शनिवार, 23 नोव्हेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. अर्थजगत
  3. वाणिज्य वृत्त
Written By
Last Modified: सोमवार, 14 मार्च 2022 (17:08 IST)

रशिया-युक्रेन युद्धामुळे 'या' वस्तू महागणार

केवळ पाश्चात्य निर्बंधांमुळेच नव्हे तर युक्रेनवरील रशियन हल्ल्यांमुळे तसंच पुरवठा साखळीच्या समस्या इत्यादी कारणांमुळे कमॉडिटी मार्केटमध्ये वस्तूंच्या किंमती वाढल्या आहेत. युक्रेनवर रशियाच्या हल्ल्यानंतर त्या भागातील धातू आणि धान्यांचा पुरवठा खंडित झालाय. अनेक पाश्चात्य देशांनी आधीच रशियन तेल आणि वायू आयातीवर निर्बंध लादले आहेत.
 
खरंच, रशिया आणि युक्रेनची जगातील कमॉडिटी मार्केटमध्ये मोठी धोरणात्मक भूमिका आहे.
 
दोन्ही देश मूलभूत कच्च्या मालाचे प्रमुख निर्यातदार आहेत. गहू, तेल, वायू, कोळसा यांच्या व्यतिरिक्त ते इतर मौल्यवान धातूंचे मोठे पुरवठादार आहेत.
 
मात्र रशिया आणि युक्रेनमधील युद्धामुळे या वस्तूंचा पुरवठा खंडित होत आहे. यामुळे कोव्हिडमधून सावरत असलेल्या जगाच्या अर्थव्यवस्थेला मोठा धक्का बसण्याची शक्यता निर्माण झालीये.
 
तरीही अशा चार गोष्टी आहेत, ज्यांचा पुरवठा दीर्घकाळ खंडित झाल्यास जागतिक अर्थव्यवस्थेला अडचणी येऊ शकतात.
 
तेल- नैसर्गिक वायू
रशियाच्या अर्थव्यवस्थेची मोठी जबाबदारी कच्च्या तेल आणि वायूच्या निर्यातीवर अवलंबून आहे. युक्रेनवर हल्ला करण्यापूर्वी जगात वापरल्या जाणाऱ्या दर दहा बॅरलपैकी एक बॅरल कच्चं तेल रशियाचं होतं. पण आता युद्धामुळे अमेरिका, कॅनडा आणि ब्रिटनने रशियन तेल आणि वायूच्या आयातीवर बंदी घातलीय.
 
तज्ज्ञांचं म्हणणे आहे की, या युद्धामुळे तेल आणि वायूच्या किंमती वाढू शकतात कारण, रशिया दररोज पाच दशलक्ष गॅलन तेलाची निर्यात करतो. पुरवठा थांबल्यामुळे जागतिक बाजारपेठेत त्याची भरपाई करणं कठीण आहे.
 
तेल निर्यातदार देशांची संघटना असलेल्या ओपेकचे सरचिटणीस मोहम्मद बारकिंदो यांनी म्हटलंय की, रशियन उत्पादनाची भरपाई करणं कठीण आहे.
 
रशियाकडून कमी तेल आयात करणाऱ्या देशांनाही ही समस्या जाणवत आहे. जागतिक बाजारात तेलाच्या किंमती आणखी वाढू शकतात.
 
अन्नधान्य आणि खाद्यतेल
रशिया आणि युक्रेन हे दोन्ही देश अन्नधान्य आणि खाद्यतेलासह खाद्यपदार्थांचे प्रमुख निर्यातदार आहेत.
 
दोन्ही देशांना युरोपचं 'ब्रेड बास्केट' म्हटलं जातं. जागतिक बाजारपेठेत होणाऱ्या गहू आणि मक्याच्या पुरवठ्यात युक्रेन आणि रशियाचा अनुक्रमे 29 टक्के आणि 19 टक्के वाटा आहे.
 
युक्रेन हा सूर्यफूल तेलाचा सर्वांत मोठा उत्पादक आहे. रशिया दुसऱ्या क्रमांकावर आहे. S&P ग्लोबल प्लॅट्सच्या म्हणण्यानुसार, या दोघांचा मिळून सूर्यफूल तेलाच्या उत्पादनात 60 टक्के वाटा आहे. पण युद्धामुळे काही फ्युचर्स एक्स्चेंजमधील वस्तूंच्या किमती 14 वर्षांच्या उच्चांकावर पोहोचल्याय.
 
या युद्धामुळे अन्नधान्याच्या उत्पादनावर परिणाम होणार असल्याचं तज्ज्ञांचं म्हणणं आहे. रशिया आणि युक्रेनमधील युद्धामुळे पुरवठा विस्कळीत झाला तर आंतरराष्ट्रीय बाजारात गव्हाच्या किंमती दुपटीनं वाढू शकतात.
 
