मंगळवार, 7 जानेवारी 2025
  1. लाईफस्टाईल
  2. »
  3. मराठी साहित्य
  4. »
  5. साहित्य संमेलन २००९
Written By वेबदुनिया|

संमेलनासाठी महाबळेश्वर सज्ज - काळे

WD
महाबळेश्वरसारख्या छोट्याशा शहरात अखिल भारतीय स्तरावरचे साहित्य संमेलन प्रथमच होत असल्याने उत्साहाचे वातावरण निर्माण झाले असून संमेलन यशस्वी करण्यासाठी जय्यत तयारी करण्यात आल्याची माहिती महाराष्ट्र साहित्य परिषदेचे कोशाध्यक्ष व मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष विलास काळे यांनी 'वेबदुनिया' शी बोलताना दिली.

ते म्हणाले, यापूर्वी महाबळेश्वरमध्ये विभागीय स्तरावरचे संमेलन झाले होते मात्र, यंदा अखिल भारतीय संमेलन भरविण्याची संधी मिळाल्याने महाबळेश्वरमधील साहित्यप्रेमी उत्साहाने तयारीला लागली आहेत. महाबळेश्वर हे पर्यटनस्थळम्हणून प्रसिद्ध असल्याने आदरातिथ्य करणे हा येथील लोकांचा स्थायीभाव आहे. येथील साहित्यपरंपराही तितकीच वैभवशाली आहे म्हणूनच येथे येणा-या प्रत्येक साहित्यिकांचे, पर्यटकांचे आम्ही त्याच भावनेने आदरातिथ्य करणार आहोत.

काही दिवसांवर येऊन ठेपलेल्या संमेलनाची तयारी अंतिम टप्प्यात आली असून महाबळेश्वर नगरपालिकेच्यावतीने शहरातील प्रमुख रस्त्यांचे डांबरीकरण केले आहे. याशिवाय शहरातील साहित्यप्रेमी संघटना तसेच सामान्य नागरिकांनीही जबाबदारी उचलली असून सारस्वतांच्या स्वागतासाठी महाबळेश्वर सजू लागले आहे. सातारा जिल्ह्यातील साहित्यिक संघटनाही नेटाने कामाला लागल्या आहेत. संमेलनाची ढोबळ कार्यक्रम पत्रिका तयार करण्यात आली असून याबाबत पुण्यात साहित्य महामं डळाच्या बैठकीत वक्ते व अंतिम कार्यक्रमपत्रिका निश्चित केली जाणार आहे. संमेलनस्थळावर भव्य मंडप उभारण्यात येत असून सुमारे 3 हजार साहित्यिकांसाठी बैठकव्यवस्था करण्यात येत आहे. पुस्तकप्रदर्शनासाठी स्टॉल्स बुकींगलाही चांगला प्रतिसाद मिळत आहे. ज्येष्ठ गायिका अशा भोसले यांच्या हस्ते संमेलनाचे उद्घाटन होणार आहे.

दरम्यान, संमेलन यशस्वी करण्यासाठी महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या महाबळेश्वर शाखेचे अध्यक्ष बबनराव ढेबे व सदस्य कार्यरत असून दररोज बैठक घेऊन नियोजन करण्यात येत आहे. विविध कमिट्या नेमून जबाबदारी निश्चित करण्यात आली आहे. नगराध्यक्ष युसूब शेख यांनी जातीने लक्ष घालून आवश्यक कामांना गती दिली आहे. नगरपालिकेकडून रस्ते, स्वच्छतामोहीम सुरू करण्यात आली आहे. माजी नगराध्यक्ष डी. एम. बावळेकर यांनीही लक्ष घातले आहे. संयोजनामध्ये पत्रकार संघाचा सहभाग असून उपाध्यक्ष अभिजित खुरासणे, संजय दस्तुरे व इतर सदस्य कार्यरत आहेत.