आम्हा काय त्याचे....
किरण जोशी
प्रतिवर्षी वेगवेगळ्या कारणांमुळे साहित्य संमेलनांमध्ये वाद झडत असल्याने मूळ उद्देश बाजूला पडून वादामुळे संमेलन गाजते. संत तुकारामांबद्दल अपमानजनक लेखन केल्यामुळे डॉ. आनंद यादव यांना संमेलनाध्यक्षपदावर पाणी सोडावे लागले. डॉ. यादव यांना राजीनामा देण्यास भाग पाडण्यात आल्याने साहित्य क्षेत्रातून तीव्र नाराजी व्यक्त करण्यात येत आहे. वारक-यांच्या दबावापुढे साहित्यिक झुकले, असा नवा रंगही दिला जात आहे. पण, या गदारोळामध्ये सर्वसामान्य वारक-यांची काय भावना आहे, हे वेबदुनियाने जाणून घेण्याचा प्रयत्न केला असता, सर्वसामान्य वारकरी संमेलनाबद्दल आणि वादाबद्दल अनभिज्ञच असल्याचे दिसून आले आणि ज्यांना साधारण कल्पना होती त्यांनी वारक-यांच्या भूमिकेचे समर्थन केले. प्रतिवर्षी पंढरपूरच्या वारीला जाणारे भगवान पाटील म्हणाले, साहित्यिक म्हणजे लोकांना तत्त्वज्ञान देणारे लोक. पण, हेच लोक मनाला वाटेल ते छापू लागले तर कोणीही गप्प बसणार नाही. यापूर्वीही संतांवर टीका करण्याचे प्रकार झाले आहेत आणि तेव्हाही असाच विरोध झाला होता. पण, माणूस म्हटले की चूक होणार. संमेलनाच्या अध्यक्षांनी माफी मागितल्यानंतर त्यांना माफ करायला हवे होते कारण माउलींनी हीच शिकवण दिली आहे. साहित्य संमेलनात काहीतरी वाद सुरू आहे, हे कळले पण याची नेमकी माहिती आम्हाला नाही, असे जगन्नाथ काकडे म्हणाले. त्यांना घडलेला वृत्तांत सांगितल्यावर ते म्हणाले, कोणी काय लिहावे तो ज्याचा त्याचा प्रश्न आहे आणि अशा लोकांमुळे संतांची बदनामी होत नाही तर त्याच लोकांची पात्रता लक्षात येते, त्यामुळे अशा लोकांच्या लिखाणाकडे लक्ष देऊन त्यांनी किती मोठे करायचे ते आपण ठरवायचे. वसंत थोरात म्हणाले, आजकाल कोणीही कोणही उठतो आणि संतांना बदनाम करतो. गळ्यात माळ घालून अध्यात्माची कास धरणारा वारकरी शांत राहिला. पण, त्याचा गैरफायदा घेतला जात आहे. आपल्या पुस्तकाचा खप वाढावा म्हणून असे लिखाण केले जाते. पण, आता साहित्यिकांनी आपल्या पायरीने राहण्याची गरज आहे. नाहीतर आतापर्यंत गप्प असणारा वारकरी संप्रदायही पेटून उठेल. संत महात्म्यांबाबत अपमानजनक वक्तव्य काढणा-यांना साहित्यिक कसे म्हणता, असा प्रश्न उपस्थित करताना दिनकर पठाडे म्हणाले, जो संतांचा अनादर करतो तो इतरांना काय संदेश देणार. म्हणून प्रमुखपदावरून त्यांची हकालपट्टी करण्यात आली ते योग्यच आहे. आणि यापुढेही अशा लोकांना दूरच ठेवले पाहिजे.