शनिवार, 11 जानेवारी 2025
  1. लाईफस्टाईल
  2. आरोग्य
  3. आरोग्य लेख
Written By
Last Modified: मंगळवार, 31 मे 2022 (18:18 IST)

‘माझा नवरा सिगारेट ओढायचा पण मलाच कॅन्सर झाला’

NALINI SATYANARAYAN
स्वामीनाथन नटराजन
नलिनी यांनी कधीच धूम्रपान केलं नाही, पण त्यांच्या वैवाहिक आयुष्यात त्यांनी कायमच नवऱ्याने केलेल्या धुम्रपानाच्या धुरात श्वास घेतला. त्यांना थोरॅसिक कॅन्सर झाला.
 
नलिनी सत्यनाराण फक्त एकट्या नाहीयेत. जागतिक आरोग्य संघटनेनुसार दरवर्षी 12 लाख लोकांचा जीव पॅसिव्ह स्मोकिंग (इतरांनी केलेल्या धुम्रपानाचा धूर श्वासाव्दारे शरीरात घेणं) मुळे जातो.
 
"मी माझ्या नाकाने श्वास घेऊ शकत नव्हते. मी माझ्या मानेला असणाऱ्या स्टोमा नावाच्या एका छिद्रामधून श्वास घ्यायचे," 75 वर्षांच्या या आजी म्हणतात.
 
नलिनी यांनी आयुष्यात कधीही धूम्रपान केलं नाही पण त्या 33 वर्षं अशा माणसाशी संसार करत होत्या ज्यांनी कायम धूम्रपान केलं. 2010 साली त्यांना कॅन्सर झाल्याचं निदान झालं, तोवर त्यांच्या पतीचं निधन होऊन 5 वर्षं झाले होते.
 
"माझे पती चेन स्मोकर होते. याचा माझ्यावर परिणाम होईल ही कल्पनाच नव्हती मला. मला कायम वाटायचं की त्यांच्याच आरोग्यावर काहीतरी परिणाम होईल. मी त्यांना धूम्रपान थांबवायला सांगायचे पण त्यांनी माझं कधीच ऐकलं नाही," त्या म्हणतात.
 
नलिनी आता हैदराबादमध्ये राहातात.
 
घोगरा आवाज
एक दिवस नलिनी त्यांची नात जननीला गोष्टी सांगत होत्या, आणि त्यांच्या लक्षात आलं की त्यांचा आवाज घोगरा होतोय. थोड्या दिवसांनी त्यांना स्पष्ट बोलता येणं बंद झालं. त्यांना श्वास घ्यायला त्रास होत होता.
 
त्यांना थोरॅसिक कॅन्सर असल्याचं निदान झालं. डॉक्टरांनी त्यांचं स्वरयंत्र आणि थायरॉईड काढून टाकले.
 
"मला बोलता येत नव्हतं. खूप वाईट वाटलं तेव्हा. डॉक्टरांनी सांगितलं की आता माझा मुळ आवाज मला कधीच परत मिळणार नाही."
 
'सगळीकडे नळ्या होत्या'
जननी आता 15 वर्षांची आहे. गप्पा मारण्याची आवड असलेल्या आपल्या आजीला अचानक कसा त्रास झाला होता ते आठवून ती म्हणते, "तिला कॅन्सर असल्याचं कळल्यानंतर ती कित्येक आठवडे घरी नव्हती."
smoking
"ती घरी आली तेव्हा सगळीकडे नळ्या दिसत होत्या. तिच्या शरीरात, पोटात.. मी तेव्हा 4 वर्षांची होते. आम्हाला दिवसातून अनेकदा घर स्वच्छ करावं लागायचं. एक नर्स तिच्या दिमतीला होती. मला त्यावेळी या आजाराची गंभीरता लक्षात आली नाही. मला फक्त या सगळ्या गोष्टींची किळस यायची."
 
थोरॅसिक कॅन्सर
नलिनींना चांगली ट्रीटमेंट मिळाली आणि व्हायब्रेशन व्हॉईसबॉक्सच्या मदतीने त्या पुन्हा बोलायला लागल्या. पण आपल्या त्रासाचं कारण त्यांना माहिती होतं.
 
"मला माझ्या नवऱ्यामुळे कॅन्सर झाला."
 
"धुम्रपान करणारे विषारी धूर शरीरातून बाहेर काढून टाकत असतात. पण आमच्यासारखे, त्यांच्यासोबत सतत असणारे लोक तो विषारी धूर शरीरात ओढून घेत असतात," त्या म्हणतात.
 
कॅन्सरला कारणीभूत असणारे घटक
जागतिक आरोग्य संघटना ठामपणे सांगते की, "कोणत्याही प्रकारची तंबाखू शरीरासाठी हानिकारच आहे. अगदी लहानशा प्रमाणात जरी तंबाखू शरीरात गेली तर ते धोकादायकच आहे."
 
