शुक्रवार, 3 जानेवारी 2025
  1. लाईफस्टाईल
  2. »
  3. बाल मैफल
  4. »
  5. बालकथा
Written By
Last Modified: शनिवार, 26 एप्रिल 2014 (15:14 IST)

पक्षीजगत : सुगरण

सुगरण पक्षी घरटी बांधण्याच्या कलेसाठी प्रसिद्ध आहे. म्हणून सुगरणीचे खोपटे पाहण्यासारखे असते. सुगरण पक्ष्यांचे घरटं म्हणजे उत्तम कारागिरीचा नमुना, म्हणूनच त्या पक्ष्याला सुगरण हे नाव मिळालेलं आहे. सर्वच पक्षी जवळपास मिळणार्‍या काडय़ा, काटक्या, गवत, दोरा, गुंतवळ, पाने, कापूस, चिंध्या यांचा वापर करून घरटी तयार करतात. घरटी बांधायची कला त्यांना उपजतच प्राप्त झालेली असते. सुगरण हा पक्षी भारत, पाकिस्तान, श्रीलंका, बांगलादेश, म्यानमार इ. देशांत आढळतो. हा पक्षी स्थानिक निवासी असला तरी काही उपजाती स्थलांतर करणार्‍या आहेत. रंग आणि आकारावरून याच्या किमान तीन उपजाती आहेत. पट्टेरी सुगरण, काळ्या छातीची सुगरण आणि बाया. बाया हा सर्वात जास्त आढळणारी उपजात आहे. भात शेतीच्या प्रदेशात थव्याने राहणारे सुगरण उभ्या पिकावर चरायला येतात, कीटक आणि धान्य खातात.

सुगरण पक्ष्याचा आकार चिमणीएवढा म्हणजे सुमारे 15 से.मी. असतो. विणीच्या हंगामाखेरीज नर वा मादी चिमणीसारखेच दिसतात. चिमणीच्या चोचीपेक्षा सुगरण पक्ष्याची चोच अधिक भक्कम असते. सरळ कापल्यासारखी छोटी शेपटी असते. मे ते सप्टेंबर हा सुगरण पक्ष्याच्या विणीचा हंगाम असतो. विणीच्या हंगामात नर ची- ची- ई असा लांबलचक आवाज काढतो. किडे-आळ हे सुगरणीचे खाद्य असते. 

सुगरणीचे घरटे एखाद्या झाडाला किंवा विहिरीत किंवा अन्यत्र टांगलेले असते. सुगरण पक्ष्याच्या घरटय़ात खालच्या बाजूने प्रवेशद्वार असते. खालून निमुळते आणि लांब बोगदा असलेले घरटे वर गोलाकार होत जाते. वरच्या भागात दोन किंवा जास्त कप्पे असतात. हे घरटे गवत, कापूस, केस आणि इतर वस्तूंनी तयार केलेले आणि व्यवस्थित विणलेले असते. घरटय़ाच्या फुगीर भागात ओल्या मातीचा गिलावा असतो. मादी एकावेळी 2 ते 4 अंडी देते. ही अंडी शुभ्र पांढर्‍या रंगाची असतात. अंडी उबविणे, पिलांना खाऊ घालणे वगैरे कामे मादी एकटीच करते. पक्षी सृष्टीतील बहुतेक पक्षी विणीची वेळ आली की घरटी बांधायच्या उद्योगाला लागतात.