रविवार, 22 डिसेंबर 2024
  1. लाईफस्टाईल
  2. आरोग्य
  3. आरोग्य लेख
Written By
Last Modified: रविवार, 4 ऑगस्ट 2024 (17:06 IST)

मी सर्वात महान आहे, मीच श्रेष्ठ आहे', आत्मकेंद्रीपणा हा आजार आहे का? असे लोक कसे ओळखायचे?

36 वर्षीय आकांक्षा (बदललेलं नाव) त्यांच्या आठ भावंडांमध्ये सगळ्यात मोठ्या आहेत.त्यांच्या कुटुंबाची कायम तक्रार असते की, त्या त्यांच्याशी चांगलं वागत नाही, ज्या कंपनीत त्या काम करतात तिथेही त्या कुणाचं ऐकत नाही आणि आपलंच मत लोकांवर लादण्याचा प्रयत्न करतात.
 
त्यांच्यावर थोडी जरी टीका केली तरी त्यांना वाईट वाटतं आणि त्या रडायला लागतात.
 
आकांक्षाची विचारपूस केल्यावर त्या तक्रार करतात की, त्यांना झोप येत नाही. त्या म्हणतात की, ऑफिस आणि कुटुंबाच्या तणावापायी त्या अनेक वर्षं नीट झोपू शकलेल्या नाहीत.
खरंतर निद्रानाश ही त्यांची समस्या नाही. निद्रानाशाचं कारण देऊन त्या लोकांना स्वत:कडे लक्ष वेधून घेण्याचा प्रयत्न करतात.
 
समुपदेशनाच्या वेळी जेव्हा त्यांच्याशी चर्चा करण्यात आली, तेव्हा लक्षात आलं की त्या नार्सिस्टिक पर्सनॅलिटी डिसऑर्डरने पीडित आहेत. मात्र, आपल्याला असा काही आजार आहे हे आकांक्षा यांनी स्वीकारलं नाही.
भोपाळ जिल्हा रुग्णालयातील मानसोपचारतज्ज्ञ डॉ. राहुल शर्मा बीबीसीशी बोलताना म्हणतात, “या स्थितीला सामान्य भाषेत आत्मकेंद्रीपणा असं म्हणतात. हा आजार नाही, तर एक प्रकारची पर्सनॅलिटी डिसऑर्डर आहे. मानसोपचार क्षेत्रात असे 10 ते 12 मान्यताप्राप्त विकार आहेत. ज्यांना नारसिस्टिक पर्सनॅलिटी डिसऑर्डर असं म्हटलं जातं.
समुपदेशन केल्यावर आकांक्षा यांनी हा आजार असल्याचं मान्य केलं. समुपदेशनाच्या आठ ते 10 सत्रांनंतर त्यांना स्वत:विषयी जरा बरं वाटलं. इतकंच नाही कुटुंबाशी त्यांचे संबंध सुधारले आणि ऑफिसमध्येही त्यांची प्रगती सुधारली.
 
आपल्या आसपास अनेक लोकांच्या स्वभावात चिडचिडेपणा, नकारात्मकता, स्वार्थीपणा अशी लक्षणं पहायला मिळतात. हा स्वभाव आहे म्हणून आपण त्याच्याकडे दुर्लक्ष करतो. मात्र, वास्तविक तो एक आजार आहे. या आजाराविषयी अधिक विस्तृतपणे समजून घेऊया.
 
मोह म्हणजे काय?
मानसोपचारतज्ज्ञांच्या मते, आपल्या सगळ्यांमध्येच कधी ना कधी आत्मकेंद्रीपणाची लक्षणं दिसतात.
 
आत्मकेंद्रीपणाची लक्षणं वेगवेगळी असतात. मात्र, काही प्राथमिक लक्षणं आहेत. अनेकांना असं वाटतं की, ते दुसऱ्यांपेक्षा श्रेष्ठ आहेत. त्यांच्या या आत्मविश्वासाला लोक अहंकार म्हणून पाहतात.
 
डॉ. शर्मा सांगतात, “आत्मकेंद्रीपणा ही खूप जुनी धारणा आहे. त्याचा संदर्भ ग्रीक आणि युनानी कथांमध्ये बघायला मिळतो. भारतासह जगात या विषयावर अनेक पौराणिक गोष्टी लिहिल्या गेलेल्या आहेत.
 
“आत्मकेंद्री व्यक्ती सामाजिक नात्यांना अजिबात प्राधान्य देऊ शकत नाही आणि दिलं तर ते आपल्या पद्धतीने देतो. या व्यक्ती प्रत्येक ठिकाणी स्वत:ला महत्त्व देतात. प्रत्येक काम स्वत:ला केंद्रस्थानी ठेवून करतात. ते स्वत:च्या प्रचंड प्रेमात असतात.”
आत्मकेंद्री व्यक्तीची लक्षणे कोणती?
एखाद्या व्यक्तीला पाहून ती आत्मकेंद्री आहे किंवा नाही हे सांगणं कठीण आहे.
 
