गुरूवार, 28 मार्च 2024
  1. लाईफस्टाईल
  2. आरोग्य
  3. आरोग्य सल्ला
Written By
Last Modified: बुधवार, 22 सप्टेंबर 2021 (08:58 IST)

डोहाळे का लागतात? कारण ऐकून व्हाल थक्क!

व्हेरोनिक ग्रीनवुड
एखाद्याला एखादा विशिष्ट पदार्थ खायची तीव्र इच्छा झाली की आपण सहज म्हणून जातो - डोहाळे लागले का? खरंतर डोहाळे लागतात गर्भवती स्त्रीला...
 
गरोदरपणाच्या नऊ महिन्यात एखादा पदार्थ खूप आवडत असतो. कुणाला आंबट खायची इच्छा होते, तर कुणाला गोड. काही स्त्रियांना तर झणझणीत ठेचाच खावासा वाटतो. कुणाला गारेगार आईसक्रीम आवडतं, तर कुणाला एखाद्या विशिष्ट ब्रँडचं चॉकलेट.
 
पाणीपुरी, बर्फाचा गोळा अगदी कशाचेही डोहाळे लागू शकतात. इतकंच कशाला काही विचित्र आणि गमतीशीर डोहाळेसुद्धा असतात. काहींना माती, खडू, अगदी सिगारेटी ओढण्याचेही डोहाळे लागल्याचं तुम्ही ऐकलं असेल.
 
बरं डोहाळे काही जेवणाच्या वेळातच लागतात, असंही नाही. अगदी वेळी-अवेळी, अपरात्रीसुद्धा एखाद्या गरोदर बाईला काहीतरी खाण्याची अतीव इच्छा होते. मग नवरा दुकानांमध्ये चकरा मारून तो पदार्थ आणून देतो आणि ते खाल्यावर त्या स्त्रिला अगदी मनापासून तृप्ती मिळत असते.

पोटातल्या बाळाला एखादा पदार्थ खाण्याची इच्छा झाली आणि म्हणून ती आईला जाणवते, असं आपल्याच नाही तर जगातल्या इतरही अनेक संस्कृतींमध्ये मानलं जातं. तर काहींच्या मते आई आणि तिच्या पोटातल्या बाळाला एखादं पोषणतत्त्व मिळत नसेल, तर ते पोषणतत्त्वं असणाऱ्या पदार्थाचे डोहाळे लागतात. यातून एखाद्या विशिष्ट पोषकद्रव्याची कमतरता भरून निघत असते. काही जण असंही सांगतात की गरोदरपणात शरीरात होणाऱ्या हार्मोनल बदलांमुळे डोहाळे लागतात.
 
मात्र, डोहाळ्यांसंबंधी झालेल्या शास्त्रीय संशोधनावर नजर टाकली तर डोहाळे लागण्यामागचं कारण समजू शकेल.
 
प्रत्येक संस्कृतीतले डोहाळे वेगवेगळे असतात. उदाहरणार्थ-अमेरिका आणि ब्रिटनसारख्या इंग्रजी संस्कृतीतल्या स्त्रियांना जे डोहाळे लागतात ते बिगर इंग्रजी संस्कृतीतल्या स्त्रियांना लागत नाहीत.
 
भारतीय संस्कृतीत महिलांना चिंच, लोणचं, पाणीपुरी अशा खास भारतीय आणि आंबट पदार्थांचे डोहाळे लागतात, तर जपानमध्ये बहुतांशी स्त्रियांना भाताच्या पदार्थांचे डोहाळे लागतात.
 
डोहाळे लागलेल्या पदार्थातून पोषकतत्त्वं मिळतात?
होणाऱ्या आईला ज्या पदार्थांचे डोहाळे लागतात त्यातून गरोदरपणात आवश्यक असलेली काही विशिष्ट पोषकतत्त्वं मिळतात का? यावर संशोधन करण्यात आलं. प्रयोगाअंती या प्रश्नाचं उत्तर नकारार्थी मिळालं. उलट सर्वसाधारणपणे ज्या पदार्थांचे डोहाळे लागतात ते खाल्ल्याने गरजेपेक्षा जास्त वजन वाढतं आणि बाळंतपणात अडचणी उद्भवू शकतात, असं संशोधकांचं म्हणणं आहे.
 