जागतिक आरोग्य संघटनेच्या यूरोपातल्या तंबाखू विभागात काम करणाऱ्या अँजेला चिबानू म्हणतात, "धूम्रपानातून बाहेर पडलेल्या धुरात 7000 हून जास्त केमिकल्स असतात आणि यातल्या 70 केमिकल्समुळे कॅन्सर होऊ शकतो."
 
तंबाखूच्या धुराने हृदयावर अक्षरशः चरे पडतात.
 
"धूम्रपानातून बाहेर पडलेल्या धुरात एक तास जरी श्वास घेतला तर आपल्या हृदयाच्या रक्तवाहिन्यांना इजा पोहचते आणि हार्ट अॅटॅकचा धोका वाढतो," त्या पुढे म्हणतात.
 
लहान मुलांचे मृत्यू
जागतिक आरोग्य संघटनेच्या एका आकडेवारीनुसार पॅसिव्ह स्मोकिंगमुळे जगात दरवर्षी साधारण 65 हजार लहान मुलांचा मृत्यू होतो.
 
धूम्रपानातून बाहेर पडलेल्या धुरात श्वास घेणाऱ्या मुलांना कानाचं इंफेक्शन होण्याचा धोका असतो ज्यामुळे त्यांची ऐकण्याची क्षमता संपुष्टात येऊ शकते किंवा बहिरेपण येऊ शकतं.
 
"लहान मुलांना श्वसन संस्थेचे गंभीर आजार होण्याची शक्यता 50 ते 100 टक्क्यांनी वाढते. त्यांना दमा होण्याची शक्यता वाढते आणि अनेकदा लहान अर्भकांचा मृत्यू होऊ शकतो," अँजेला म्हणतात.
 
धूम्रपानावर बंदी
 
जागतिक आरोग्य संघटनेचं म्हणणं आहे की धूम्रपान करणारे आणि न करणारे दोघांना वाटतं की धूम्रपानावर बंदी घालावी. "धूरापासून मुक्त वातावरण हाच एक रस्ता आहे धूम्रपान न करणाऱ्यांच्या आरोग्याचं रक्षण करण्याचा," अँजेला म्हणतात.
 
"कोणालाही तुमच्या किंवा तुमच्या मुलांच्या जवळ धुम्रपान करू देऊ नका. स्वच्छ हवा हा प्राथमिक मानवाधिकार आहे."
 
पण तंबाखू उत्पादनांवर बंदी घालणं इतकं सोपं नाहीये. ग्रँड व्ह्यू रिसर्च संस्थेने केलेल्या एका विश्लेषणात समोर आलंय की जगभरात तंबाखू इंडस्ट्रीत 850 अब्ज डॉलर्सची उलाढाल होते.
 
हा आकडा आफ्रिकेतल्या सगळ्यात जास्त लोकसंख्या असलेल्या नायजेरिया देशाच्या जीडीपीपेक्षा दुप्पट आहे.
 
पण तंबाखू कंपन्या शक्य तितके प्रयत्न करून, लॉबिंग करून धुम्रपानावर बंदी आणण्याचे प्रयत्न हाणून पाडतात.
 
अनेकदा त्यांचे हे प्रयत्न यशस्वीही होतात.
 
'नवऱ्याबद्दल राग नाही'
हैदराबादमध्ये नलिनी जे घडलं त्याबद्दल आपल्या नवऱ्याला दोष देत नाहीत. तंबाखू कंपन्यांविरोधात कायदेशीर कारवाई करण्याचाही त्यांचा मानस नाहीये. पण त्यांना अजूनही मानेतल्या छिद्रातून श्वास घ्यावा लागतो आणि त्या फक्त मऊ अन्न खाऊ शकतात.
 
पण तरीही त्या स्वतंत्र आयुष्य जगायला शिकल्या आहेत. त्या स्वतःला कॅन्सरयोद्धा म्हणवतात.
 
आपल्या आयुष्यात कॅन्सर नाही तर आपण जिंकलोय हे दाखवायला त्या कॅरिनेट हे वाद्य वाजवायला शिकल्या आहेत.
 
त्या आता जास्तीत जास्त वेळ आपल्या नातवंडांसोबत घालवतात. जननीला प्राण्यांची डॉक्टर व्हायचं आहे. ती अनेकदा आपल्या आजीकडून विज्ञानाचे धडे घेत असते.
 
"मला आजीचा अभिमान आहे. ती सगळ्यांसाठी प्रेरणा आहे. तिच्यासारखी हसतमुख आजी मी पाहिली नाही."
 
नलिनी शाळा, कॉलेज, सभा आणि अनेक ठिकाणी जाऊन पॅसिव्ह स्मोकिंगच्या धोक्यांविषयी जनजागृती करत असतात. अनेकदा लोकांना सावध करण्यासाठी त्या स्वतःची कहाणी सांगतात.
 
आपल्या आजारीपणासाठी, त्रासासाठी त्या पतीला दोष देत नाहीत.
 
"जे झालं त्यावर रडून काहीच होणार नव्हतं. त्याने माझा प्रश्न सुटणार नव्हता. मी सत्य स्वीकारलं आणि माझ्या आजारीपणाबद्दल बोलायला मला कधी लाज वाटली नाही."