अहमदाबाद येथील मानसोपचारतज्ज्ञ डॉ. कलरव मिस्त्री बीबीसीशी बोलताना म्हणाले, “आत्मकेंद्री व्यक्तीच्या वागण्याबोलण्यात फारसा फरक तसा दिसत नाही. या आजाराने ग्रासलेले लोक हुशार आहेत. जर तुम्ही त्यांच्याशी बोलले तर तुम्हाला वाटेल की ते अतिशय परिपक्व आणि समजुतदार आहेत. मात्र ते त्यांचं धोरण अतिशय स्वार्थी असतं. त्यांचं बाह्यरुप अतिशय कनवाळू, लक्ष आकर्षित करून घेणारं आणि दयाळू असतं.”
 
आत्मकेंद्रीपणाची लक्षणं खालीलप्रमाणे आहेत.
 
स्वत:ला खूप श्रेष्ठ समजणं, आपल्या वेशभूषेचा गर्व करणं
स्वत:ला जास्त महत्त्व देणं
आपल्याच कल्पनाविश्वात राहणं, उदा. मी एका रात्रीत श्रीमंत होऊन जाईन.
आपल्या वागण्याबोलण्याने सतत लक्ष वेधून घेणं.
अति नाटकीपणा करणं.
सतत स्तुतीची अपेक्षा ठेवणं, टीका अजिबात सहन न होणं.
दुसऱ्यांच्या यशाबद्दल इर्ष्या वाटणं.
बीबीसीचे डिजिटल हेल्थ एडिटर मिशेल रॉबर्ट यांनी लिहिलेल्या एका लेखानुसार, संशोधकांनी व्यक्तिमत्त्वाच्या लक्षणांच्या आधारे आत्मकेंद्री लोकांची खालील तीन प्रकारात वर्गवारी केली आहे.
 
एजेंटिक - जे लोक स्वत:ला दुसऱ्यांपेक्षा श्रेष्ठ समजतात, आणि त्यांना सतत स्वत:ची स्तुती हवी असणारे.
अँटागोनिस्टिक - दुसऱ्यांना कायम स्पर्धक मानणारे, सहानुभूतीचा कायम अभाव असणारे.
न्यूरॉटिक - असुरक्षिततेची भावना असणारे, टीकेबाबत अत्याधिक संवेदनशील असणारे.
कसा निर्माण होतो आत्मकेंद्रीपणा?
या आजाराचं कारण सांगताना डॉ. शर्मा म्हणतात, “अमेरिका, युरोपमध्ये केलेल्या संशोधनानुसार असं लक्षात आलं आहे की, जगभरात 0.8 ते 1 टक्का लोक या नार्सिस्टिक डिसऑर्डरने पीडित आहेत. स्त्रियांपेक्षा पुरुषांमध्ये हा आजार अधिक प्रमाणात आढळतो.”
 
ते म्हणतात, “ही खरंतर व्यक्तिमत्त्वाशी निगडीत समस्या आहे. आपलं कुटुंब, मित्रमैत्रिणी, शेजारी या सगळ्यांच्या गुणांचा आपल्या व्यक्तिमत्त्वावर परिणाम होत असतो. आपल्या कुटुंबात कधीकधी अशी परिस्थिती येते जेव्हा लहान मुलाला वाटतं की आपल्याकडे लक्ष दिलं जात नाहीये, हीच भावना मग आजारात रुपांतरित होते.”
डॉ. कलरव मिस्त्रीही सांगतात, “जेव्हा मूल गर्भात असतं तेव्हापासून त्याची मनोवस्था, कौटुंबिक वातावरण, आई-वडिलांची वागणूक, मित्रमैत्रिणी या सगळ्यांची व्यक्तिमत्त्वाला आकार देण्यात भूमिका असते. 18 वर्षांपर्यंत कौटुंबिक स्थिती, आर्थिक चणचण, तणाव या गोष्टी मुलांच्या व्यक्तिमत्त्वाला आकार देतात.
 
“त्यामुळे जेव्हा ती व्यक्ती 35 वर्षांची होते, तेव्हा भूतकाळातील सर्व गोष्टींचा सूड घेण्याची भावना त्याच्यावर प्रभाव टाकते आणि तो आत्मकेंद्रीपणाकडे वळतो.”
 
लहान मुले, सोशल मीडिया आणि आत्मकेंद्रीपणा
14 वर्षीय आसमा कायम उदास असायची. ती इतकं खोटं बोलायची की, लोकांना कळून जायचं. काचेची भांडी किंवा मोबाइल फेकून तोडफोड करायची.
 
