शुक्रवार, 22 नोव्हेंबर 2024
  1. धर्म
  2. सण-उत्सव
  3. मकरसंक्रांत
Written By
Last Modified: सोमवार, 15 जानेवारी 2024 (11:11 IST)

मकरसंक्रांत : 'संक्रांत आली' म्हणजे 'संकट आलं' असं का म्हणतात? संक्रांत शुभ की अशुभ? सत्य काय?

आज देशात मकर संक्रांतीचा सण साजरा केला जात आहे. देशभरात विविध ठिकाणी विविध नावांनी हा सण साजरा केला जातो.
उत्तरेत पंजाबमध्ये हा सण माघी/लोहरी या नावाने, हरयाणामध्ये सक्रात, पश्चिम बंगालमध्ये पुष संक्रांती, ईशान्येकडे आसामात मेघ बिहू, दक्षिणेत तामिळनाडूमध्ये पोंगल नावाने हा सण साजरा होतो.
 
त्याचप्रमाणे महाराष्ट्रात मकर संक्रांत नावाने साजरा केला जातो. या सणादिवशी लोक प्रामुख्याने काळी वस्त्रे परिधान करतात. लोकांना तिळगुळ देऊन म्हणतात, तिळगुळ घ्या, गोड बोला.
 
"या दिवशी सूर्य मकर राशीत प्रवेश करतो. काही वर्षी 14 जानेवारी रोजी संध्याकाळी सूर्य मकर राशीत प्रवेश करतो. सूर्यास्तानंतर ही घटना घडल्यास त्याचा पुण्यकाल दुसऱ्या दिवशी मानला जातो. त्यामुळेच त्यावर्षी 15 जानेवारीस मकर संक्रांत साजरी केली जाते," असं खगोल आणि पंचांग अभ्यासक दा. कृ. सोमण सांगतात.
 
हा सण माणसांच्या परस्परसंबंधांमध्ये स्नेह व माधुर्य हवे, असा संदेश देत असल्यामुळे सामाजिक दृष्टीनेही महत्त्वाचा आहे.
 
तिळगूळ देताना 'तीळगुळ घ्या गोड बोला' असे म्हणण्याची पद्धत, विविध वस्तूंचे दान देण्याचा आग्रह, दूरच्या संबंधितांना शुभेच्छापत्रे व तिळगूळ वगैरे पाठविण्याची पद्धत, सुवासिनींनी आपल्या घरचे तांदूळ दुसऱ्यांच्या घरच्या आधणात शिजविण्याची व दुसऱ्यांच्या घरात असलेला नारळ सोलण्याची कोकणातील प्रथा इ. गोष्टी सामाजिक अभिसरणाच्या द्योतक आहेत," असं मराठी विश्वकोशात लिहिलं आहे.
 
इतर राज्यांतील मकर-संक्रांत
पंजाबसह उत्तरेच्या काही राज्यांमध्ये लोहरी नावाने मकर संक्रांत साजरी करतात. पीकाची कापणी आणि त्यानंतर होणारी पेरणी यादरम्यानच्या कालावधीत हा सण येतो. यावेळी सूर्य आणि अग्नि यांची पूजा करण्याचा प्रघात आहे.
 
यावेळी लोहरी (शेकोटी) पेटवली जाते. यामध्ये तीळ, रेवडी, शेंगा आदी वस्तू अर्पित केल्या जातात. सौभाग्य, समृद्धी यांचं ते प्रतीक मानलं जातं. नृत्य-संगीत यांच्याशिवाय लोहरी पूर्ण होत नाही. यावेळी लोकनायक दुल्ला भट्टी यांची गीते गायली जातात.
 
तर पोंगल हा सण तामिळनाडूसह तेलंगण, आंध्रप्रदेश आणि आजूबाजूच्या इतर राज्यांमध्ये साजरा होता. दक्षिणेतील प्रमुख सणांपैकी एक म्हणून हा सण मानला गेला आहे. तमीळ कॅलेंडरनुसार 'थाई' या महिन्याची ही सुरुवात. या महिन्यात नव्याची सुरुवात करणं शुभ मानतात.
 
पोंगल हा सण तीन दिवस साजरा होतो. हे तीन दिवस अनुक्रमे भोगी पोंगल, थाई पोंगल आणि मत्तू पोंगल म्हणून ओळखले जातात. यादरम्यान पोंगल नावाचा भाताचा पदार्थ बनवतात. येथील प्रसिद्ध जलिकट्टू खेळही यादरम्यानच खेळला जातो. कृषी संस्कृतीत त्याला महत्त्वाचं स्थान आहे.
 