डोहाळे लागण्यामागे बायोकेमिकल गरजेव्यतिरिक्त आणखीही कारणं असू शकतात. अल्बेनीमधल्या स्टेट युनिव्हर्सिटी ऑफ न्यूयॉर्कमध्ये मानसशास्त्राच्या प्राध्यापिका असलेल्या ज्युलिया होर्मेस यांनी एखादा विशिष्ट पदार्थ खाण्याची अनावर इच्छा का होते, यावर बराच अभ्यास केला आहे. त्या सांगतात अमेरिकेत 50% स्त्रियांना मासिक पाळीच्या एक आठवडाआधी चॉकलेट खायची खूप इच्छा होते. मासिकपाळीसाठी आवश्यक असणाऱ्या एखाद्या विशिष्ट पोषकद्रव्यासाठी म्हणून चॉकलेट खायची इच्छा होते की केवळ हार्मोन्समध्ये होणाऱ्या बदलांमुळे, हेदेखील शास्त्रज्ञांनी शोधण्याचा प्रयत्न केला.
 
यासंबंधी संशोधकांनी एक प्रयोग केला. या प्रयोगात काही स्त्रियांना डबे देण्यात आले. आपापला डबा उघडून त्यात जे असेल ते खायला सांगितलं. यापैकी काही डब्यांमध्ये मिल्क चॉकलेट होतं.
 
चॉकलेटमध्ये सामान्यपणे जी पोषकद्रव्यं आढळतात, ती या चॉकलेटमध्येही होती. मिल्क चॉकलेटमध्ये कोकोआ सॉलीडही असतं. शिवाय, हे चॉकलेट तोंडात विरघळणारं होतं. काही डब्यांमध्ये व्हाईट चॉकलेट होतं. मिल्क चॉकलेट किंवा डार्क चॉकलेटमध्ये असणारं कोकोआ सॉलिड व्हाईट चॉकलेटमध्ये नसतं. मात्र, व्हाईट चॉकलेटही तोंडात विरघळणारं होतं. काही डब्यांमध्ये कोकोआ टॅबलेट होत्या. मात्र, या कोकोआ टॅबलेट खाण्यात चॉकलेट खाण्याची मजा नव्हती.
 
प्रयोगाअंती असं आढळलं की, चॉकलेट खाण्याची तल्लफ व्हाईट चॉकलेटने शांत झाली. याचाच अर्थ कोकोआ सॉलीडमध्ये असं कुठलंच पोषकतत्त्व नसतं ज्याची कमतरता पूर्ण करण्यासाठी शरीराला त्याची तल्लफ येते.
 
चॉकलेटच्या इच्छेवर आणखीही काही प्रयोग झाले आहेत. यात असं आढळलं की, चॉकलेटच्या इच्छेचा शरीरातल्या हार्मोन्सशी काही संबंध नसतो. उलट रजोनिवृत्ती झालेल्या म्हणजेच मासिकपाळी बंद झालेल्या स्त्रियांनाही चॉकलेट खाण्याची इच्छा होते.
 
ही मानसिक प्रक्रिया?
एखादा पदार्थ खाण्याची इच्छा ही पूर्णपणे मानसशास्त्रीय आणि सांस्कृतिक प्रक्रिया असल्याचं स्पष्ट झालं आहे. बटर कुकी, चॉकलेट, फ्राईज किंवा कुठलाही पदार्थ खाण्याचा एक साधा विचार मनात येतो. तो हळूहळू वाढू लागतो आणि मग त्याची तल्लफ लागते.
 
आणखी एक गोष्ट लक्षात आली आहे की,ज्या पदार्थांना चविष्ट (palatable) मानलं जातं त्या पदार्थांचा विचार मनात येताच मनात एक अपराधीपणाची भावनाही येते.आईसक्रीम,केक,मॅकरोनी चीझ अशा सर्व पदार्थांसाठी जगभरात 'पॅलेटेबल' ही संज्ञा वापरली जाते.
 
प्रा. हॉर्मेस म्हणतात, "ही एक प्रकारची द्विधा मनस्थिती असते. असे पदार्थ आत्मिक समाधान देतात. मात्र,मी अशा संस्कृतीमध्ये राहते जी मला चॉकलेट खाऊ नये, हेच सांगते. मला ते खायचं आहे,पण खायला नको.आम्हाला वाटतं की, या सांस्कृतिक दडपणामुळेच या गोष्टी खाण्याची जास्त इच्छा होते."
 
एखादा पदार्थ खाण्याची इच्छा होणं सामान्य बाब आहे. त्या इच्छेवर नियंत्रण मिळवणंही थोडं अवघड असतं. एखादा पदार्थ खाण्यापासून तुम्ही बरेच दिवस स्वतःला रोखलं आणि अचानक एक दिवस तो पदार्थ तुमच्या समोर आला तर तुमचं स्वतःवर नियंत्रण सुटतं. अशावेळी तुमच्यासमोर केक आला तर थोडा केक खाऊन मन शांत होण्याऐवजी तुम्हाला आणखी खायची इच्छा होते आणि तुम्ही भरपूर खाता.
 