जेव्हा डॉक्टरांनी तिच्या दिनचर्येचा अभ्यास केला, तेव्हा त्यांनी पाहिलं की, ती दिवसातले सात ते आठ तास सोशल मीडियावर असते. तिच्या मित्रांनी ती भांडखोर असल्याचीही तक्रार केली होती.
 
डॉ. शर्मा सांगतात, “सोशल मीडियावर सक्रिय असलेले अनेक लोक आत्मकेंद्रीपणाचे बळी आहेत. सध्याच्या काळात डिजिटल कनेक्शन मोठ्या प्रमाणात वाढत आहेत. सामाजिक संपर्क कमी झाल्याने लोकांना एकटेपणा येतो. आत्मकेंद्री लोक सोशल मीडियावर फेक प्रोफाइल तयार करतात आणि सूड घेतात.”
 
उपचार कसा होतो?
अमेरिकन सायकॅट्रिक असोसिएशनच्या माहितीनुसार एक तो दोन टक्के अमेरिकन लोकांमध्ये आत्मकेंद्रीपणा आढळतो. वेगवेगळ्या देशात या रुग्णांची संख्या एक ते पाच टक्के आहे.
 
जागतिक पातळीवर मनोविकारांचं जे वर्गीकरण केलं आहे, त्याचे मुख्यत्वे दोन प्रकार आहेत - ICD-10 आणि DSM-5.
 
DSM-5 या प्रकाराला अमेरिकन सायकॅट्रिक असोसिएशनने प्रमाणित केलं आहे. त्यात आत्मकेंद्रीपणाचाही समावेश आहे.
 
डॉ. शर्मा सांगतात, “दोन्ही प्रकारचे वर्गीकरण काही विशिष्ट निकष वापरून तयार केले आहेत. त्या निकषांवर रुग्णांची चाचणी केली जाते. रुग्णाशी सविस्तर चर्चा केली जाते. त्याच्या कुटुंबीयांशीही चर्चा केली जाते.”
उपचाराबद्दल बोलताना ते सांगतात, “रुग्णाचं समुपदेशन कुटुंबाशी चर्चा करून केलं जातं. त्यानंतर त्याला सायकोथेरपी दिली जाते, समस्या फारच गंभीर असेल तर त्याला मनोविकारतज्ज्ञाकडे पाठवलं जातं. ते औषधंही देतात.”
 
तज्ज्ञांच्या मते, आत्मकेंद्रीपणा हा आजारच आहे असं गरजेचं नाही. अल्पकाळासाठी तो फायदेशीर असतो.
 
या आजारामुळे तुमची लोकप्रियताही वाढू शकतो. चांगली नोकरी मिळवण्यासाठी मदतही मिळू शकते. दीर्घकाळाचा विचार केला असता ती एक नकारात्मक गोष्ट आहे. यामुळे लहान मोठं संघर्ष होऊ शकतात.
 
संशोधनातून काय आले समोर?
सायकॉलॉजिकल बुलेटिन नावाच्या एका जर्नलमध्ये एक शोधनिबंध प्रकाशित झाला होता.
 
त्यासाठी याआधी झालेल्या 51 संशोधनाचा संदर्भ घेण्यात आला होता. त्यात 37 हजार 247 लोकांवर संशोधन करण्यात आलं. या संशोधनात भाग घेणाऱ्यांचं वय आठ ते 77 होतं.
जसं जसं लोकांचं वय वाढतं, तसं आत्मकेंद्री लोकांमध्ये सहानुभूती निर्माण होते, ते अधिक उदार होतात. असहमतीची धार जरा बोथट होते.
 
वयोमानानुसार आत्मकेंद्रीपणा कमी होतो. मात्र, व्यक्तिमत्त्वात बदल धीम्या गतीने होतो आणि थोडाच होतो.
 
डॉ. मिस्त्री सांगतात, “आत्मकेंद्रीपणा 18 ते 35 या वयात सर्वांत जास्त प्रमाणात असतो. कारण याच काळात करिअरचा नातेसंबंधाचा ताण असतो. 45-50 वर्षांचं झाल्यावर त्यांची मोठ्या जबाबदारीतून सुटका होते. मुलं मोठी होतात. त्यामुळे त्यांच्या व्यक्तिमत्त्वात एक प्रकारचा खजिलपणा येतो. त्यांचा स्वभाव दयाळू होतो. त्यांचा रागही बऱ्याच अंशी निघून गेलेला असतो. त्यामुळे वयोमानानुसार आत्मकेंद्रीपणा कमी होत जातो.
 
त्यांचं म्हणणं आहे, “जर एखाद्या व्यक्तीचा स्वभाव ऑफिसबरोबर घरातही अडचणीचं कारण ठरत असेल तर त्या व्यक्तीने तातडीने समुपदेशन घ्यायला हवं.”
Published By- Priya Dixit