मंगळवार, 7 जानेवारी 2025
  1. लाईफस्टाईल
  2. »
  3. मराठी साहित्य
  4. »
  5. साहित्य संमेलन २००९
Written By वेबदुनिया|

साहित्य संमेलन बंद पाडण्याची धमकी

- किरण जोशी

महाबळेश्वरमध्ये ‍साहित्य संमेलनाची जोरदार तयारी सुरू असतानाच संमेलनाध्यक्ष डॉ. आनंद यादव यांच्या 'संतसूर्य तुकाराम' या कादंबरीचा वाद पुन्हा एकदा उफाळून आला आहे. यादव यांनी अध्यक्षपदाचा राजीनामा देण्याची मागणी करत वारक-यांनी संमेलन बंद पाडण्याचा इशारा दिल्याने संमेलनावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

संमेलनाध्यक्ष आनंद यादव यांच्या 'संतसूर्य तुकाराम' या कादंबरीमध्ये तुकारामांबद्दल चुकीचे लेखन केल्यामुळे वारकरी सांप्रदायातून तिव्र संताप व्यक्त करण्यात आला होता. अध्यक्षपद वाचविण्यासाठी यादव यांनी आपली कादंबरी मागे घेतली होती. मात्र, त्यानंतरही वारक-यांचे समाधान झालेले नाही. यादव यांनी संमेलनाध्यक्षपदाचा राजीनामा ‍द्यावा, अन्य्‍ाथा महाबळेश्वरमधील संमेलन होऊ देणार नाही, असा ह.भ.प बंडातात्या कराडकर यांनी दिला आहे. साहित्यकांनी संतांबद्दल लेखन करताना भान ठेवण्याची गरज आहे. राष्ट्रसंतांबद्दल चुकीची माहिती लिहणारे साहित्यिक संमेलनाचे अध्यक्ष कसे काय होऊ शकतात? असा प्रश्न उपस्थित करून यादव यांनी राजीनामा न दिल्यास संमेलन बंद पाडू, असा इशारा त्यांनी दिला आहे.

दरम्यान, संमेलन दोन दिवसांवर आले असतांना या वादाला तोंड फुटल्याने संयोजक नाराज झाले आहेत. संयोजक आणि साहित्य परीषदेच्या सदस्यांनी तातडीची बैठक घेऊन चर्चा केली. संमेलनामध्ये कोणतेही विघ्न येऊ नये यासाठी त्यांनी पोलिसांना निवेदन देण्यात आले असून संमेलनावेळी अनुचित प्रकार होऊ नये, यासाठी चोख पोलिस बंदोबस्त ठेवण्यात येणार आहे.

आत्ताच बोलणार नाही - डॉ. यादव
वारक-यांच्या भावनांचा आदर करून 'संतसूर्य तुकाराम' ही कादंबरी मागे घेऊनसुध्दा पुन्हा हा वाद निर्माण करण्यात आल्याने संमेलनाध्यक्ष डॉ. आनंद यादव व्यथीत झाले आहेत. मात्र, याबाबत घाईघाईने कोणतीच प्रतिक्रिया देणार नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

डॉ. यादव यांच्याशी संपर्क साधला असता ते म्हणाले, या कांदरीबाबत आक्षेप व्यक्त केल्यानंतर मी कोणताही विचार न करता कादंबरी मागे घेऊन त्यांच्या भावनांचा आदर राखला होता. आता संमेलन झाल्यानंतरच याबाबत प्रतिक्रिया देईन, असे त्यांनी सांगितले.

दरम्यान, रविवारी (ता.15) डॉ. यादव यांनी वारकरी आणि देवस्थान संस्थानची लेखी माफी मागतली.