मंगळवार, 7 जानेवारी 2025
  1. लाईफस्टाईल
  2. »
  3. मराठी साहित्य
  4. »
  5. साहित्य संमेलन २००९
Written By वेबदुनिया|

संमेलनातील 'आनंद' हरवला

- मधुसुदन पत्की

WDWD
डॉ. आनंद यादव यांनी तीन वेळा मागितलेली माफी, मागे घेतलेले 'संतसूर्य तुकाराम' हे पुस्तक या दोन्ही बाबी पुरेशा नाहीत. त्यांनी अ. भा. साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिलाच पाहिजे अशी मागणी करत वारकर्‍यांनी महाबळेश्वर येथे होणार्‍या साहित्य संमेलनावर प्रश्न चिन्ह लावले होते. वाढता दबाव आणि एकूण परिस्थिती लक्षात घेऊन डॉ. यादव यांनी साहित्य संमेलनाच्या नियोजित अध्यक्षपदाचा राजीनामा दिला. हा राजीनामा साहित्य विश्वात अनेक प्रश्न निर्माण करणारा आहे. राजीनामा देण्यास लावणारी वारकर्‍यांची ताकद विधायक म्हणायची का? त्यांच्या या ताकदीपुढे साहित्यिकांनी नतमस्तक व्हायचे का ? डॉ. यादव यांच्या या कृतीमुळे लोकशाही मूल्ये व अभिव्यक्ती स्वातंत्र्य यावर यापुढे गदा येऊ शकते का? तसेच अखिल भारतीय मराठी महामंडळाच्या घटनांमध्ये बदल करणे गरजेचे आहे का? या प्रश्नांना या संमेलनातच उत्तर मिळाले तर, यापुढची संमेलने अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा पुरस्कार करणारी व लोकशाही मूलतत्वे जिवंत ठेवणारी ठरतील.

यादवांनी दाखविलेला सहिष्णु व समजूतदारपणा हा एकाच वेळी चांगल्या मूल्यांचे द्योतक ठरत असला तरी, ही चांगली मूल्ये दुसर्‍या बाजूने दुबळेपणाची निदर्शक आहेत असेच म्हणावे लागेल. एकीकडे माफी मागणे, पुस्तक माघारी घेणे या वारकर्‍यांच्या मागण्या मान्य केल्यानंतर त्यांनी अध्यक्षपदाचा राजीनामा देणे गरजेचे नव्हते. साहित्य परिषद, संयोजक संस्था तसेच महामंडळ यांनी क्षीण आवाजात का होईना डॉ. यादव यांच्या संरक्षणाची हमी घेतली होती. मराठी साहित्य रसिकही डॉ. यादव यांच्या बाजूने होते. ज्या मतदारांनी त्यांना निवडून दिले त्यांचाही पाठिंबा डॉ. यादवांना होता. अशा परिस्थितीत डॉ. यादवांनी राजीनामा देत या सगळ्याचाच विश्वासघात केला. वैयक्तीक पातळीवर यादवांच्या सहनशीलतेपलिकडे हा सगळा प्रकार असला तरी, ते ज्या क्षेत्राचे प्रतिनिधीत्व करतात त्या साहित्यिक क्षेत्रासाठी त्यांनी ठामपणे संमेलनास येणे अगत्याचे होते.

यादवांनी कच खाऊ भूमिका स्वीकारत चुकीचा पायंडा पाडला. यापुढे ज्यांना जे पटणार नाही ती मंडळी अशा प्रकारचा मार्ग अवलंबतील. साहित्य विश्वातून यादवांना पाठिंबा देणारे लेखक गेला महिनाभर अज्ञातवासातच आहेत. चामडी बचाव भूमिका स्वीकारत त्यांनी या प्रकारावर प्रतिक्रिया देण्याचेही टाळले आहे. यातून साहित्य विश्वात असणारे स्पृष्य-अस्पृष्यतेचे राजकारण या प्रकारानंतर अधोरेखित झाले आहे. स्वतःला पुरोगामी म्हणणारे, विद्रोही समजणारे आणि स्वतःची विद्यापीठे साहित्य क्षेत्रात मानणारे नेमाडे, चित्रे यांच्यासारखे साहित्यिक सध्या कुठे आहेत ?

साहित्यिकांमध्ये वाद सुरु आहे. त्यातून महामंडळ व तत्सम संस्थांवर ब्राह्मणी छापाची जी मोहर आहे ती वारकर्‍यांच्या एका गटाने मिटविण्याचा चंग बांधला आहे तो उत्तम आहे. सध्या तरी आपण त्यात लक्ष घालण्याचे कारण नाही असाच विचार आणि कृती या मंडळींकडून दिसून येते. आक्षेपार्ह लिखाण व अभिव्यक्ती स्वातंत्र्यातला स्वैराचार हे मुद्दे वारकर्‍यांनी ऐरणीवर आणले आहेत. संत मंडळींसंदर्भात असे लिखाण होऊ नये यासाठी त्यांनी स्वयंघोषित सेन्सॉर मंडळाच्या स्थापनेचा निर्णय घेतला आहे. आजपर्यंत अनेक संतांच्या बाबतीत वारकर्‍यांच्या दृष्टीकोनातून पाहिले असता आक्षेपार्ह लिखाण घडले आहे. ज्या संतश्रेष्ठांना माऊलीचा दर्जा दिला गेला त्या ज्ञानेश्वरांवर अत्यंत हीन पातळीवर लिखाण झाले आहे. या सर्वांचा हिशोब वारकर्‍यांनी त्या त्यावेळी का चुकता केला नाही ? की हा प्रश्न वारकर्‍या-वारकर्‍यांमधील यादवीचा आहे ? संमेलनाचे अध्यक्ष झाल्यावर डॉ. यादवांवर हेतूतः चालविलेली ही कुर्‍हाड कुणाच्या मार्गदर्शनाखाली चालविली गेली याचा शोधही सजग समजल्या जाणार्‍यांनी घेतला पाहिजे. शेवटी साहित्य संमेलन ही मराठी भाषेची गौरवशाली परंपरा आहे. या परंपरेत समाजातील सर्वच घटकांनी सामील व्हायला पाहिजे. दहशतवादाच्या जोरावर संमेलनातला 'आनंद' हिरावून घेऊ नये एवढेच.