1. लाईफस्टाईल
  2. आरोग्य
  3. आरोग्य सल्ला
Written By
Last Updated : मंगळवार, 25 एप्रिल 2023 (14:34 IST)

थोडं काम, थोडी हालचाल; डायबेटिस नियंत्रणात ठेवण्यासाठी 'या' गोष्टी करा

diabetes
दर अर्ध्या तासाला उठून तीन मिनिटं चाललं तर त्यामुळे रक्तातली साखरेची पातळी सुधारु शकते असं संशोधकांना आढळलं आहे. युकेत झालेल्या डायबेटिस चॅरिटी कॉन्फरन्समध्ये सादर करण्यात आलेल्या छोट्या चाचणीत हे स्पष्ट झालं.
 
डायबेटिस टाईप 1 असलेल्या 32 लोकांची पाहणी करण्यात आली. सात तासांच्या कालावधीत या 32 लोकांनी चालण्यासाठी विश्रांतीचा उपयोग केला तेव्हा त्यांच्या रक्तातली साखरेची पातळी कमी झाल्याचं स्पष्ट झालं.
 
डायबेटिस युकेने म्हटल्याप्रमाणे चालण्याफिरण्याचा विरंगुळा अतिशय व्यवहार्य आणि खर्चाविना बदल घडवून आणू शकतो.
 
युकेत 400,000 लोकांना टाईप1 डायबेटिस हा आजार आहे.
 
शरीरातल्या रोगप्रतिकारक यंत्रणा स्वादुपिंडातील इन्शुलिनची निर्मिती करणाऱ्या पेशींवर आक्रमण करतात तेव्हा ही व्याधी जडते.
 
त्यामुळे स्वादुपिंडातून इन्शुलिनची निर्मिती होऊ शकत नाही. यामुळे रक्तातली साखरेची पातळी वाढते. यामुळे डायबेटिसच्या रुग्णांना वारंवार इन्शुलिनचे इंजेक्शन घ्यावं लागतं.
 
चालताचालता मोबाईल फोनवर बोलणं
सातत्याने रक्तातली साखरेची पातळी अधिक राहिली तर किडनी काम करणं बंद होऊ शकतं. डोळ्यांनी दिसण्यात अडथळा येऊ शकतो. हृदयविकाराचा झटकादेखील येऊ शकतो.
 
डायबेटिस युकेचे संशोधक संचालक डॉ. एलिझाबेथ रॉबर्टसन यांनी संशोधनाला निधी उपलब्ध करुन दिला होता. टाईप1 डायबेटिसच्या रुग्णांना रोज रक्तातली साखरेची पातळी नियंत्रित राखणं हे एक मोठंच काम होऊन बसतं.
 
"या संशोधनामुळे एक अतिशय सोपा, सुटसुटीत पर्याय डायबेटिसच्या रुग्णांना उपलब्ध झाला आहे. चालता चालता फोनवर बोलणं किंवा कामादरम्यान चालण्यासाठी ब्रेक घेण्यासाठी अलार्म लावणं असं करता येऊ शकतं. सलग प्रदीर्घ एकाच जागी बसून काम करणं अपायकारक ठरू शकतं. बसून काम केल्यामुळे रक्तातल्या साखरेच्या पातळीवर विपरीत परिणाम होतो," असं त्यांनी सांगितलं.
 
"शरीराची हालचाल झाल्यामुळे रक्तातल्या साखरेच्या पातळीत काय बदल होतात यासंदर्भात आणखी संशोधन करण्याचा आमचा प्रयत्न आहे", असं त्या म्हणाल्या.
सुदरलँड विद्यापीठातील प्रमुख संशोधक डॉ. मॅथ्यू कॅम्पबेल यांनी सांगितलं, "शरीराची मर्यादित हालचाल असेल तर काय परिणाम होऊ शकतात याने आश्चर्यचकित झालो",
 
"टाईप1 डायबेटिस रुग्णांपैकी अनेकांसाठी अक्टिव्हिटी स्नॅकिंग म्हणजेच नियमित अंतराने विश्रांती घेणं, चालत चालता कॉल घेणं हा चांगला पर्याय ठरु शकतो".
 
"महत्त्वाचं म्हणजे खूप व्यायाम केल्यामुळे रक्तातली साखरेची पातळी अचानक खालावण्याचा धोका यामध्ये नाही".
 
चाचणीच्या पहिल्या टप्प्याचे निष्कर्ष अद्याप प्रसिद्ध झालेले नाहीत. या टप्प्यात सलग 7 तास बसून काम करणाऱ्या 32 लोकांची पाहणी करण्यात आली.
 
एका सत्रात त्यांनी बसून काम केलं. दुसऱ्या सत्रात त्यांनी सात तासांची विभागणी केली. यामध्ये दर अर्ध्या तासाला तीन मिनिटं वेगवान चालण्याचा व्यायाम केला.
 
त्यांच्या रक्तातल्या साखरेच्या पातळीवर 48 तास लक्ष ठेवण्यात आलं. सत्राच्या सुरुवातीला, चालण्यापूर्वी, चालण्यानंतर परीक्षण करण्यात आलं. सगळ्यांना एकाच स्वरुपाचं खायला देण्यात आलं. त्यांचे इन्शुलिन उपचार बदलण्यात आले नाहीत.
 
सातत्याने चालण्यासाठी ब्रेक घेतल्याने रक्तातली साखरेची पातळी (6.9 mmol/l) कमी राहिली. 48 तासांदरम्यान जेव्हा हे सगळे बसून होते तेव्हा त्यांच्या रक्तातली साखरेची पातळी (8.2 mmol/l) राहिली.
 
चालण्याच्या ब्रेकमुळे रक्तातली साखरेची निर्धारित पातळी गाठायला त्यांना कमी वेळ लागला.
 
हे संशोधन मोठ्या चमूवर आणि अधिक कालावधीसाठी करायचं आहे जेणेकरुन याचे फायदे लक्षात येतील असं डॉ. कॅम्पबेल यांनी सांगितलं. दिवसात अधिकाअधिक साध्या सोप्या हालचालींच्या माध्यमातून योग्य साखरेची पातळी राखता येणं हे उद्दिष्ट आहे.
 
डायबेटिस काय आहे?
डायबेटिस अर्थात मधुमेह या आजारात रक्तातली साखरेची पातळी जास्त होते. डायबेटिस दोन प्रकारचे असतात. टाईप 1 मध्ये इन्शुलिनची निर्मिती करणाऱ्या पेशींवर शरीरातली रोगप्रतिकारक यंत्रणा हल्ला करते.
 
टाईप2 मध्ये शरीरात पुरेशा प्रमाणात इन्शुलिनची निर्मिती होत नाही. शरीरातल्या पेशी इन्शुलिनला प्रतिसाद देत नाहीत. टाईप2 डायबेटिसचं प्रमाण टाईप1च्या तुलनेत अधिक आहे.
 
 
Published By- Priya Dixit