मने जोडणारा उत्सव
|
व्यवसाय, रोजगारासाठी घराबाहर पडावे लागत असल्याने सर्व भाऊ एकाच शहरात असणार याची खात्री देता येत नाही. बहिणही लग्न झाल्यावर सासरी जाते. त्यामुळे रक्षाबंधनास प्रत्यक्ष भेट होईलच असे सांगता येत नाही. बहुतेकवेळा भाऊ बहिणीकडे येऊन रक्षाबंधन साजरे करतात. कधीकधी बहीणही माहेरी येते. रक्षाबंधन हा मने जुळवणारा उत्सव आहे.
लग्न झाल्यानंतर बहिणीस माहेरी जोडून ठेवणारा दुवा म्हणून हे सण भूमिका पार पाडतात. यानिमित्ताने माहेरच्या माणसांशी तिची भेट होत असते. बहीण- भाऊ शेवटी एकाच मायबापांची लेकरे असतात. लहानपणापासून मोठेहोईपर्यंत सोबत वाढलेले असतात. परिस्थितीनुरूप बहीण-भाऊ एकमेकांपासून दूर असले तरी त्यांनी लहानपणापासूनच्या आठवणी हृद्यातील कप्प्यात जोपासून ठेवलेल्या असतात. हा चिरंतन ठेवास कठीण प्रसंगी त्यांना आधार देत असतो.
|
दादाला जसे आपल्या छकुलीचे मन कळत असते तसेच ताईही आपल्या लाडक्या भावाची काळजी घेत असते. मग ते लहान असोत की मोठे. रक्षाबंधन मनाचे बंध कायम जोडून ठेवण्याचे काम करत असतो.
