढा घातला आणि आश्चर्य! अदिलशहातर्फे  लढण्यास व्यंकोची होता. शिवरायांचा सावत्र भाऊ. स्वत: शिवरायांनी येऊन हा वेढा मोडून काढला आणि गडावर आले. अदिलशहानं रांगण्याविरोधात उघडलेल्या मोहिमेबद्दल सभासद लिहितो की, ‘रांगणा किल्ला राजियांचा होता. त्यास विजापूरहून रूस्तुम जमान वजीर सात आठ हजार लष्कर घेऊन गडास वेढा घातला. ते वक्ती गडकरी यांनी थोर भांडण केले व राजियांनी लष्कर पाठवून उपराळा करून रूस्तुम जमान मारून चालविला. आणि गड राहिला. रूस्तुम जमान नामोहरम झाल्यावर बहलोलखान वजीर विजापूरहून बारा हजार जमाव स्वार घेऊन रांगणियासी वेढा घातला. गडकरी यांनी बहुत मारामारी केली. व राजियांनीही वाचवून पळून गेला. गड सुरक्षित राहिला.’ रांगणा किल्ल्यानं  स्वराज्याच्या कुलमुखतरांना जीवाभावानं साथ दिली. इ.स. 1700 मध्ये राजारामाचा मुक्काम रांगण्यावर होता. 1706 मध्ये राणी ताराबाई व त्यांच्या परिवाराला धरण्यासाठी  रांगणा घेण्याचा मोगलांचा प्रयत्न होता. औरंगजेबाने मराठय़ांचे अनेक किल्ले जिंकले. रांगण्याजवळचे सामाननगड, भूधरगड हेही घेतले. परंतु रांगण्यानं त्यास दाखवून दिलं की त्याच्या इच्छा आणि महत्त्वाकांक्षेपेक्षा गडांची मजबूती अधिक आहे.
 
डॉ. नभा काकडे