मंगळवार, 7 जानेवारी 2025
  1. लाईफस्टाईल
  2. »
  3. मराठी साहित्य
  4. »
  5. साहित्य संमेलन २००९
Written By वेबदुनिया|

महाबळेश्वरमध्ये संमेलन हा प्रयोग

WD
साहित्य संमेलनामध्ये गर्दी नव्हे तर दर्दी साहित्यिकांची गरज आहे म्हणूनच महाबळेश्वरसारख्या छोट्या गावात संमेलन होत असताना भव्यता, डामडौलापेक्षा साहित्याला वाहिलेले संमेलन कसे होईल यासाठी आमचा प्रयत्न असून लहान गावांमध्येही अखिल भारतीय स्तरावरचे संमेलन यशस्वी होऊ शकते हे दाखवून देण्याचा प्रयत्न आहे, असे प्रतिपादन साहित्य महामंडळाचे अध्यक्ष कौतीकराव ठाले पाटील यांनी 'वेबदुनिया' शी बोलताना केले.

संमेलनामध्ये गर्दी नाही अशी टिका होईल पण, या टीकेला सामोरे जाण्याची तयारी आम्ही ठेवली असल्याचे सांगताना ठाले-पाटील म्हणाले, महाबळेश्वरसारख्या केवळ आठ ते दहा हजार लोकवस्तीच्या गावात संमेलन झालेले नाही. अशा छोट्या गावांमध्ये अखिल भारतीय संमेलन झाली पाहिजेत यासाठीचा हा प्रयोग आहे. हे संमेलन अत्यंत साधेपणाने साजरे करण्याच्या सूचना महामंडळाने संयोजकांना यापूर्वीच दिल्या आहेत. तीन हजार श्रोते बसतील अशी बैठकव्यवस्था आणि तेवढाच मंडप उभारला तरी पुरेसे आहे.

संमेलनातील कार्यक्रम मात्र साहित्यिकदृष्ट्या दर्जेदार होण्यासाठी त्यापद्धतीने कार्यक्रम पत्रिका तयार करण्यात आली आहे. पाच परिसंवाद, कथाकथनाचा कार्यक्रम तसेच नवोदितांनाही संधी देण्याचा प्रयत्न आहे. स्थानिक पातळीवर अपेक्षेपेक्षा चांगली तयारी सुरू असून महामंडळ समाधानी आहे.

परदेशातील मराठी भाषिकांची नाळ आपल्या भाषेशी जोडून राहावी हा विश्व साहित्य संमेलनाचा उद्देश होता तसा लहान गावांमध्येही साहित्य चळवळीला चालना देण्याचा महाबळेश्वर संमेलनाचा प्रयत्न आहे आणि या प्रयत्नाला निश्चितच यश मिळेल असे ठाले -पाटील यांनी स्पष्ट केले.