1. लाईफस्टाईल
  2. बाल मैफल
  3. सामान्य ज्ञान
Written By

सर्वात लहान कोल्हा फेनेक फॉक्स

कोल्हा या प्राण्याबद्दल आपल्याला बरीच माहिती असेल. जगात कोल्ह्याच्या अनेक प्रजाती आहेत. त्यापैकी एक म्हणजे फेनेक फॉक्स. ही कोल्ह्याची जगभरातील सर्वात लहान अशी प्रजाती! लांबून तो मांजरासारखा दिसतो. हा कोल्हा फारच गोंडस दिसतो. गंमत म्हणजे त्याचं वजन फक्त 1 किलो म्हणजे 2.2 पाउंड एवढं असतं.
या कोल्ह्याचं वैशिष्ट्य म्हणजे त्याचे लांबुळके कान. त्याचं तोंड तुलनेनं छोटं असलं तरी कान फार मोठे असतात. उभे असलेले हे कान अगदी लांबूनही दिसतात. या कानांमुळे त्याची चटकन ओळख पटते. त्याच्या कानांची लांबी जवळपास 6 इंच असते. त्यानं हे कान कुणाकडून उसने घेतले आहेत की काय असं वाटत राहतं, कारण आकाराच्या तुलनेत कानच उठून दिसतात.
 
उत्तर आफ्रिका, आखाती देश आणि सिनई या भागातल्या वाळवंटात या प्रजातीचे कोल्हे आढळतात. यामुळे त्यांना वाळवंटातले कोल्हे असंही म्हटलं जातं. हे कोल्हे रात्री जास्त सक्रिय असतात. सकाळच्या वेळेत ते फारसे बाहेर पडत नाहीत. त्यांना दिवसाउजेडी लपून राहायला आवडतं. वाळवंटात राहत असल्यानं त्यांना दुपारचं ऊन आणि उष्णता अगदी नकोशी वाटते. उभे कान उष्णतेपासून त्याचं संरक्षण करतात. या कानांमधून उष्णता बाहेर पडते आणि त्यांचं शरीर थंड राहतं.
 
त्यांची शेपूट झुबकेदार असते आणि अंगावर केस असतात. या केसांमुळे थंडीत त्याचं संरक्षण होतं. वाळवंटी प्रदेशात थंडीत हवामान फार थंड असतं. त्यामुळे ऊन आणि थंडी या दोन्हींपासून रक्षण व्हावं या दृष्टीनं त्यांच्या शरीराची रचना करण्यात आली आहे.
 
हे कोल्हे दोन फूट उंच उडी मारू शकतात. एका उडीत ते जवळपास 4 फूट अंतर कापतात. हे कोल्हे दहा जणांच्या गटानं राहतात. झाडाची पानं, छोटे किडे, सरपटणारे प्राणी हे त्यांचं मुख्य अन्न आहे. हे कोल्हे गव्हाळ रंगाचे असतात आणि त्यांची शेपटी काळसर असते. वाळवंटी प्रदेशात राहणार्‍या इतर प्राण्यांप्रमाणे हे कोल्हेही पाण्याशिवाय बराच काळ जगू शकतात. हे कोल्हे साधारण 10 वर्षांपर्यंत जगतात.