रविवार, 1 डिसेंबर 2024
  1. लाईफस्टाईल
  2. »
  3. मराठी साहित्य
  4. »
  5. साहित्य संमेलन २००९
Written By वेबदुनिया|

अध्यक्षाशिवाय होणार संमेलन!

किरण जोशी- (तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी नगरीतून)

महाबळेश्वर साहित्य संमेलनाच्या नूतन अध्यक्ष निवडीसाठी मध्यरात्रीपर्यंत सुरू असलेल्या बैठकीत डॉ.आनंद यादव यांचा राजीनामा स्थगित ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यामुळे महाबळेश्वरचे संमेलन अध्यक्षांशिवायच होणार आहे. साहित्यिक आणि वारक-यांकडून येणारा दबाब लक्षात घेता महामंडळाने आपली मानहानी वाचविण्याबरोबरच वारक-यांना खूश करण्याचा प्रयत्न केला असल्याची चर्चा सुरू आहे.

दरम्यान, अध्यक्षपदाची माळ गळ्यात पाडण्यासाठी काहीजणानी दिवसभर प्रयत्न चालविले होते पण, गुडघ्याला बाशिंग बांधलेल्या या उमेदवारांच्या पदरी नाराजी आली. पदाधिका-यांच्या या निर्णयामुळे काही साहित्यिकांनीही नाराजी व्यक्त केली.

अध्यक्षनिवडीसाठी संमेलनाच्या पूर्वसंध्येला बैठक होणार असल्याने सर्वांचे लक्ष या बैठकीकडे लागून राहिले होते. नुतन अध्यक्ष कोण? याची उत्कंठा वाढली होती. रात्री साडेनऊच्या दरम्यान बैठक सुरू झाली. महामंडळाचे अध्यक्ष कौतिकराव ठाले पाटील यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या बैठकीत वि. भा. देशपांडे, कुंडलीक अतकरे, मधू नेने यांच्यासह व संयोजकांमधील प्रतिनिधी उपस्थित होते.

पदाधिका-यांशी संपर्क साधून माहिती घेण्याचा प्रयत्न केला जात होता मात्र, सर्वांनीच मोबाईल बंद करून ठेवले होते. आतमध्ये चर्चा झडत असताना बाहेर उत्कंठा वाढत चालली होती. नुतन अध्यक्षांबाबत चर्चा सुरू होताच काही पदाधिका-यांनी नावे सुचविण्यास सुरूवात केली. मात्र, ही बैठक अनन्यसाधारण परिस्थितीत होत आहे. महामंडळाच्या घटनेला धरून बैठक होत नसल्याने कोणताही बेकायदेशीर निर्णय घेतला जाऊ नये, असा मुद्दा पुढे करण्यात आला. नियोजीत अध्यक्षांचा राजीनामा स्थगित करण्यात यावा आणि कार्यक्रमपत्रिकेनुसार संमेलन पार पाडण्यावर एकमत झाले.

कौतीकराव ठाले-पाटील यांनी रात्री हा‍ निर्णय जाहिर करून टाकला. यावेळी पत्रकारांनी त्यांच्यावर प्रश्नांचा भडीमार केला. मात्र, निर्णयाचे पत्रक वाचून दाखविल्यानंतर याशिवाय आपण काहीही बोलणार नसल्याचे त्यांनी सांगितले.

अध्यक्षपदाचे दुदै
सांगलीत झालेल्या साहित्य संमेलनात प्रा. म.द. हातकणंगलेकर यांना अध्यक्षपदाची सुत्रे देण्यासाठी माजी अध्यक्ष अरूण साधू अनुपस्थित होते. त्यांना महामंडळाचे अध्यक्ष कौतीकराव ठाले-पाटील यांनी अध्यक्षपदाची सुत्रे दिली होती तर महाबळेश्वर येथे प्रा. हातकणंगलेकर यांना रितसर निमंत्रण दिले नसतानही शिष्ठाचार म्हणून ते संमेलनाध्यक्षांना सुत्रे प्रदान करण्यासाठी उपस्थित रहाणार आहेत. मात्र, संमेलनास अध्यक्षच नसल्याने ही सुत्रे त्यांना परत ठाले-पाटील यांच्याकडेच सुपूर्त करावी लागणार आहेत.