रविवार, 26 जानेवारी 2025
  1. लाईफस्टाईल
  2. आरोग्य
  3. आरोग्य सल्ला
Written By
Last Modified: शनिवार, 27 जून 2020 (06:54 IST)

Diabetes Awakening Day : मधुमेह म्हणजे काय?

रक्तातील साखरेचे प्रमाण असंतुलित होणे किंवा वाढणे म्हणजेच मधुमेह. आपण जे अन्न खातो, त्याचे शरीराला आवश्यक ऊर्जेसाठी साखरेत (ग्लुकोज) रुपांतर होते. आपल्या जठराजवळ असणार्‍या पॅनक्रियाज् या अवयवातून पाझरणार्‍या इन्शुलिन या हार्मोनमुळे तयार झालेली साखर शरीराच्या पेशींत सामावले जाण्याची प्रक्रिया घडत असते. मधुमेह झालेल्या व्यक्तींत एकतर इन्शुलिन तयार होण्याची प्रक्रिया मंदावलेली किंवा थांबलेली असते. हव्या त्या प्रमाणात इन्शुलिन तयार न झाल्यामुळे शरीरातील साखरेचे प्रमाण वाढू लागते. मधुमेहामुळे अंधत्व, हृदयविकार किंवा मूत्राशयाचे विकार उद्‍भवू शकतात. 
 
मधुमेहाची लक्षणे काय?
सातत्याने लघवीची भावना होणे, 
नेहमी तहान लागल्यासारखे वाटणे, 
अचानकपणे वजन घटणे, 
प्रचंड भूक लागणे, 
दृष्टीमध्ये लक्षणीय बदल, 
हात किंवा पायात सतत चमकल्यासारखे किंवा गुदगुल्यांची भावना होणे, 
बरेचदा थकल्यासारखे वाटणे, 
त्वचा एकदम कोरडी होणे, 
जखमा बर्‍या होण्यास वेळ लागणे, 
नेहमीपेक्षा अधिक वेळा संसर्ग होणे ही मधुमेहाची काही ठळक लक्षणे आहेत. 
याखेरीज मळमळल्यासारखे वाटणे, उलटीची भावना होणे 
पोटात अचानक दुखल्यासारखे वाटणे अशीही लक्षणे जाणवू शकतात.
 
मधुमेहावर उपचार कोणते?
संतुलित व आरोग्यदायी आहार, शारिरिक व्यायाम आणि इन्शुलिनची इंजेक्शन हे टाइप-१ मधुमेहासाठीचे मूलभूत उपचार असतात. घेतल्या जाणार्‍या इन्शुलिनचे प्रमाण हे आहार व विहार या गोष्टींशी संतुलित ठेवण्याची गरज असते. साखरेचे प्रमाणही अगदी बारकाईने तपासत राहिले पाहिजे.
 
टाइप-२ मधुमेहामध्येही आरोग्यदायी आहार, व्यायाम आणि रक्तातील साखरेचे प्रमाण तपासत राहणे या उपचारांची गरज असतेच, शिवाय इन्शुलिन किंवा ओरल मेडिकेशन अथवा दोन्हींच्या एकत्रित उपचारांची गरज असते.
 
स्वत:ची दैनंदिन काळजी घेणे, त्याचप्रमाणे साखरेचे पातळी फारच खालावणार नाही किंवा प्रमाणापेक्षा वाढणार नाही, याची दक्षताही मधुमेहाच्या रुग्णांनी घेणे अत्यावश्यक असते. त्यासाठी मधुमेहाच्या रुग्णांनी त्यांची व्यवस्थित तपासणी करणारा (मॉनिटर) तसेच व्यवस्थित मार्गदर्शन करणार्‍या, शिकविणार्‍या डॉक्टरचा सल्ला व उपचार घेतले पाहिजेत. मधुमेहाच्या दैनंदिन उपचारासाठी ही बाब आवश्यक आहे.
 
सुयोग्य आहार व व्यायाम यांची जोड मिळाली की, शरीराचा विकास नियोजित आराखड्यानुसार होते. शरीराची ठेवण व विकास मानवामध्ये असलेल्या गुणसूत्रांच्या रचनेतील आराखड्यानुसार होत असते.
 
स्त्रोत- महान्यूज