आसाममध्ये भोगाली बिहू नावाने मकरसंक्रांत साजरी होते. हा पीक कापणीचा सण आहे. शेतात शेकोटी पेटवून आजूबाजूला लोक जमा होतात. एकत्र येत नाच-गाणी करतात. येथील कोळी बांधव यावेळी एकत्रित येऊन मासे पकडण्याचा खेळ खेळतात. पश्चिम बंगालमध्ये गंगासागरची यात्रा होते.
 
 
एकूणच देशभरात मकर संक्रांत सण साजरा करण्याच्या पद्धतीमध्ये अनेक साम्य दिसून येतील. त्यासोबतच स्थानिक संस्कृतीनुसार त्यामध्ये थोडेफार फरकही स्पष्टपणे दिसू शकतात.
 
पण देशभरात सर्वच ठिकाणी हा सण सकारात्मक मानला गेलेला आहे. वाईटावर सत्याचा विजय, नव्याची सुरुवात, संक्रमणाचा जल्लोष, कृषी संस्कृतीतील समर्पण भाव याच अर्थाने सण साजरा करण्यात येतो.
 
"मकर संक्रांतीच्या अनुषंगाने केवळ महाराष्ट्रातच आणि विशेषतः मराठी संस्कृतीत काही नकारात्मक समजुती पाहायला मिळतात," असं याविषयी बोलताना दा. कृ. सोमण यांनी बीबीसी मराठीला सांगितलं.
 
संक्रांतीविषयी नकारात्मक समजुती
मकर संक्रांत सणाशी संबंधित म्हण आपल्याकडे सर्वसाधारपणपणे प्रचलित आहे, ती म्हणजे 'संक्रांत येणं.' या म्हणीचा अर्थ आपल्यावर एखादं संकट येणं, अशा अर्थाने घेतला जातो, असं मराठी विश्वकोशातही म्हटलेलं आहे.
 
त्यामधील माहितीनुसार, सूर्याच्या मकर संक्रमणाचे संक्रांतीच्या स्वरूपात दैवतीकरणही करण्यात आले आहे. लांब ओठ, दीर्घ नाक, एक तोंड व नऊ बाहू असलेल्या एका देवीने संक्रांतीच्या दिवशी संकरासुराची हत्या केली होती. दरवर्षी तिचे वाहन, शस्त्र, वस्त्र, अवस्था, अलंकार, भक्षण वगैरे गोष्टी वेगवेगळ्या असतात आणि त्या भावी घटनांच्या सूचक मानल्या जातात.
 
ती एखाद्या वाहनावर बसून एका दिशेकडून येते, दुसऱ्या दिशेला जाते व त्या वेळी तिसऱ्या दिशेकडे पहात असते. ती ज्या दिशेकडून येते त्या दिशेला समृद्धी मिळते, तर ती जिकडे जाते व पाहते तिकडे संकट कोसळते त्यामुळेच संक्रात येणे म्हणजे संकट येणे असा वाक्प्रचार रूढ झाला आहे.
 
तिने ज्या वस्तू घेतलेल्या असतात, त्या नष्ट वा महाग होतात अशीही समजूत आहे. पंचांगात तिचे चित्र दिलेले असते. त्यामुळेच संक्रांतीच्या दिवशी शुभ कार्ये करत नाहीत.
 
"याव्यतिरिक्त गावोगावी काही लोक या कालावधीत फिरत असतात. संक्रांतीत काय करावं काय करू नये, पुढील वर्षभरात कोणावर संकट येईल, आदी गोष्टी ते सांगतात. काही नागरीक अत्यंत चवीने ते ऐकतात आणि आचरणात आणण्याचा प्रयत्न करतात, पण या सर्व चुकीच्या प्रथा आहेत," असं दा. कृ सोमण यांनी म्हटलं.
 
म्हण कधीपासून रूढ झाली?
संक्रांत येणं म्हणजे संकट येणं, असा वाक्प्रचार रुढ होण्यासाठी वरील दंतकथेचा एक आधार आहे. त्याव्यतिरिक्त पानिपतच्या लढाईचाही त्याला संदर्भ दिला जातो.
 
पानिपतची लढाई 1761 साली संक्रांतीच्याच दिवशी झाली होती. त्यावेळी संक्रांत 10 किंवा 11 जानेवारीला येत असे. या पराभवाने मराठी भाषेत 'पानिपत झालं' अशी म्हण रूढ झाली, असं तज्ज्ञ सांगतात. त्याचप्रमाणे संक्रांत आली, या म्हणीचाही पानिपत लढाईशी संबंध आहे का, हा प्रश्न निर्माण होतो.
 
