शनिवार, 23 नोव्हेंबर 2024
  1. लाईफस्टाईल
  2. मराठी साहित्य
  3. मराठी लेखक
Written By
Last Modified: बुधवार, 13 मार्च 2019 (09:49 IST)

कुसुमाग्रज राष्ट्रीय साहित्य पुरस्कार – २०१८ ची घोषणा

यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठातर्फे देण्यात येणाऱ्या ‘कुसुमाग्रज राष्ट्रीय साहित्य पुरस्कार – २०१८’ ची घोषणा विद्यापीठातर्फे करण्यात आली. मानाचा समजला जाणारा हा पुरस्कार यंदाच्या वर्षी डोगरी भाषेतील प्रख्यात साहित्यिक तथा चित्रपट लेखक व दिग्दर्शक वेद राही यांना जाहीर करण्यात आलेला आहे. रोख एक लाख रुपये, स्मृतीचिन्ह, सन्मानपत्र असे या पुरस्काराचे स्वरूप आहे. विद्यापीठाचे कुलगुरू प्रा. ई वायुनंदन यांनी ही घोषणा केली.
 
यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठातर्फे २०१० पासून ‘कुसुमाग्रज राष्ट्रीय साहित्य पुरस्कार दिला जातो. आजवर जयंत कैकीनी, चंद्रकांत देवताले, डॉ. विष्णू खरे यासह विविध साहित्यिकांना या पुरस्काराने गौरविण्यात आले आहे. यंदाच्या कुसुमाग्रज राष्ट्रीय साहित्य पुरस्कारासाठी वेद राही यांची निवड करण्यात आली असल्याची माहिती विद्यापीठाचे कुलसचिव डॉ. दिनेश भोंडे यांनी दिली.
 
सन १९८३ मध्ये डोगरी भाषेतील कादंबरी ‘आले’ बद्दल त्यांना साहित्य अकादमी पुरस्काराने गौरवण्यात आले आहे. महाराष्ट्र शासनाने सन १९९० मध्ये मानाचा ‘महाराष्ट्र गौरव’ पुरस्कार देवून त्यांना सन्मानित केले आहे. सन २०११ मध्ये केंद्रीय हिंदी संस्थानने त्यांना मानाचा ‘महापंडित राहुल संक्रीतायायान’ पुरस्कार दिला आहे. याशिवाय सन २०१२ मध्ये जम्मू – काश्मीर शासनाने ‘जीवनगौरव’ पुरस्कार देवून त्यांना सन्मानित केले आहे. स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या जीवनावर आधारित ‘वीर सावरकर’ (१९८२) या चरित्रपटामुळे व दूरदर्शनवरील लोकप्रिय अशा ‘गुल गुलशन गुलफाम’ (१९८४) या मालिकेमुळे त्यांची विशेष ओळख निर्माण झाली.
 
श्री. वेद राही यांचा जन्म १९३३ साली जम्मू – काश्मिर येथे झाला. त्यांच्या वडिलांचे नाव लाला मुल्कराज सराफ असे आहे, ज्यांनी ‘रणबीर’ नामक वर्तमानपत्र सुरु केले होते. घरातील पोषक अशा वातावरणात श्री. वेद राही यांना लहानपणापासुनच लिखाणाची हौस होती. प्रारंभी त्यांनी उर्दूतून लिखाणास सुरुवात केली. त्यानंतर मग त्यांनी हिंदी व डोगरी भाषेतून लिखाण केले. डोगरी भाषेत त्यांच्या नावावर सात प्रसिद्ध कादंबऱ्या, तीन कथासंग्रह व एक डोगरी भाषेतील काव्यकथा एवढी ग्रंथसंपदा आहे. हिंदी व उर्दू भाषेतही त्यांनी अनेक अनेक कादंबऱ्या- कथासंग्रह व काव्यसंग्रह लिहिले आहेत. ज्यात प्रामुख्याने काले हत्थे (१९५८), आले (१९८२), क्रॉस फायरिंग आदी प्रसिद्ध कथासंग्रह , झाड़ू बेदी ते पत्तन (१९६०) , परेड (१९८२), टूटी हुई डोर (१९८०), गर्म जून आदी त्यांच्या प्रसिद्ध कादंबऱ्या आहेत. काश्मिरी संत कवी यांच्या जीवनावर आधारीत मूळ डोगरी भाषेतील त्यांची कादंबरी ‘लाल देड’ प्रसिद्ध आहे.
 
हिंदी चित्रपट सृष्टीतही श्री. वेद राही यांचे योगदान महत्वपूर्ण आहे. रामानंद सागर यांच्या आग्रहाखातर त्यांनी हिंदी चित्रपटसृष्टीत पाऊल ठेवले. त्यांच्यासोबत त्यांनी जवळपास २५ चित्रपटांसाठी कथा, पटकथा व संवाद लेखन केले. त्यांच्या प्रमुख चित्रपटांमध्ये  बेज़ुबान (१९७६), चरस (१९७५), संन्यासी (१९७२), बे-ईमान (१९७२), मोम की गुड़िया (१९७१), आप आये बहार आई (१९७१), पराया धन (१९७०), पवित्र पापी (१९६६), 'यह रात फिर न आएगी' आदि चित्रपटांचा समावेश होतो. याशिवाय त्यांनी  नऊ चित्रपट व काही दूरदर्शन मालिकांचे दिग्दर्शन केले. ज्यात ‘एहसास’ (१९९४ ), रिश्ते (१९८७), ज़िन्दगी (१९८७) यां दूरदर्शन मालिकांचा व  नादानियाँ (१९८०), काली घटा (१९७३), प्रेम पर्वत (१९७२), दरार आदी चित्रपटांचा समावेश आहे. ‘काली घटा’ नामक चित्रपटाची निर्मितीही केली आहे. याव्यतिरिक्त त्यांनी अनेक माहितीपट, लघुपट व मालिकांचे दिग्दर्शन केले आहे.
 
विद्यापीठाचे मा. कुलगुरू प्रा. ई. वायुनंदन यांच्या मान्यतेने गठीत तीन सदस्यीय निवड समितीने श्री. वेद राही यांची ‘कुसुमाग्रज राष्ट्रीय साहित्य पुरस्कार – २०१८’ या पुरस्कारासाठी एकमताने निवड केली आहे. रोख एक लाख रुपये, स्मृतीचिन्ह, सन्मानपत्र, शाल व श्रीफळ असे या पुरस्काराचे स्वरूप आहे. लवकरच मान्यवरांच्या हस्ते हा पुरस्कार श्री. वेद राही यांना समारंभपूर्वक प्रदान करण्यात येईल, अशी माहिती विद्यापीठाचे कुलसचिव डॉ. दिनेश भोंडे व कुसुमाग्रज अध्यासनाच्या प्रमुख प्रा. डॉ. विजया पाटील यांनी दिली.