मंगळवार, 7 जानेवारी 2025
  1. लाईफस्टाईल
  2. »
  3. मराठी साहित्य
  4. »
  5. साहित्य संमेलन २००९
Written By वेबदुनिया|

संमेलनाध्यक्षपदी सारडा, बोराडे की पानतावणे?

किरण जोशी

डॉ. आनंद यादव यांनी संमेलनाध्यक्षपदाचा राजीनामा दिल्यानंतर नूतन अध्यक्षाची निवड करण्यासाठी आज (गुरूवार ता.१९) पदाधिका-यांची बैठक होत असली तरी महामंडळाच्या पदाधिका-यांनी दूरध्वनी करून नावे सुचविण्यास सुरुवात केली आहे.

अध्यक्षपदासाठी इच्छुकही सरसावले आहेत. विश्व साहित्य संमेलनाचे अध्यक्ष डॉ. गंगाधर पानतवणे, ग्रामीण लेखक रा. रं. बोराडे व समीक्षक शंकर सारडा यांची नावे चर्चेत आली असून सारडा यांनी स्वतःहूनच अध्यक्षपदाची जबाबदारी स्वीकारण्याची तयारी दर्शवली आहे.

'संतसूर्य तुकाराम' या कादंबरीवरून गदारोळ उठल्यानंतर डॉ. यादव यांना संमेलनाध्यक्षपदाचा राजीनामा देणे भाग पडले. त्यामुळे नवा अध्यक्ष कोण? याबाबत पेच निर्माण झाला आहे. साहित्य वर्तुळामध्ये त्याचीच चर्चा सुरू आहे. महामंडळाचे पदाधिकारी, माजी अध्यक्ष व संयोजन समितीचे सदस्य अशा कार्यकारणीची बैठक आज सायंकाळी होत आहे. त्यासाठी पदाधिकारी महाबळेश्वराकडे रवाना झाले आहेत.

दरम्यान, बैठकीपूर्वीच पदाधिका-यांनी एकमेकांशी संपर्क सुरू केला असून नूतन अध्यक्ष निवडण्यासाठी दूरध्वनीवरून उमेदवाराची नावे सुचविली जात आहेत. त्यामध्ये गंगाधर पानतवणे, रा. रं. बोराडे, शंकर सारडा यांच्या नावाचा उल्लेख आहे. या नावापैकीच एकाचे नाव निश्चित होणार असल्याचे बोलले जात आहे.