तुर्कस्तान आणि इजिप्त त्यांच्या गरजेच्या 70 टक्के गहू रशिया आणि युक्रेनमधून आयात करतात. युक्रेन हा चीनचा मुख्य मक्याचा पुरवठादार आहे.
 
जागतिक अन्न मोहिमेचे संचालक डेव्हिड बीसले यांनी बीबीसीला सांगितलं की, युद्धामुळे जगभरातील अन्नधान्याच्या किंमती वाढल्याचा सर्वांत मोठा फटका जगातील गरीब देशांना बसणार आहे.
 
धातू
रशिया हा अ‍ॅल्युमिनिअमपासून तांबं आणि कार उत्पादनात वापरल्या जाणाऱ्या सर्व प्रमुख धातूंचा निर्यातदार आहे.
 
हा जगातील चौथा सर्वांत मोठा अ‍ॅल्युमिनिअम निर्यातदार आहे. पोलाद, निकेल, पॅलेडियम आणि तांबं या धातूंच्या पाच प्रमुख निर्यातदारांपैकी रशिया एक आहे.
 
युक्रेन हा औद्योगिक धातूंचा प्रमुख उत्पादक देश आहे. पॅलेडियम आणि प्लॅटिनमच्या निर्यात बाजारपेठेतही त्यांचा मोठा वाटा आहे.
 
म्हणजेच येत्या काही दिवसांत अ‍ॅल्युमिनिअमचे डबे आणि तांब्याच्या तारा सुध्दा महाग होणार आहेत.
 
लंडन मेटल एक्सचेंजचे संचालक मॅथ्यू चेंबरलेन यांनी बीबीसीला सांगितलं, "या वर्षाच्या सुरुवातीपासून अ‍ॅल्युमिनिअम आणि निकेलच्या किमती 30 टक्क्यांनी वाढल्या आहेत. कॉपर वायरिंग या पण महाग होतील."
 
वर्ल्ड गोल्ड काउन्सिलच्या मते, रशिया हा ऑस्ट्रेलिया आणि चीननंतर सोन्याचा तिसरा सर्वांत मोठा उत्पादक देश आहे. गेल्या वर्षी रशियाने 350 टन सोन्याचं उत्पादन केलं होतं. गेल्या काही दिवसांपासून आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्याच्या दरात वाढ होत आहे. रशिया-युक्रेनचं युद्ध सुरू राहिल्यास किंमत आणखी वाढू शकते.
 
रशिया आणि युक्रेनमधून पुरवलं जाणारं निकेल आणि पॅलेडियम देखील महाग होऊ शकतं. पॅलेडियमचा पुरवठा विस्कळीत झाल्यास जगभरातील वाहन उत्पादकांसमोर अडचणी निर्माण होऊ शकतात. लिथियम-लोखंडी बॅटरी बनवण्यासाठी निकेलचा वापर केला जातो. मार्चच्या सुरुवातीला त्याची किंमत 76 टक्क्यांनी वाढली.
 
पॅलेडियमही महाग होत आहे. याचा वापर कारमध्ये कॅटॅलिटिक कन्व्हर्टर बनवण्यासाठी केला जातो. जगातील पॅलेडियम उत्पादनात रशियाचा वाटा 38 टक्के आहे.
 
निऑन
युक्रेन हा क्रिप्टॉन आणि निऑन सारख्या शुद्ध वायूंचा प्रमुख पुरवठादार आहे. निऑनचा वापर अर्धसंवाहक बनवण्यासाठी केला जातो. याचा वापर कार बनवण्यासाठी होतो.
ट्रेंडफोर्स डेटानुसार, निऑन गॅसच्या जगातील निव्वळ निर्यातीपैकी 70 टक्के युक्रेनचा वाटा आहे. यूएसमध्ये चिप उद्योग वापरत असलेल्या निऑन गॅसपैकी 90 टक्क्यांहून अधिक गॅस युक्रेनमधून येतो.
 
हा पुरवठा खंडित झाल्यास मायक्रोचिपचा मोठा तुटवडा निर्माण होऊ शकतो. गेल्या वर्षभरापासून मायक्रोचिपचा पुरवठा कमी झाला आहे.
 
मूडीज ॲनालिटिक्सच्या टिम यूवायने अलीकडील अहवालात लिहिलं आहे की, "रशिया जगातील 40 टक्के पॅलेडियमचा पुरवठा करतो, युक्रेन जगातील 70 टक्के निऑनचा पुरवठा करतो. परिणामी संघर्षात आणखी वाढ झाल्यास टंचाई आणखी वाढू शकते."
 
"जून 2014-15 मध्येही, जेव्हा युक्रेनमध्ये क्रिमिया प्रांतात संघर्ष वाढला होता तेव्हा सुध्दा निऑनच्या किमती अनेक पटींनी वाढल्या होत्या. यावरून सेमीकंडक्टर उद्योगासाठी संकट किती गंभीर आहे हे दिसून येतं."