मंगळवार, 7 जानेवारी 2025
  1. लाईफस्टाईल
  2. »
  3. मराठी साहित्य
  4. »
  5. साहित्य संमेलन २००९
Written By वेबदुनिया|
Last Modified: पुणे , बुधवार, 18 मार्च 2009 (15:27 IST)

संमेलनाध्यक्ष डॉ. यादव यांचा राजीनामा

'संतसूर्य तुकाराम' या कादंबरीवरून उद्भवलेल्या वादाला कंटाळात अखेर महाबळेश्वर येथील नियोजित मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष डॉ. आनंद यादव यांनी अखेर पदाचा राजीनामा दिला आहे. त्यामुळे अभूतपूर्व पेच निर्माण झाला आहे. महामंडळाचे अध्यक्ष कौतिकराव ठाले-पाटील यांनी संमेलन होणारच असे सांगितले असले तरी नवे अध्यक्ष कधी आणि कसे निवडणार हा प्रश्नच आहे.

डॉ. आनंद यादव यांनी लिहिलेल्या संतसूर्य कादंबरीतील काही भागावर वारकरी मंडळींनी आक्षेप घेतला होता. त्यापुढे मान तुकवत डॉ. यादवांनी ही कादंबरीच मागे घेतली. पण तरीही वारकर्‍यांचे समाधान झाले नाही. डॉ. यादवांनी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदाचाही राजीनामा द्यावा अशी मागणी त्यांनी केली होती. त्यासाठी वारकरी आंदोलनाच्या तयारीतही होते. महाबळेश्वरला साहित्य संमेलनाच्या मंडपात आंदोलन करण्याचा त्यांचा इरादा होता. यातून कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलिसही तयारीत होते.

मात्र, डॉ. यादवांनी मंगळवारी संध्याकाळी अचानक महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या कार्यालयात जाऊन अध्यक्षपदाचा राजीनामा देऊन टाकला. या राजीनाम्याची कारणमीमांसाही स्पष्ट केली नाही. दरम्यान, परिषदेच्या पदाधिकार्‍यांनी त्यांनी समजाविण्याचा प्रयत्न केला. परंतु, डॉ. यादव त्याला बधले नाहीत, असे समजते.

आता वीस तारखेपासून सुरू होणार्‍या साहित्य संमेलनाचे काय होणार याबाबत तर्कवितर्क लढविले जात आहेत. आयत्यावेळी राजीनामा दिल्यानंतर नवा अध्यक्ष निवडण्याचा इतिहास नाही. अशी स्थिती पहिल्यांदाच उद्भवली आहे. त्यामुळे कायदेतज्ज्ञांचा सल्ला घेतला जात आहे.