शुक्रवार, 29 मार्च 2024
  1. मनोरंजन
  2. भटकंती
  3. माझा महाराष्ट्र
Written By

श्री दत्तक्षेत्र कडगंची

औदुंबर, नृसिंहवाडी, गाणगापूर अशी पवित्र दत्तस्थाने सगळ्यांनाच परिचित आहेत, पण त्याशिवायही अशी बरीच दत्त स्थाने आहेत, जी अपरिचित आहेत. देशभरातील अशा दत्तस्थानांचा परिचय...
 
संपूर्ण देशामध्ये शेकडो श्रीदत्त क्षेत्रे आहेत आणि गावागावांत एखादे दत्त मंदिर असल्याचे आपल्याला आढळते. तरीही काही प्रमुख श्रीदत्त क्षेत्रे प्रसिद्ध आहेत. तेथील स्थानमाहात्म्यामुळे ही दत्त क्षेत्रे नावारूपाला आली आहेत. त्यातील श्रीक्षेत्र माहूर, औदुंबर, नृसिंहवाडी, गाणगापूर, अक्कलकोट, गिरनार, माणिकनगर, गरुडेश्वर इ. क्षेत्रे परिचित आहेत. मात्र, काही प्रमुख दत्त क्षेत्रे सर्वसामान्यांना अजूनही अपरिचित आहेत. उदा. कुरवपूर, कडगंची, मुरगोड, कारंजा, पीठापूर, माणगाव, बाळेकुंद्री, बसवकल्याण, नारेश्वर, अमरापूर, कुडुत्री, शंकरमहाराज समाधी मंदिर, पैजारवाडी, लाडचिंचोळी, तिलकवाडा, अनसूया, झिरी, शिरोळ, लातूर, मंथनगुडी, भाटगाव, भालोद इ.
कर्नाटक राज्यातील गुलबर्गा जिल्ह्यातील आळंद-गुलबर्गा मार्गावर असलेलं परमपावन स्थान कडगंची. सायंदेव हे श्री नृसिंहसरस्वती यांचे प्रिय आणि सर्वश्रेष्ठ परमभक्त होते.
 
श्री सायंदेवांच्या कडगंचीतील मूळ वाड्याच्या जागी आज एक सुंदर देऊळ उभारलं आहे आणि आत भगवान श्रीदत्तात्रेयांची काळ्या पाषाणातील नितांत सुंदर मूर्ती, करवीर पिठाच्या श्री शंकराचार्यांनी 25 फेब्रुवारी 2002 मध्ये स्थापन केलेली आहे. कर्नाटकातील गदग शहरातील एका मूर्तीकारानं ही मूर्ती घडवली आहे. ‘ही एवढी सुंदर मूर्ती श्रीदत्तप्रभूंनीच माझ्याकडून करून घेतली आहे’, अशी त्याची श्रद्धा आहे. मूर्ती घडवतानाही त्याच्याकडून केवळ गुरुवारीच काम घडत असे.
 
कडगंचीचे सायंदेव दत्त संस्थान म्हणजेच श्री दत्तगुरूंच्या अस्तित्त्वाची पुण्यभूमी होय. येथील दत्तमूर्ती इतरत्र कोठेही नाही. कडगंचीस जिर्णोद्धाराचे व नवीन बांधकामही चालू आहे.
श्रीनृसिंहसरस्वती महाराजांचे चार पट्टशिष्य होते, असे सांगितले जाते. अवतार समाप्तीच्या वेळी श्रीशैल्यम येथे पाताळगंगेजवळही हे चौघे शिष्य होते. श्री नृसिंह सरस्वती स्वामींनी कर्दळीवनामध्ये गुप्त झाल्यावर जी चार शेवंतीची फुले पाठवली ती या चार शिष्यांना मिळाली असे मानले जाते. हे चौघे जण म्हणजे श्रीसायंदेव, श्रीनंदिनामा, श्रीनरहरी आणि श्रीसिद्धमुनी हे होत. यातील श्रीसायंदेव हे कडगंची या गावचे. श्री सायंदेव यांचे आडनाव साखरे हे होते.
 
श्रीगुरुचरित्र या दत्तभक्तांसाठी आणि वेदांप्रमाणे पवित्र असणाऱ्या महत्त्वाच्या ग्रंथाचे लिखाण कडगंची या ठिकाणी झाले. त्यामुळे याचे स्थानमाहात्म्य अपरंपार आहे.
 
गुरुचरित्र या ग्रंथाचे वाचन केल्याने लाखो व्यक्तींना अनुभूती आलेल्या आहेत. अशी श्रद्धा आहे की, प्रापंचिक अडचणी, अनेक प्रकारच्या व्याधी, आजार आणि संकटातून अनेकांची स्वामींनी सुटका केली आहे. त्यांच्यावर श्रीदत्तात्रेयांची कृपा झालेली आहे. अशा या ग्रंथाची रचना जेथे झाली, ते अत्यंत पवित्र असे ठिकाण म्हणजे श्रीक्षेत्र कडगंची हे आहे. म्हणूनच याला श्रीदत्तगुरूंच्या चिरंतन अस्तित्वाची पुण्यभूमी असेही म्हणता येईल. या मंदिराशेजारीच एक गुहा असून त्या ठिकाणी गुरुचरित्राचे लिखाण झाले होते. या ठिकाणी नि:शुल्क भक्त निवास आणि भोजन व्यवस्था उपलब्ध आहे. ज्या ठिकाणी श्रीगुरुचरित्राचे लिखाण झाले तिथे त्याचे पारायण करणे हा एक वेगळाच आनंद आहे. 
 
कडगंचीस कसे जावे?
गाणगापूर ते रेल्वे स्टेशन 22 कि. मी. अंतर आहे. पुढे गाणगापूर रेल्वे स्टेशनपासून 30 कि. मी. अंतरावर कडगंची हे पवित्र स्थान आहे.
गुलबर्ग्यापासून 23 कि.मी. तर अक्कलकोटपासून 40 कि. मी. अंतरावर आहे.
अक्कलकोटहून वागदारीला जावे. पुढे सारसंबा रस्त्याने गेल्यास आळंद चेकपोस्ट असून उजव्या बाजूस गुलबर्गा रस्ता आहे. 
या ठिकाणी नि:शुल्क भक्त निवास आणि भोजन व्यवस्था उपलब्ध आहे.