त्याचप्रमाणे गरोदरपणात जास्तीत जास्त सकस अन्न खाण्याचा सल्ला दिला जातो. कधीकधी डॉक्टरही काय खायचं आणि काय खायचं नाही,याच्या सूचना करतात. त्यामुळे बरेचदा स्त्री तिच्या आवडीचे पण सकस नसलेले पदार्थ टाळते. अशाप्रकारे मन मारल्यामुळे मनात त्याच पदार्थांचा विचार घोळू लागतो आणि तेच पदार्थ खाण्याची इच्छा निर्माण होते. यालाच डोहाळे लागणं, म्हणतात.
 
पण गरोदरपणा असा टप्पा असतो जेव्हा स्त्रीला काहीही खाण्याची इच्छा झाली तरी तिची ती इच्छा बहुतांशी पूर्ण केली जाते. प्रा. हार्मेस म्हणतात, "यावेळी जे पदार्थ टाळायला हवे ते खाण्याची इच्छा झाली तरी गरोदर बाई आनंदी राहावी यासाठी तिचे हे लाड थोड्याफार प्रमाणात पुरवले जातात."
 
प्रा. हार्मेस म्हणतात की, इच्छेवर नियंत्रण ठेवल्यास पदार्थाच्या विचारापासून आपण दूर जाऊ शकतो. यासाठीचा एक मार्ग म्हणजे इतर कामात लक्ष वळवणं. दुसरा मार्ग म्हणजे आपल्याला एखादा पदार्थ खाण्याची खूप इच्छा होत आहे,याचा स्वीकार करून विचारपूर्वक आणि मेडिटेशनच्या माध्यमातून ती इच्छा मनातून दूर करणं.
 
प्रा. हार्मेस सांगतात की, चॉकलेटसारखा एखादा पदार्थ खाण्याची इच्छा झालीच, तर एक-दोन तुकडे खाल्ल्याने आरोग्यावर परिणाम होत नाही. अशावेळी रोज थोडं चॉकलेट खाऊन मन शांत करून इतर कामात लागणं,
हादेखील उत्तम उपाय आहे.

गरोदर स्त्रीचं कौडकौतुक
कुठलाही पदार्थ खाण्याची इच्छा होणं, हा केवळ मनाचा खेळ आहे. गरोदरपणात वेगवेगळे पदार्थ खाण्याचे डोहाळे लागतात. त्यावेळी तिचे लाडही पुरवले जातात. भारतात गरोदरपणात स्त्रिया सहसा आंबट पदार्थ खूप खातात. मात्र, प्रत्येक स्त्रीच्या बाबतीत असं घडतंच, असं नाही. डॉक्टरांनी सांगितलं तर स्त्रिया अनारोग्यदायी पदार्थ खाण्याचं टाळतातदेखील.
 
जाणकारांच्या मते गर्भारपणात स्त्रिया अधिक डिमांडिग होतात. कुटुंब आणि समाजाच्या मदतीशिवाय गरोदरपण पार पाडणं, सोपं नसतं. यासंदर्भात टांझानियातल्या एका खेड्यात गरोदर महिलांवर एक प्रयोग करण्यात आला होता. यातल्या ज्या महिलांचे डोहाळे त्यांच्या नवऱ्याने किंवा कुटुंबीयांनी पुरवले त्या महिलांना एकप्रकारच्या सामाजिक सुरक्षेची जाणीव झाली आणि ही जाणीव त्यांना अधिक प्रसन्न ठेवणारी होती. याचाच अर्थ गरोदर स्त्रीचे डोहाळे पुरवले जातात, त्यातून तिला माझं कुटुंब माझ्या सोबत आहे, याची जाणीव होत असते.
 
एकूणात काय तर गरोदरपणात लागणारे डोहाळे शरीरातले हार्मोनल बदल किंवा त्या पदार्थात असलेल्या पोषकतत्त्वांवर अवलंबून नसतात. तर ही केवळ मानसशास्त्रीय बाब आहे.त्यामुळे गरोदरपणात आई आणि बाळ दोघांनाही उत्तम पोषण मिळेल,असा सकस आहार खावा.शिवाय,अगदीच विचित्र डोहाळे नसतील तर आवडीचे पदार्थ अधूनमधून खाल्ल्याने फार फरक पडत नाही.
 
पोटात नवीन जीवाची उत्पत्ती होणं, एक अत्यंत गुंतागुंतीची, क्लिष्ट आणि थकवणारी प्रक्रिया असते. अशावेळी पाणीपुरीसारखं काहीतरी आवडीचं खाऊन मन शांत होणार असेल तर काय हरकत आहे?