शनिवार, 9 नोव्हेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. अर्थजगत
  3. वाणिज्य वृत्त
Written By
Last Modified: मंगळवार, 10 मे 2022 (08:10 IST)

खरीप हंगामपूर्व नियोजन बैठकीत झाले हे महत्त्वाचे निर्णय

crop
नाशिक शेतकऱ्यांचा खरीप हंगाम सहज व सुलभ होण्यासाठी कृषी व संबंधित विभागांनी सतर्कतेने नियोजन करण्याच्या सूचना राज्याचे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री तथा पालकमंत्री छगन भुजबळ यांनी दिल्या आहेत. जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हास्तरीय खरीप हंगामपूर्व नियोजन बैठकीत पालकमंत्री भुजबळ बोलत होते.
 
पालकमंत्री छगन भुजबळ म्हणाले, शेतकऱ्यांना येणाऱ्या अडचणींवर मात करण्यासाठी कृषी मंत्र्याच्या मार्गदर्शनाखाली बांधावर खत व बीयाण्यांचा पुरवठा करण्यासाठी राबविण्यात येणाऱ्या मोहिमेत सातत्य ठेवण्यात यावे. बोगस खते व बीयाण्यांचा पुरवठा करणाऱ्यांवर योग्य ती कारवाई करण्यात यावी. तसेच वीज वितरण विभागाने कृषीपंपासाठी शेतकऱ्यांना अखंडीत वीज पुरवठा करण्यासाठी नियोजन करावे. त्याचप्रमाणे वीजेचा सुरळीत पुरवठा होण्यासाठी शेतकऱ्यांनी देखील वीज देयके वेळेत अदा होतील यासाठी प्रयत्न करावेत, असे आवाहन देखील पालकमंत्री श्री. भुजबळ यांनी यावेळी केले आहे.
 
खते, बी-बियाणे उपलब्धता आणि नियोजन, बोगस बियाणे, पीकविमा आदी विषयांचा त्यांनी आढावा घेतला. महसूल मंडळनिहाय हवामानाचा अंदाज देणाऱ्या केंद्रांची संख्या वाढविण्‍यासाठी प्रयत्न करावेत, या हवामान केंद्रांच्या माध्यमातून बदलत्या हवामानाच्या अंदाजाची माहिती जिल्हा पातळीवर एकत्रित करावी. जेणेकरून हवामानातील बदलाचा व नैसर्गिक आपत्तीचा शेतकऱ्यांना योग्यवेळी अंदाज येवून त्यादृष्टीने शेतकरी वर्ग उपाययोजना करू शकतील.महात्मा फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना, गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजनेच्या लाभापासून गरजू शेतकरी वंचित राहणार नाहीत, त्यांना आवश्यक प्रसंगी वेळेत कर्जपुरवठा व विमा रक्कम अदा केली जाईल यासाठी संबंधित अधिकाऱ्यांनी प्रयत्नशील रहावे. त्याचप्रमाणे शेतकऱ्यांकडून कर्जापोटी घेतलेल्या रकमेच्या बदल्यात त्यांची कृषी साधने जमा करू नयेत. पीक कर्जाचा लक्षांक साध्य होण्यासाठी जिल्हाधिकारी यांनी दर आठवड्याला बँकांची बैठक घ्यावी. तसेच कृषी शिक्षण विस्तार विभागाच्या माध्यमातून शेतकऱ्यांना नवीन योजना, पीक पद्धती याबाबत वेळोवळी मार्गदर्शन करण्यात यावे, असेही पालकमंत्री छगन भुजबळ यांनी याबैठकीत सांगितले.
 
शेतकऱ्यांना पेरणीच्या वेळी पिककर्जाच्या माध्यमातून आर्थिक मदत उपलब्ध होण्यासाठी जिल्हाधिकारी यांनी दर आठवड्याला बैठक घेवून शेतकऱ्यांना पेरणीपूर्वी पिक कर्ज उपलब्ध करून देण्यावर भर देण्यात यावा, अशा सूचना राज्याचे कृषि व माजी सैनिक कल्याण मंत्री दादाजी भुसे यांनी उपस्थित अधिकाऱ्यांना दिल्या आहेत.
 
नॅनो युरियाचा वापर करून त्याचा ड्रोनमार्फत फवारणी करण्यासाठी शेतकऱ्यांमध्ये जनजागृती करण्यात यावी. तसेच नाशिक जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या वतीने महात्मा फुले शेतकरी कर्ज मुक्ती योजनेंतंर्गत करण्यात आलेल्या कर्ज पुरवठ्याचा अहवाल नव्याने शासनास सादर करावा, असेही कृषिमंत्री श्री. भुसे यांनी सांगितले आहे.
 
खरीप हंगामाच्या दृष्टिने आवश्यक प्रमाणात खत, बियाणे व इतर निविष्ठांचे नियोजन करण्यात आले आहे. तसेच खत विक्रेत्यांच्या मागणी व पीक पद्धतीनुसार तालुकानिहाय रासायनिक खतांचे वितरण करण्यात येणार असून खतांच्या विक्री व वितरणावर नियंत्रण ठेवण्यासाठी तालुका, जिल्हा व विभागनिहाय 17 भरारी पथकांची नियुक्ती करण्यात आली आहे. जिल्ह्याला खरीप हंगामासाठी खत, बियाणे व इतर निविष्ठांचा पुरवठा कमी पडू दिला जाणार नाही, अशी ग्वाही देखील कृषिमंत्री दादाजी भुसे यांनी बैठकीत दिली आहे.बैठकीच्या सुरूवातीला जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी विवेक सोनवणे यांनी कृषी विभागामार्फत करण्यात आलेल्या उपाययोजना, नियोजनाचे सादरीकरणाद्वारे बैठकीत माहिती सादर केली.
 
यावेळी कृषि व माजी सैनिक कल्याण मंत्री दादाजी भुसे, आमदार नितीन पवार, विभागीय आयुक्त राधाकृष्ण गमे, जिल्हाधिकारी गंगाथरन डी., जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी लीना बनसोड, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी विवेक सोनवणे, जलसंपदा विभागाच्या अधीक्षक अभियंता अलका अहिरराव, कार्यकारी अभियंता सागर शिंदे, सहकार विभागाचे जिल्हा उपनिबंधक डॉ. सतिश खरे, मालेगाव उपविभागीय कृषी अधिकारी दिलीप देवरे, जी. डी. वाघ, नाशिक जिल्हा मध्यवर्ती बँकेचे प्रशासक अरूण कदम यांच्यासह संबंधित विभागांचे प्रमुख उपस्थित होते.