मंगळवार, 7 जानेवारी 2025
  1. लाईफस्टाईल
  2. »
  3. मराठी साहित्य
  4. »
  5. साहित्य संमेलन २००९
Written By वेबदुनिया|

कुठे गेले ते सारस्वत?

WDWD
महाबळेश्वर येथे दि. २० ते २२ रोजी होणार्‍या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात आता चांगलाच रंग भरु लागला आहे. 'संतसूर्य तुकाराम' या पुस्तकावरुन सुरु असलेल्या वादाने हा रंग भरला आहे. डॉ. आनंद यादव यांनी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदाचा राजीनामा द्यावा अशी मागणी वारकर्‍यांनी केली आहे. ही मागणी वास्तव की अवास्तव हा वादाचा मुद्दा असला तरी, डॉ. यादव यांनी कोणती भूमिका घ्यावी व लेखन स्वातंत्र्याचा दृष्टीने सारस्वतानी चकार शब्दही काढला नाही हा प्रकार खरोखरच आश्चर्याचा आहे. एकीकडे लोकशाहीची प्रक्रिया लेखन स्वातंत्र्य, लेखणीची ताकद या विषयांवर मोठमोठ्या गप्पा मारणारे लेखक साहित्य संमेलनाची निवडणूक जाहीर झाली की हिरीरीने त्यात सहभागी होतात. परंतु एखाद्या लेखकावर अडचणीची वेळ आली तर, गंमत बघत बसतात हे या सगळ्या प्रकाराने अधोरेखित झाले आहे. द. मा. मिरासदार, रा. ग. जाधव, सुभाष भेंडे, अरुण साधू, म.द. हातकणंगलेकर ही माजी संमेलनाध्यक्ष मंडळीही मूग गिळून गप्प बसली आहेत. वारकर्‍यांच्या क्षोभाला वाट करुन देण्यासाठी व समजूत आणि युक्तीच्या चार गोष्टी सांगण्याची कोणालाही गरज वाटत नाही ही मराठी सारस्वतांची शोकांतिकाच म्हणावी लागेल.

संमेलनाध्यक्ष होणे व ते सन्मानाचे पद कौतुकाने सांभाळणे या पलिकडे मराठी भाषा आणि मराठी लेखकांसाठी आपले काही उत्तरदायित्व आहे याचा गंधही या मंडळींच्या कृतीतून जाणवत नाही. 'संतसूर्य तुकाराम' पुस्तका संदर्भात आपण काही बोललो तर आपली पुस्तके आणि आपण दोघेही वारकर्‍यांचे लक्ष होऊ या भितीपोटी या मंडळींची बोलती बंद झाली आहे. समाजाला मानसिक ताकद आणि नवी दिशा देण्याच्या वल्गना करणार्‍या या कागदी सिंहांचा वाचकांनी तरी निषेध केला पाहिजे. या पोटार्थी आणि धंदेवाईक लेखकांच्या हातून सरस्वतीचीच काय स्वतःच्या मुलाबाळांची सेवाही घडणे शक्य नाही.

डॉ. यादव यांनी लिहिलेल्या पुस्तकाच्या काही ओळी वगळता त्यांच्या हेतूबद्दल कोणतीही वाईट शंका घेण्याचे कारण नाही. यादवांना तुकाराम महाराजांना संतसूर्य दाखवायचे होते हा हेतू तरी वारकर्‍यांनी मान्यच करायला पाहिजे. यादवांचे लक्ष्य योग्य होते परंतु, त्यांचा मार्ग चुकला असे म्हणावे लागेल. या चुकीच्या मार्गाबद्दल त्यांनी तीनवेळा माफी मागितली. पुस्तक मागे घेतले. अशा परिस्थितीत वारकरी सर्व लेखकांना धडा शिकविण्यासाठी संमेलनात बिबा घालण्याचा प्रयत्न करत असतील तर, सर्वसामान्यांपासून लेखकांपर्यंत सर्वांनीच यासंदर्भात किमान सामोपचाराचा आवाज तरी उठवायला पाहिजे होता. संमेलनाध्यक्षपदावरुन राजीनामा देण्यापेक्षा अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या व्यासपीठावरुन अध्यक्षांना माफी मागावयास सांगून हा प्रश्न अधिक योग्यपणे हाताळता आला असता. या सर्व घटनांमध्ये कौतुकराव ठाले-पाटील यांची उपस्थिती कुठेच दिसली नाही.

सॅन होजे येथे संमेलन नेण्यास पुढारीपण करणार्‍या या महामानवाने केवळ कौतुकासाठीच पाटीलकी केली असेच आता म्हणावे लागेल. मराठीत एक म्हण आहे, 'मोकळ्या माळावर ओरडण्यासाठी पाटलाची परवानगी लागत नाही' साहित्याच्या या प्रांगणात साहित्य प्रेमींमुळे संमेलने यशस्वी होत असतात. त्यासाठी कौतुकरावांची परवानगी घ्यावी लागत नाही व लागणार नाही. संमेलन यशस्वी करण्यासाठी कौतुकरावांनी काय केले हे त्यांनी सांगण्याची वेळ आली आहे. औरंगाबादेत राहून पुण्याला चार गोष्टी सांगून, अखिल भारतीय संमेलन दुसर्‍यांच्या जीवावर यशस्वी करणे म्हणजे साहित्य संमेलन घडविणे नव्हे. गेले दीड पाऊणेदोन महिने हा वाद सुरु आहे. वारकर्‍यांनी डॉ. आनंद यादव त्यांची साहित्यकृती हा विषय वेगळा ठेवून संमेलन यशस्वी करण्यासाठी मदत करत आपण विष्णूदास आहोत हे सिद्ध करावे नाही तर तमाम साहित्यिकांनी योग्य भूमिकेसाठी डॉ. यादव यांच्या पाठीशी उभे राहण्याचे धाडस दाखवावे एवढीच साहित्य रसिकांची अपेक्षा.