शनिवार, 12 ऑक्टोबर 2024
  1. लाईफस्टाईल
  2. आरोग्य
  3. आरोग्य लेख
Written By
Last Updated : रविवार, 2 एप्रिल 2023 (15:42 IST)

ऑटिझम म्हणजे काय, आई-बाबांनी आपल्या बाळाचं कसं निरीक्षण करावं?

आपण ऑटिझम हा शब्द अनेकदा ऐकतो. ऑटिझम या आरोग्य स्थितीबद्दल आपण येथे जाणून घेणार आहोत.
ऑटिझमचं पूर्ण नाव ऑटिझम स्पेक्ट्रम डिसॉर्डर असं आहे. याला ऑटिझम स्पेक्ट्रम कंडिशन असंही म्हणतात. याची तीव्रता व्यक्तीनुरुप बदलते. ऑटिझम असणारी व्यक्ती त्यांच्याआजूबाजूच्या स्थितीला कसा प्रतिसाद देते, कसा संवाद साधते, कसे वागते यानुसार त्यात फरक पडत असतो.
 
हा कोणताही आजार नाही तर ती एक जन्मतःच मिळालेली आरोग्याची स्थिती असते. ही स्थिती दीर्घकाळ राहाते.
 
एखाद्या व्यक्तीला फक्त पाहून तिला ऑटिझम आहे की नाही हे सांगता येत नाही. मुलांना जन्मतःच ऑटिझम कसा असतो याचं कारण माहिती नसलं तरी त्यावर भरपूर संशोधन झालेलं आहे.
 
2 एप्रिल हा ऑटिझम अवेअरनेस डे म्हणून पाळला जातो.
 
ऑटिझमचा लोकांच्या आयुष्यावर कसा परिणाम होतो?
ऑटिझमचा परिणाम व्यक्तीनुरुप वेगवेगळ्या प्रकारे बदलत असल्यामुळे त्याचं निदान करण्यास वेळ जातो. त्याच्या लक्षणांची ठोस अशी यादी नाही. तरीही काही
 
ऑटिझम लक्षणांकडे लक्ष देता येईल.
 
* ऑटिझम असणाऱ्या व्यक्तीला इतरांशी संवाद साधण्यात अडथळा येऊ शकतो
* इतर लोक कसा विचार करतात किंवा त्यांना काय वाटतं हे समजण्यात त्यांना अडथळे येऊ शकतात.
* प्रखर उजेड किंवा गोंगाटाचा त्यांना वाजवीहून जास्त त्रास होऊ शकतो, अशा स्थितीत त्यांना अस्वस्थ वाटतं
* नव्या घटना किंवा सामाजिक कार्यक्रमांमध्ये ते गोंधळू शकतात, त्यामुळे अस्वस्थ होऊ शकतात.
* काही गोष्टी समजण्यासाठी जास्त वेळ लागू शकतो
* काही गोष्टी ते वारंवार करतात किंवा एकच विचार वारंवार करतात.
 
ऑटिझमबद्दल माहिती देताना युनायटेड किंग्डमची आरोग्यसेवा एनएचएस सांगते, “ऑटिझम हा आजार नाही. ऑटिस्टिक असणं म्हणजे तुम्हाला काही आजार, रोग नाही. ऑटिझम असणाऱ्या लोकांचा मेंदू इतरांपेक्षा वेगळ्याप्रकारे काम करतो. त्याची लक्षणं अगदीच जास्त काही चुकत असेल तर लक्षात येतात. ऑटिझम आयुष्यभर राहातो. ही काही वैद्यकीय स्थिती नसल्यामुळे त्यावर उपचार करुन बरं वगैरे करणं असा भाग नसतो तर अशा व्यक्तींना मदत काही गोष्टी करण्यासाठी मदतीची गरज असते.”
एनएचएसची माहिती सांगते, ऑटिस्टिक व्यक्ती नीट आयुष्य जगू शकते. काही गोष्टींमध्ये या व्यक्ती सरस असतात, तर काही गोष्टींमध्ये त्यांना थोडा त्रास होतो.
 
ऑटिस्टिक असणं म्हणजे तुम्ही कधीच लोकांशी मैत्री करू शकत नाही किंवा नातेसंबंध जुळवू शकत नाही किंवा नोकरी करू शकत नाही असं नाही. पण कदाचित तुम्हाला या गोष्टी करण्यासाठी थोड्या मदतीची गरज भासू शकते.
 
काही ऑटिस्टिक व्यक्तींना आजिबात मदतीची गरज लागत नाही, काही व्यक्तींना थोड्याश्या मदतीची गरज लागते. तर काही लोकांना रोज मदतीची गरज लागते.
ऑटिझमची चिन्हं
ऑटिझम असल्याची काही चिन्हं मुलांमध्ये दिसतात ती कशी ओळखायची याबद्दल एनएचएसने सूचना दिल्या आहेत.
 
