सोमवार, 23 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. आज-काल
  3. मंथन
Written By
Last Modified: शनिवार, 2 डिसेंबर 2017 (10:58 IST)

रविवारी पहा ‘सुपरमून’

पौर्णिमेच्या दिवशी चंद्र पृथ्वीच्या जवळ आला तर त्याला ‘सुपरमून’ म्हटले जाते. येत्या रविवारी, ३ डिसेंबर रोजी मार्गशीर्ष पौर्णिमेच्या रात्री आकाशात ‘सुपरमून’ दिसणार आहे. चंद्राची कक्षा लंबवर्तुळाकार असते, दर महिन्यात चंद्र काही काळ पृथ्वीच्या जवळ असतो तर काही काळ दूर जातो. मात्र अशाप्रकारे चंद्र पृथ्वीच्या जवळ येण्याच्या काळात पौर्णिमा आल्यास चंद्राचा आकार मोठा दिसतो त्याला सुपरमून म्हटले जाते. यंदा ४ डिसेंबरला पहाटे (३ डिसेंबरच्या रात्री) २.१५ वाजता चंद्र मोठा दिसणार आहे. 

ही घटना वर्षातून एकदा किंवा दोनदा होते. मात्र त्याचा नेमका कालावधी फार आध सांगता येत नाही. यावेळी चंद्र १४ टक्क्यांनी मोठा दिसतो. तसेच त्याचा प्रकाशही ३० टक्क्यांनी वाढलेला असतो.  यानंतरचा सुपरमून लगेचच म्हणजे १ जानेवारीच्या सकाळी दिसणार आहे. त्यावेळी चंद्र पृथ्वीपासून ३ लक्ष ५६ हजार किलोमीटर अंतरावर येणार असल्याचेही सोमण यांनी सांगितले. तांत्रिकदृष्ट्या विचार केला तर चंद्र पृथ्वीपासून सरासरी ३ लक्ष ८४ हजार किलोमीटर अंतरावर असतो. परंतु रविवारी चंद्र पृथ्वीपासून ३ लक्ष ५७ हजार किलोमीटर अंतरावर येणार आहे. 

पौर्णिमेच्या दिवशी पृथ्वीजवळ आलेल्या चंद्राला रिचर्ड नोले यांनी सर्वप्रथम १९७९ मध्ये ‘सुपरमून’ असे नाव दिले. रविवारी, ३ डिसेंबर रोजी दत्तजयंती आहे. या दिवशी सायंकाळी ५ वाजून ५६ मिनिटांनी पूर्वेला पौर्णिमेचा चंद्र रोहिणी नक्षत्रात असताना उगवेल. यावेळी चंद्रबिंब नेहमीपेक्षा जास्त मोठे आणि तेजस्वी दिसेल. संपूर्ण रात्रभर आकाशात दर्शन देऊन चंद्र सोमवारी सकाळी ७ वाजून २५ मिनिटांनी मावळेल. रविवारी रात्री ९ नंतर सर्वांना हे दर्शन घेता येणार आहे. याआधी १४ नोव्हेंबर २०१६ रोजी सुपरमूनचे दर्शन झाले होते.