पुणे विद्यापीठातील मराठी भाषा विभागाचे विभागप्रमुख प्रा. प्रभाकर देसाई यांच्याशी आम्ही या विषयावर चर्चा केली.
 
ते सांगतात, "मकर संक्रांतीविषयी संक्रांती देवी, त्यांचं वाहन, त्यांची दिशा यांच्याविषयी अनेक आख्यायिका आहेत. कोणत्याही गोष्टींचं दैवतीकरण करणं, त्या इतर गोष्टींशी जोडून दाखले देणं, ही पद्धत भारतीय उपखंडात फार पूर्वीपासून आहे. मुळात सूर्याचं धनु राशीतून मकर राशीत संक्रमण यासाठी हा सण साजरा होतो. पण या म्हणीमुळे संक्रांत येणं याला वेगळा अर्थ प्राप्त झाला. त्याला आर्यन संस्कृतीतील कर्मकांडाची बाजू असू शकते. याउलट कृषीजन संस्कृतीतील मांडणीप्रमाणे संक्रांत म्हणजे भोगी, धनधान्य अर्पण करणं या गोष्टींचा समावेश आहे."
 
प्रा. देसाई पुढे सांगतात, "देवी, त्याची दिशा आणि वाहन या गोष्टींची पार्श्वभूमी लक्षात घेतली तर संक्रांत येणं म्हणजे संकट येणं अशा अर्थाने शब्दप्रयोग फार पूर्वीपासून प्रचलित असू शकतो. पण पुढे इतर गोष्टी यांना जोडल्या गेल्या. उदा. पानिपतचा पराभव झाल्यानंतर संक्रांत म्हणजे संकट, शुभ कार्य नको, हे आणखी ठामपणे सांगितलं जाऊ लागलं असेल. इतिहासाचं विकृतीकरण करण्याची आपल्याला हव्या त्या पद्धतीने इतिहास सांगण्याची एक पद्धत आहे, त्याचाच हा प्रकार आहे."
 
संतसाहित्याचे अभ्यासक प्रा. शिवाजीराव भुकेले यांनीही अशाच प्रकारची प्रतिक्रिया दिली. ते म्हणतात, "संक्रांत येणं म्हणजे संकट, अशा अर्थाने प्रचलित विचारसरणी पूर्वीपासून मांडण्यात येत होती. त्याचं मूळ त्याच्याशी संबंधित कर्मकांड, विधी तसंच अनाकलनीय दंतकथा यामध्ये आढळून येतं. म्हणूनच हे पूर्वीपासून चालत आलेलं असू शकतं. त्याला पानिपतची जोड मिळाली, असं म्हणता येईल."
 
दा. कृ. सोमण म्हणतात, "आपल्याकडे पौष महिना शुभ कार्याला वाईट असतो अशी चुकीची समजूत काही लोकांची झालेली असते. पौष महिना हा शुभ कार्याला वाईट नसतो. पौष महिन्यात मकर संक्रांती येत असल्यामुळे हा गैरसमज निर्माण झालेला असावा. पौष अशुभ नसून शुभ आहे. पंचांगात पौष महिन्यातही विवाह मुहूर्त दिलेले असतात. "
 
'संक्रांत अशुभ नाही'
पंचांगकर्ते आणि खगोल शास्त्र अभ्यासक संक्रांत अशुभ असल्याचं पूर्णपणे फेटाळून लावलं.
 
ते म्हणतात, "मकर संक्रांतीपासून दिवस मोठा, रात्र लहान होऊ लागते. दिवस मोठा होणं ही वाईट नसून चांगली आणि आनंदाची गोष्ट आहे. प्राचीन काळी विद्युत दिवे नव्हते. त्यावेळी दिनमान मोठे होतं गेल्याने अधिक वेळ कामे करता येतात म्हणून मकर संक्रांती हा गोड सण मानला जात होता."
 
सोमण यांच्या मते, "संक्रांती देवीने पहिल्या दिवशी संकरासुर, दुसऱ्या दिवशी किंकरासूर राक्षसाला ठार मारले, असे प्राचीन कथेत सांगितले गेलं आहे. संक्रांती देवीने जर राक्षसाना ठार मारलं तर ते वाईट कसं असेल? हा सत्याचा विजय आहे. ही तर चांगलीच गोष्ट आहे."
 
