शुक्रवार, 26 एप्रिल 2024
  1. वृत्त-जगत
  2. क्रिकेट मराठी
  3. क्रिकेट वृत्त
Written By wd|
Last Modified: लंडन , गुरूवार, 17 जुलै 2014 (14:23 IST)

आजपासून दुसर्‍या कसोटीस सुरुवात

अँडरसन - जडेजा वादाच्या पार्श्वभूमीवर

पहिल्या कसोटीत जेम्स अँडरसन आणि रवींद्र जडेजा यांच्यात झालेल्या वादाच्या पार्श्वभूमीवर येथील लॉर्डस् मैदानावर इंग्लंड आणि भारत संघात गुरुवारपासून दुसर्‍या क्रिकेट कसोटी सामन्यास सुरुवात होत आहे.
 

नॉटिंघमच्या ट्रेंटब्रिज मैदानावर जाताना इंग्लंडच्या अँडरसनने जडेजाला धक्काबुक्की केली होती. याबाबत भारतीय संघ व्यवस्थापनाने आयसीसीकडे तक्रार नोंदली आहे.

नॉटिंघमची खेळपट्टी निर्जीव आणि अत्यंत मंद अशी होती. त्यांनतर ही कसोटी खेळली जात आहे. या दोन संघात पाच सामन्याची कसोटी मालिका खेळली जात आहे. अँडरसनच्या सुनावणीची तारीख निश्चित झाली नसलल्यामुळे अँडरसन दुसर्‍या कसोटीत खेळण्याची शक्यता आहे. तरीही या घटनेचा दोन्ही संघावर परिणाम होणार आहे.

इंग्लंडच्या खेळपट्टय़ा या वेगवान गोलंदाजास अनुकूल असतात. चेंडू स्विंग होतात. परंतु पहिल्या कसोटीत तसे दिसून आले नाही. लॉर्डस्चे मैदान हे वेगवान मार्‍यास अनुकूल असणार आहे. 2010 ते 2014 पर्यंत पहिल्या डावाची सरासरी धावसंख्या या मैदानावरील 315 अशी आहे. ती 403 पर्यंत गेली होती. हे ऐतिहासिक मैदान असून याच मैदानावर इंग्लंडमधील उन्हाळ्यात दोन कसोटी सामने खेळले जाऊ शकतात.

कर्णधार अलेस्टर कुक हा गोंधळात पडू शकतो. कारण त्याला एका बाजूने पाटा खेळपट्टी हवी आहे. व त्याला त्याचे दैव बदलावाचे आहे. मागील 25 डावांत तो शतक करू शकलेला नाही. त्यामुळे त्याला या सामन्यात धावा जमवायच्या आहेत.

भारताच गोलंदाजांनाही येथे फारसे यश मिळविता आले नाही. त्याचप्रमाणे इंग्लंडचा संघ सुध्दा गोलंदाजांच शोधात आहे. लॉर्डस् मैदानावर वेगवान गोलंदाजांनी 21.95 च्या सरासरीने 165 बळी 2008 ते 2014 या कालावधीत मिळविले आहेत. फिरकी गोलंदाजांनी 29.28 च्या सरासरीने 69 बळी मिळविले आहेत. इंग्लंडने सीमोन केरीगन या फिरकी गोलंदाजाचा संघात समावेश केला आहे. तो आणि मोईन अली हे दोन फिरकी गोलंदाज इंग्लंडच्या संघात असतील. त्याचप्रमाणे अश्विनला या कसोटीत संधी मिळण्याची अपेक्षा आहे.

रवींद्र जडेजा आणि अश्विन या दोघांमध्ये संघात स्थान मिळविण्यासाठी चुरस असणार आहे. अश्विन बाहेर बसला तर जडेजा आत येईल आणि त्याच्या एकटय़ावरच भारताचा फिरकी मारा अवलंबून राहील. पहिल्या क्रिकेट कसोटीत भारताच्या इशांत शर्मा, भुवनेश्वर कुमार, मोहम्मद शमी यांनी वेगवान मारा सांभाळला. त्यांनी चांगली कामगिरी केली. अष्टपैलू स्टुअर्ट बिन्नीनेही चुणूक दाखविली आहे. दोन्हीही संघामध्ये बदल होण्याची अपेक्षा कमी राहील.

प्रतिस्पर्धी संघ :

इंग्लंड : अलेस्टर कुक (कर्णधार), मोईन अली, जेम्स अँडरसन, गॅरी बॅलन्स, क्षन बेल, स्टुअर्ट ब्रॉड, ख्रिस जॉर्डन, लियाम प्लंकेट, मॅट प्रायर (यष्टीरक्षक), सॅम रॉबसन, जो रूट, बेन स्टोक्स, ख्रिस ओकेस, सीमोन केरीगन.

भारत : महेंद्रसिंग धोनी (कर्णधार व यष्टीरक्षक), शिखर धवन, मुरली विजय, गौतम गंभीर, चेतेश्वर पुजारा, विराट कोहली, अजिंक्य राहाणे, रोहित शर्मा, रवींद्र जडेजा, स्टुअर्ट बिन्नी, आर. अश्विन, इशांत शर्मा, मोहम्मद शमी, भुवनेश्वरकुमार, इश्वर पांडे, पंकज सिंग, वरूण एरॉन, रिद्दीमान साहा.

सामन्याची वेळ- दुपारी 3-30