महागाईचा साखरेच्या गुणवत्तेवर परिणाम; १५ ऑक्टोबरपासून ऊस गाळप सुरू करा, सरकारचा निर्णय
साखरेच्या वाढत्या किमतींना आळा घालण्यासाठी, महाराष्ट्र सरकारने १५ ऑक्टोबरपासून ऊस गाळप हंगाम सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र, साखर कारखान्यांनी चिंता व्यक्त केली आहे.
साखरेच्या वाढत्या किमतींच्या पार्श्वभूमीवर, महाराष्ट्र सरकारने यावर्षीचा ऊस गाळप हंगाम १५ ऑक्टोबरपासून सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली बुधवारी झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. राज्यात गाळप हंगाम साधारणपणे नोव्हेंबरच्या सुमारास सुरू होतो, परंतु यावेळी तो सुमारे एक महिना आधी सुरू करण्याचे नियोजन आहे.
सह्याद्री गेस्ट हाऊस येथे झालेल्या बैठकीला सहकार मंत्री बाबासाहेब पाटील, उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार, माजी मंत्री दिलीप वळसे पाटील आणि साखर कारखानदार संघटनांचे प्रतिनिधी उपस्थित होते. या बैठकीत सणासुदीच्या काळात साखरेची उपलब्धता आणि दरांवर चर्चा झाली. मागील गाळप हंगामात साखर उत्पादनात घट झाल्यामुळे बाजारभावात वाढ झाल्याचे वृत्त आहे. ऑगस्ट महिन्यात किरकोळ बाजारात साखरेचे दर ७० ते ७५ रुपये प्रति किलोपर्यंत पोहोचल्याचे वृत्त आहे.
महाराष्ट्रामध्ये गणेशोत्सवानंतर नवरात्री, दसरा आणि दिवाळीसारखे मोठे सण येत आहे. या सणांदरम्यान साखरेची मागणी वाढण्याची शक्यता आहे. परिणामी, दरांवर नियंत्रण ठेवत बाजारात पुरेसा साठा कायम ठेवण्याचे आव्हान सरकारसमोर आहे. गाळप हंगाम लवकर सुरू केल्यास बाजारात साखरेची उपलब्धता वाढण्यास मदत होईल, असा सरकारचा विश्वास आहे. यामुळे सणासुदीच्या काळात पुरवठा चांगला राखण्याच्या प्रयत्नांना मदत होईल.
साखर कारखाने आणि शेतकऱ्यांचा विरोध
काही साखर कारखानदार आणि शेतकऱ्यांनी महाराष्ट्र सरकारच्या निर्णयाला विरोध दर्शवला आहे. ऑक्टोबरमध्ये गाळप सुरू केल्यास शेतकरी आणि कारखान्यांवरील आर्थिक दबाव वाढू शकतो, असे त्यांचे म्हणणे आहे.
Edited By- Dhanashri Naik