लहान मुलांमध्ये दिसणारी ऑटिझमची चिन्हं
 
* हाक मारल्यावर प्रतिसाद न देणं
* नजर न देता बोलणं
* त्यांच्याकडे पाहून स्मितहास्य केल्यावर न हसणं
* काही चवी, वास किंवा आवाज न आवडल्यास एकदम अस्वस्थ होणं
* काही गोष्टी सतत करत राहाणं जसं की हाताचा, बोटांचा चाळा, * शरीर हलवत राहाणं
* इतर लहान मुलांसारखे न बोलणं
* काही शब्द पुन्हापुन्हा वापरणं
* मोठ्या मुलांमध्ये दिसणारी ऑटिझमची चिन्हं
* इतर लोक काय विचार करत आहेत हे न समजणं
* काही शब्द पुन्हापुन्हा वापरणं
* ठराविक साचेबद्ध दैनंदिन आयुष्य आवडणं, त्यात थोडाही बदल झाल्यास अस्वस्थ होणं
* काही वस्तूंवर, क्रियांवर विशेष प्रेम असणं
* स्वतःहून नवे मैत्र शोधणं, मैत्री करणं कठीण जाणं
* काही गोष्टींचा शब्दशः अर्थ घेऊन कृती करणं
* आपल्याला काय होतंय हे सांगण्यात असमर्थता जाणवणं.
 
पालकांची भूमिका सर्वांत जास्त महत्त्वाची
ऑटिझमची लक्षणं ओळखण्यासाठी सर्वांत जास्त महत्त्वाची भूमिका पालकांना बजावावी लागते. आपलं बाळ कशा हालचाली करत आहे, ते कशाप्रकारे वर्तन करत आहे यावर त्यांनी लक्ष ठेवून त्यातले बदल नोंदवले पाहिजेत.
 
याबद्दल मुंबईतील बालरोगतज्ज्ञ डॉ. गीतांजली शहा बीबीसी मराठीशी बोलताना म्हणाल्या, “मुलाला हाक मारली की ते प्रतिसाद देतं का, नजरेला नजर देतं का याकडे पाहिलं पाहिजे. एखाद्या सामाजिक कार्यक्रमात, घरात पाहुणे आल्यावर त्याचं वर्तन कसं आहे याकडे पालकांनी लक्ष ठेवावं. साधारण सहा महिन्यांच्या बाळाला मिठी मारली, पापी घेतली तर त्याची प्रतिक्रिया कशी आहे.. दहा अकरा महिन्याच्या बाळाचे वडील ऑफिसातून आल्यावर ते कसं व्यक्त होतंय किंवा व्यक्त होत नाही याकडे लक्ष देणं गरजेचं आहे.”
डॉ. शहा सांगतात, “ऑटिस्टिक मुलं इतरांसारखीच हुशार असतात, इथं कोणताही इंटेलिजन्सचा मुद्दा नाही. फक्त त्यांचे वर्तन आधीच ओळखून त्यांना गरज लागली तर मदत करावी लागते. पालकांबरोबर प्ले स्कूल किंवा शाळेतील शिक्षकांचीही भूमिका महत्त्वाची आहे. शाळेत एखादी घटना घडली तर मुलाची प्रतिक्रिया कशी आहे याबद्दल ते नीट सांगू शकतात, उदाहरणार्थ एखादं मूल शाळेत पडलं तर सगळी मुलं त्याच्याकडे धावत गेली, पण हे मूल मात्र तिकडे गेलंच नाही, असं वारंवार होत असेल तर त्या शिक्षकांनी पालकांना याबद्दल सांगावं. काहीवेळेस भिंतीवर सतत डोकं आपटणं, स्वतःची त्वचा, स्वतःचे केस ओढणे, स्वतःला चावणे अशा क्रिया करतात, त्याकडेही लक्ष देणं फारच आवश्यक आहे.”
 
ऑटिस्टिक मुलांच्या मदतीबद्दल सांगताना डॉ. शहा म्हणाल्या, “या मुलांना मदत करण्यासाठी चांगल्या थेरपी उपलब्ध आहेत. मुलाला आधी श्रवणयंत्रणेचा काही त्रास आहे का हे सुद्धा तपासलं जातं आणि मग पुढची मदत केली जाते. पालकांनी आपल्या बाळाच्या हालचालींची व्यवस्थित नोंद ठेवणं हेच याबाबतीत अधिक महत्त्वाचे आहे.”

Published By- Priya Dixit