चहा भारतीय माणसांना विलक्षण प्रिय. इंग्रज जाऊन सत्तर वर्ष झाली तरी इंग्रजांनी लावलेली चहाची सवय आजही देशावर अधिराज्य गाजवत आहे. घरात, कचेरीत, प्रवासात, टीव्ही बघताना, क्रिकेटचा सामना पाहताना किंवा अन्य कुठल्याहीवेळी चहा प्रत्येकाला हवाच असतो. आदरातिथ्य करण्याचा उत्तम मार्ग म्हणजे चहा पाजणे.
थंडीत चहा पिण्याची लज्जत आणखीनच वाढते. मात्र हा चहा अनारोग्यकर ठरू नये, यासाठी आपण योग्य चहाची निवड करायला हवी. अति सर्वत्र वर्जयेत या उक्तीप्रमाणे चहाचे प्रमाण दिवसाला दोन कपापर्यंतच मर्यादित ठेवायला हवे आणि चहाचा अतिरेक टाळायला हवा.
ब्लॅक टी - भारतात घरोघरी दररोज पिला जातो. त्या चहाला ब्लॅक टी म्हटले जाते. कॅमेलिया सानेन्सिस या वनस्पतीची पाने दळून हा चहा तयार केला जातो. चिनी वैद्यकात या चहाचा वापर ह्रद्रोगचिकित्सेसाठी केला जातो. या चहात थिओफायलिन असते. ते श्र्वसनवाहिनंना विस्फरित करते. त्यामुळे हा चहा दम्यासारख्या
श्र्वसनविकारात उपयोगी समजला जातो. मात्र या चहात कॅफिनचे प्रमाण अधिक असते. त्यामुळे हा चहा जगभर तसा बदनाम झाला आहे. तरीही भारतात तोच सर्वाधिक लोकप्रिय आहे. अनेक भारतीय लोक ऋतू, स्वतःचे वजन, प्रकृती व जीवनशैली लक्षात न घेता या चहाचे बेसुमार प्रमाणात सेवन करतात व त्याच्या दुष्परिणामांचे शिकार होतात. हा चहा बनवताना भारतात जितकी साखरवापरली जाते तितकी अन्य कुठल्याही देशात वापरली जात नाही. त्यामुळे भारतीय चहाबहाद्दर स्थौल्य, मधुमेह, हाकोलेस्टेरॉल अशा व्याधींचेही शिकार होतात.
गवती चहा - लेमनग्रास या नावाने प्रसिद्ध असणारा चहा अनेकांच्या बागेत लावलेला असतो. थंडीत पिण्यासाठी गवती चहा उत्तम. हिवाळ्यात होणारे सर्दी, खोकला, ताप वगैरे त्रास गवती चहाने टळतात व झाले असल्यास बरे होतात. हा चहा लोह, तांबे, जस्त, कॅल्शिम, मॅग्रेशियम, मँगेनीज, पोटॅशियम आदि द्रव्यांनी तसेच ब 1, 5 व 6
अशा जीवनसत्त्वांनी समृद्ध असतो. यात लोह असल्याने तो अॅनेामियाच्या रुग्णांना उपयोगी पडतो. पोटॅशियम असल्याने तो उच्च रक्तदाबाच्या रुग्णांसाठीही उत्तम ठरतो.
मॅग्नेशियम, फॉस्फोरस व फॉलेट असल्यामुळे मज्जासंस्थेसाठी गवती चहा उपयोगी पडतो. मेंदूची एकाग्रता, स्मरणशक्ती व क्षमता चहामुळे वाढते. तसेच थकवा दूर होतो व तरतरी येते. गवती चहामुळे शरीरातील विषारी द्रव्ये बाहेर फेकली जातात. कॅन्सरच्या पेशीदेखील मारल्या जातात. या चहामुळे स्वादुपिंडाचे कार्य सुधारते व मधुमेही रुग्णांची साखर कमी होते. गवती चहाने पचनशक्ती सुधारते. गॅसेस, पोटदुखी, मलावरोध, कॉलरा आदी त्रास दूर व्हायला मदत होते. या चहात असणारे तेल जंतू, कृमी व फंगस यांचा नाश करते.
ग्रीन टी - हा चहा जगभर प्रसिद्ध आहे. ब्लॅक टी ज्या वनस्पतींपासून बनवला जातो त्याच वनस्पतीपासून हा चहाही बनवला जातो. मात्र हा चहा बनवण्याची प्रक्रिया वेगळी असते. त्यामुळे ग्रीन टीमध्ये कॅफिनचे प्रमाण तुलनेने कमी असते. इर्जासिजी नावाची अँटिऑक्सिडंटस् यात जास्त असतात. या कारणास्तव ग्रीन टी आरोग्दायी समजला जातो व जगात मोठ्या प्रमाणात पिला जातो. या चहात फ्ल्युराईड असते व ते दाताचे रक्षण करते. अल्जायमर्स डिसीज, पार्किन्सन्स डिसीज, पॅरेलिसिस या मज्जासंस्थेच्या आजारांपासून आणि कर्करोगापासून हा चहा संरक्षण करतो.
व्हाईट टी - पांढरा चहादेखील कॅमेलिया याच वनस्पतीपासून बनवला जातो. यातही कॅफिनचे प्रमाण ब्लॅक टी पेक्षा कमी असते. हा चहा रोगप्रतिकारकशक्ती वाढवतो व जंतूंपासून बचाव करतो. तसेच तो रक्तदाब निंत्रणात ठेवतो. त्वचा सुंदर बनवतो व कोलेस्टेरॉल कमी करतो. हा चहा कर्करोगापासून संरक्षण करतो, असेही म्हटले जाते.
ऊलाँग टी - हा चीनधील परंपरागत चहा आहे. तो बनवण्याची खास पद्धत असते. या चहात असणारे नायासिस हे जीवनसत्त्व शरीरातील विषद्रव्ये दूर करते व दात किडू देत नाही. हा चहा हाडांची ताकद, तसेच गप्रतिकारकशक्ती वाढवतो. त्याचप्रमाणे रक्तातील साखर व ट्राग्लिसेराईडस् नियंत्रणात ठेवतो.
फर्मेंटेड टी - हा चहा नैसर्गिक पद्धतीने आंबवला जातो. त्यात प्रोबायोटिक्स व अँटिऑक्सिडंटस् अधिक असतात. त्यामुळे तो अनेक रोगांपासून वाचवतो. अॅसिडिटीचा त्रास असणार्यांनी हा चहा टाळावा.
कॅमोमिल टी - हा चहा कॅमोमिल या झाडापासून बनवला जातो. याचे अनेक गुणधर्म असल्याने हा चहा परदेशात लोकप्रिय आहे. तो पचनसंस्थेचे कार्य सुधारतो व रोग दूर करतो. तोंड आले असेल तर ते बरे होते. या चहाने झोप चांगली येते. मधुमेहाच्या दुष्परिणामांपासून व कर्करोगापासून बचाव होतो.
चहाचे असे अनेक प्रकार आहेत. ब्लॅक टी पेक्षा ते अधिक आरोग्यदायी आहेत. तरीही आपण भारतीय ब्लॅक टीलाच चिकटून राहातो.
डॉ. अभिजित म्हाळंक