गुरूवार, 9 जानेवारी 2025
  1. मराठी ज्योतिष
  2. वास्तुशास्त्र
  3. वास्तुलेख
Written By वेबदुनिया|

वास्तुशास्त्र व फेंगशुईत फरक काय?

सृष्टीची निर्मिती ज्या 5 तत्त्वापासून झाली ती तत्त्वे म्हणजे, पाणी (जल), जमीन (भू), वारा (वायू), आग (अग्नी) व आकाश. यालाच आपण पंच महाभूते असे म्हणतो. पृथ्वीवरील प्रत्येक वस्तू याच तत्त्वांपासून बनली आहे. याच पाच तत्त्वांची एकमेकांशी युती होऊन एक अदृश्य शक्ती तयार झाली आहे. हेच वैज्ञानिक सत्य आहे. पण फेंगशुईत पृथ्वी, जल, अग्नी, धातू आणि लाकूड या पाच तत्त्वांचा समावेश असून त्याद्वारे सृष्टीची निर्मिती झाली आहे, असे मानले जाते. 

वास्तुशास्त्रात भूमीपूजन, भूमीची शुद्धी व त्याचा पाया यावर विचार करण्यात आला आहे, पण फेंगशुईत या गोष्टींना जागाच नाही. वास्तुशास्त्रात जमिनीला मुख्यत्वे (जंगल, अनुरूप व साधारण) अशा 3 भागात विभाजित करण्यात आले असून भूमीचे 154 प्रकार सांगण्यात आले आहेत. फेंगशुईत या गोष्टींचा अभाव आहे.

वास्तुशास्त्रात पांढरी व पिवळी माती भवन वास्तु निर्मितीसाठी योग्य आहे, पण फेंगशुईत पिवळी व लाल माती वास्तुनिर्मितीसाठी उत्तम ठरवली आहे.

भारतीय वास्तुशास्त्रानुसार स्वयंपाकघर अग्निकोनात असून विद्युत उपकरणे त्या जागेवर असावीत असे मानले जाते. फेंगशुईत असे करणे आवश्यक नाही. फेंगशुईत स्टोर रूम दक्षिण किंवा पूर्वेला असणे गरजेचे आहे.

वास्तुशास्त्रानुसार घरातील उत्तर, पूर्व किंवा ईशान्य कोपर्‍या खिडक्या असायला पाहिजेत, पण फेंगशुईत उत्तर-दिशा अशुभ असून खिडक्या दक्षिण दिशेलाच असायला पाहिजे.

फेंगशुईत ईशान्य कोपर्‍याला अशुद्ध व अशुभ मानण्यात आले आहे, पण भारतीय वास्तुशास्त्रात ईशान्य कोपरा देवाचा व दहा दिशांमध्ये सर्वांत जास्त पवित्र व ऊर्जा देणारा मानला आहे.

फेंगशुईत वास्तुदोष दूर करण्यासाठी आरसा, क्रिस्टल बॉल, विंड चाइम, ड्रॅगनचे चित्र, अष्टकोणीय आरसा, फिश पॉट इत्यादी वस्तूंवर जोर दिला आहे, पण वास्तुशास्त्रात हवन-यज्ञ, वेगवेगळ्या वास्तुपीठांच्या माध्यमाने जमीन व वास्तुच्या शुद्धीकरणावर भर दिला आहे.

फेंगशुईत चार दिशांच्या अंतर्गत पूर्वेत ड्रॅगन, पश्चिम दिशेला पांढरा सिंह, उत्तर दिशेत कासव व दक्षिण दिशेचा स्वामी फेंगहूयांग असून यांचे चित्र देखील या दिशेत लावले तरी त्या दिशेची सुरक्षा होते. वास्तुशास्त्रात आठ दिशा मानल्या आहेत. त्यातील पूर्वेला इंद्र, पश्चिमेत वरुण, दक्षिण दिशेत यम, उत्तरामध्ये कुबेर, ईशान्यांत ईश, आग्नेय दिशेत अग्निदेवता, नैऋत्यात राक्षस, वायव्य दिशेत वायुदेवता यांचा विचार केला जातो.

वास्तुशास्त्रात पाणी साठविण्यासाठी पूर्व व ईशान्य कोपर्‍याला महत्त्व आहे. कारण सूर्याची आभा सर्वांत आधी पूर्व व ईशान्य जागेवर स्पर्श करते आणि सूर्यप्रकाशामुळे पाणी दूषित होत नाही. फेंगशुईत पाणी साठविण्यासाठी 'अग्निकोन' उपयुक्त मानला आहे.

फेंगशुईत ड्रॅगन हे प्रतीक चिन्ह आहे, त्याच प्रमाणे वैदिक वास्तूत 'गणपती' हे प्रतीक चिन्ह आहे.

फेंगशुई हे चिनी लोकांचे वास्तुशास्त्र आहे, आता ते चीनच्या बाहेरही पसरले आहे. भारतात वास्तुशास्त्राचे महत्त्व आहे. फेंगशुईचे वापर घरातील अंतर्गत सजावटीसाठी केला जातो. पण भारतीय वास्तुशास्त्राचे प्रतीक गणपती, तोरण, शंख, कलश, नारळ, स्वस्तिक, कमळ, ओंकार ही वैदिक चिन्हे आहेत.