प्रा. शिवाजीराव भुकेलेंनीही संक्रांतीमधील नकारात्मकता स्पष्टपणे नाकारली. ते म्हणतात, "संत साहित्याने संक्रांत हे संक्रमण मानलं आहे. वाईट गुण सोडून चांगल्याकडे जाणं, सद्गुणांमध्ये संक्रमण करणं म्हणजे संक्रांत. संत तुकारामांनाही आपल्या ओवीत याविषयी स्पष्ट सांगितलेलं आहे. 'देव तिळी आला, गोड-गोड जीव झाला,' अशी ओवी त्यांनी केली होती. संक्रांतीच्या दिवशी देव तिळी येणं म्हणजे नशिबी किंवा आयुष्यात येणं होय. यालाच खऱ्या अर्थाने तिळ-गुळ किंवा संक्रांत असं संत तुकारामांनी मानलेलं आहे."
 
संक्रांत अशुभ नसल्याचं पटवून देण्यासाठी दा. कृ. सोमण यांनी सण-उत्सवांचा ऋतुंशी असलेला संबंध समजावून सांगितला.
 
ते म्हणतात, "हिंदू सण उत्सवांची रचना अतिशय प्राचीन काळी करण्यात आली आहे. त्याकाळी आजच्या सारखी भौतिक साधने उपलब्ध नव्हती. शेतीप्रधान संस्कृती, तसंच लोकसंख्याही कमी होती. प्रवास-दळण वळणाची साधनेही आतासारखी नव्हती. त्याकाळी शरीराचं, मनाचं आरोग्य चांगलं ठेवणं, हाच उद्देश सण-उत्सवांची रचना करण्यामागे होता. ऋतूंप्रमाणे आहारात बदल केला तर शरीराचं आरोग्य चांगलं राहतं. शेतीच्या कामांच्या वेळापत्रकानुसार तसंच ऋतूंवर आधारित ते गणित असतं."
 
"त्यामुळे वरील सर्व गोष्टींचा विचार करता, चांगली गोष्ट झाली त्यावेळी 'संक्रांत आली' असा शब्दप्रयोग व्हावा. पूर्वीचं संकट येणं हा अर्थ रद्द करून संक्रांत येणं, याची नवी व्याख्या व्हायला हवी," असंही सोमण यांना वाटतं.
 
म्हणीचा अर्थ बदलू शकतो?
आपल्या संस्कृतीमध्ये म्हणींना खूप महत्त्व असतं. लोकसाहित्यातून आलेल्या म्हणींचं स्वरुप वेगवेगळं असू शकतं. एखादी कहाणी, प्रवाद, परंपरा यांनुसार त्यात यमक, उपमा, अतिशयोक्ती आणल्यामुळे त्या चटकदार होतात. त्या त्या संस्कृतीचे रूप म्हणींमध्ये दिसते, अशी व्याख्या मराठी विश्वकोशात करण्यात आलेली आहे.
 
म्हणींविषयी अधिक माहिती देताना प्रा. प्रभाकर देसाई म्हणतात, "म्हणींच्या बाबतीत सर्वात महत्त्वाचं वैशिष्ट्य म्हणजे, ती लोकसमुहातून तयार झालेली कधीच नसते. म्हण ही अत्यंत कुशाग्र बुद्धीच्या, ज्याला सर्व व्यवहार चांगल्या रितीने माहिती आहेत, जो या सर्व गोष्टी अतिशय चांगल्या प्रकारे चपखलपणे जोडू शकतो, अशा व्यक्तीकडून तयार होण्याची शक्यता असते.
 
प्रा. देसाई यांच्या मते, "जसं एखादं लोकगीत हे लोकसमूहातून तयार होतं. त्याचे वेगवेगळे व्हर्जन असतात. पण म्हणीला तसा पर्याय नसतो. म्हण ही आखीव-रेखीव-सोलीव ठरवून बनवलेली असते, शक्यतो एका व्यक्तीकडून ती तयार केलेली असण्याची दाट शक्यता असते. त्यामुळे व्यक्तीचा राग, लोभ, लैंगिक भेदभाव, वर्गीय प्रवृत्ती किंवा हुकुमशाही अशा त्याच्या वैयक्तिक गोष्टी म्हणींमध्ये उतरतातच. पण या म्हणी कोणत्या काळात तयार झाल्या, त्यावेळची आजूबाजूची परिस्थिती काय होती, त्यावर त्यांचं प्रचलन अवलंबून असतं."
 
ते सांगतात, "म्हणींमधील हा सामाजिक-सांस्कृतिक असमतोल गेल्या काही वर्षांत प्रकर्षानं दिसून आला आहे. म्हणूनच जातीय, वर्णभेदी, एखाद्या समूहास अपमानजनक वाटू शकणाऱ्या म्हणी आपण आता ओळखू शकतो. त्या वापराव्यात की नाही, याचा पुनर्विचार सध्याच्या काळात नक्की होऊ शकतो."
 
Published By - Priya Dixit