Last Modified: सोमवार, 12 ऑक्टोबर 2009 (17:26 IST)
कॉंग्रेस उमेदवार वडेट्टीवारांना हद्दपारीची नोटीस
नागपूर- निवडणूक प्रचार संपल्यानंतर निवडणूक आयोगाने काल सर्व बाहेरच्या कार्यकर्त्यांना संबंधित मतदारसंघ सोडून जाण्याचे आदेश दिले होते. सर्व कार्यकर्त्यांनी आपापल्या मतदारसंघात जावे, हा त्यामागचा आशय होता. पण, त्याचवेळी आयोगाने चिमूर मतदारसंघातील काँग्रेसचे उमेदवार विजय वडेट्टीवार यांना मात्र जिल्हा सोडून जाण्याचे आदेश का देण्यात येऊ नये, अशी विचारणा करणारी नोटीस बजावली असल्याने चंद्रपूर जिल्ह्यात एकच खळबळ उडाली आहे.
विशेष म्हणजे, आयोगाने वडेट्टीवार यांच्यासोबतच आणखी २३ जणांवर हद्दपारीची नोटीस बजावली आहे. वडेट्टीवार यांनी निवडणूक प्रचाराच्या काळात वारंवार आचारसंहितेचे उल्लंघन केले आहे. याशिवाय, त्यांच्याविरुद्ध तीन गुन्हेही दाखल झाले आहेत. या आधारावर आयोगाने उपरोक्त नोटीस बजावली आहे.
चिमूर पोलिस ठाण्याचे निरीक्षक पवनीकर यांनीच आयोगाला याबाबतची शिफारस केली होती. त्यानंतर वरोड्याचे उपविभागीय अधिकारी काळे यांनी ही नोटीच बजावली. दरम्यान, यावर आपली प्रतिक्रिया देताना वडेट्टीवार यांनी सांगितले की, जुन्या मतभेदांमधूनच पोलिस प्रशासन माझ्याविरुद्धची जुनी प्रकरणे हुडकून काढत आहेत.