1. लाईफस्टाईल
  2. »
  3. आरोग्य
  4. »
  5. आरोग्य लेख
Written By वेबदुनिया|

नाक आवडत नाही? बदलून टाका !

IFM
तुझे नाक म्हणजे म्हशीने पाय दिल्यासारखे आहे किंवा तुझे नाक पोपटासारखे आहे, असे कुणी कुणाला हिणवण्याची संधीच आता राहिलेली नाही. कारण प्लास्टिक सर्जरीच्या नव्या तंत्राने नाकासह शरीरातल्या कोणत्याही अवयवातली कुरूपता दूर करून ते सुंदर करण्याचे वरदान मिळाले आहे. ओठ आकर्षक करणे, स्तनवृद्धी आणि घट, डोळ्यांच्या पापण्या आकर्षक करणे या शस्त्रक्रियाही याअंतर्गत केल्या जातात. पण यातही नाक योग्य त्या आकारात आणण्याची शस्त्रक्रिया बरीच लोकप्रिय असल्याचे दिसून आले आहे.

पाश्चात्य जगताप्रमाणे प्लास्टिक सर्जरी करून 'कायापालट' करण्याकडे आता भारतीयांचाही ओढा वाढत चालला आहे. या सर्जरीविषयीची जागरूकता अर्थातच, मुंबई, दिल्ली, कोलकता, चेन्नई, बंगलोर, पुणे आणि चंडिगड या शहरांत सर्वाधिक आहे. अर्थात यात उच्च मध्यमवर्गीयांचा सहभाग मोठा आहे. नोकरीची चांगली संधी, लग्नासाठी योग्य जोडीदार आणि आत्मविश्वासात उणीव आणणार्‍या अवयवापासून सुटका करून घेणे ही प्लास्टिक सर्जरीकडे मोठ्या प्रमाणात वळण्याची कारणे आहेत. प्लास्टिक सर्जरीमुळे व्यक्तिमत्व आकर्षक होते आणि दुसर्‍यावर प्रभाव पाडणेही सोपे जाते म्हणूनही अनेक पुरूष आणि स्त्रिया त्याकडे वळत आहेत. प्रसारमाध्यमांनी विशेषत वृत्तपत्रांत या विषयावर येणार्‍या विपुल लिखाणामुळेही लोकांमध्ये आपल्याला नको असलेला अवयव बदलण्याची मानसिकता मूळ धरू लागली आहे.

अमेरिकेत या शस्त्रक्रियांची आकडेवारी ठेवण्यासाठी प्रक्रिया आहे. २००२ मध्ये तिथे ६.९ दशलक्ष शस्त्रक्रिया झाल्या. पण भारतात अशी आकडेवारी अजून काढण्यात आलेली नाही. येथील सर गंगाराम हॉस्पिटलच्या प्लास्टिक आणि कॉस्मेटिक सर्जरी विभागाचे वरिष्ठ सल्लागार डॉ. राकेश खजांची यांच्या मते भारतातही प्लास्टिक सर्जरीविषयीची जागरूकता वाढत आहे. नाकाचा, ओठाचा आकार बदलणे, पुरूषांचे स्तन लहान करणे, पोटाचा आकार कमी करणे यासाठीही प्लास्टिक सर्जरी करणार्‍यांचे प्रमाण वाढते आहे. गेल्या पाच वर्षाचाच आढावा घ्यायचा झाल्यास यात तब्बल दीडशे टक्क्यांनी वाढ झाली आहे.

सर्जरी न करता अवयवात बदल घडवून आणण्यामध्ये बोटोक्स इंजेक्शन घेण्याकडेही लोकांचा कल आहे. बोटोक्स इंजेक्शनद्वारे सुरकुत्या दूर केल्या जातात. यामुळे त्वचा चमकदार होते. अमेरिकन सोसायटी फॉर प्लास्टिक सर्जरीच्या माहितीनुसार बोटोक्स प्रक्रिया सध्या सर्वांत लोकप्रिय असून १९९७ पासून तिचा उपयोग २४०० टक्क्यांनी वाढला आहे. यावरून या बोटोक्स प्रक्रियेच्या वाढत्या लोकप्रियतेची कल्पना येते.