मंगळवार, 7 जानेवारी 2025
  1. लाईफस्टाईल
  2. »
  3. मराठी साहित्य
  4. »
  5. साहित्य संमेलन २००९
Written By वेबदुनिया|

अध्यक्षपदासाठी कुलकर्णी, भोसलेंची नावे चर्चेत

- किरण जोशी

WDWD
महाबळेश्वर येथे होणार्‍या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदाचा ज्येष्ठ साहित्यिक डॉ. आनंद यादवांनी राजीनामा दिल्यानंतर मोठा पेच निर्माण झाला असून नव्या अध्यक्षांची निवड करण्यासंदर्भात हालचाली वेगाने सुरू झाल्या आहेत. सध्या तरी ज्येष्ठ साहित्यिक श्रीनिवास कुलकर्णी व शिवाजीराव भोसले यांची नावे चर्चेत आहेत. शिवाय माजी संमेलनाध्यक्ष म. द. हातकणंगलेकर यांच्याकडेच याही संमेलनाची सुत्रे देण्याचाही एक विचार पुढे येतो आहे.

आकस्मिक परिस्थितीत अध्यक्ष निव
यासंदर्भात मराठी साहित्य महामंडळाचे अध्यक्ष कौतिकराव ठाले पाटील यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी डॉ. आनंद यादवांनी दबावाखाली राजीनामा दिल्याचे स्पष्ट केले. पण यादवांनी राजीनामा देऊन संमेलनावर परिणाम घडविण्याची गरज नव्हती, असेही ते म्हणाले. या पेचावर आता महामंडळाची बैठक महाबळेश्वरमध्ये उद्या (गुरूवारी) होणार आहे. तीत निवडीसंदर्भात चर्चा होईल. वास्तविक आकस्मिक परिस्थितीत नव्या अध्यक्षाची निवड सात दिवसांची नोटीस देऊन करता येते. पण इथे तेवढ्या दिवसांचा अवधीही हाती नसल्याने अतिविशिष्ट परिस्थिती लक्षात घेऊन नवीन अध्यक्षांची निवड करता येईल. दरम्यान, या बैठकीत आपण अध्यक्षपदासाठी कोणतेही नाव सुचविणार नाही, असे ठाले-पाटील यांनी स्पष्ट केले असून आयत्यावेळी येणार्‍या नावांवर चर्चा होईल व सर्वानुमते निर्णय घेतला जाईल, असे त्यांनी सांगितले. त्याचवेळी संमेलन रद्द होणार नाही. ते वेळेतच व नियोजित कार्यक्रमानुसारच होईल, असेही ते म्हणाले.

संमेलन होणारच - संयोजन समित
दरम्यान, अध्यक्षांनीच राजीनामा दिल्याने संमेलनाचे भवितव्य अधांतरी झाले असले तरी महाबळेश्वरमधील संयोजन संस्था मात्र पूर्णपणे तयारीत आहे. आम्ही पूर्ण तयारी केली आहे. छोट्या गावात पहिल्यांदाच हे संमेलन होत असताना हा प्रकार झाला. पण तरीही आम्ही नाराज नाही. अध्यक्षपदाचा वाद महामंडळ व साहित्य परिषद सोडवेल, असे सांगत नियोजित वेळेतच संमेलन होईल, असे साहित्य परिषदेच्या महाबळेश्वर शाखेचे बबनराव ढेबे, विलास काळे, संजय दस्तुरे, शिवरतन पलोड आदींनी सांगितले.