1. लाईफस्टाईल
  2. खाद्य संस्कृती
  3. शाकाहारी
Written By मनोज पोलादे|

वडा पाव

साहित्य : 250 ग्रॅम बटाटे, हरभरा बेसन 200 ग्रॅम, सोयाबीन तेल, दोन मोठे कांदे, ५0 ग्रॅम आले, 25 ग्रॅम लसूण, जीरे, मोहरी, 75 ग्रॅम हिरवी मिरची, पुदिना पाने, पाव व लोणी.

पूर्वतयारी :  बटाटे उकडून घ्यावे. साल काढून कुस्करावे.
बेसन बारीक चाळणीतून गाळून घ्यावे.
आले बारीक करून पेस्ट करावी.
कांदे बारीक कापून घ्यावे.
लसूण साल काढून जिर्‍यासोबत वाटून घ्यावा.
मिरच्या वाटून घ्याव्यात. पुदिन्याची व शेंगदाण्याची चटणी बनवून घ्यावी.

कृती : गॅसवर कढई ठेवून तेल घालावे. तेलात कांदा तांबूस होईपर्यंत भाजून घ्यावा. लसूण-जीरा व आल्याची पेस्टही तेलात भाजा. हिरवी मिरची पेस्ट तेलात तळावी.

कुस्करलेले बटाटे व तेलात भाजलेला मसाला एकत्र मिसळावा. मिश्रणाचे तळहाताने छोटे गोल-गोल गोळे करावे. एका पातेल्यात बेसन घ्यावे. बेसनात पाणी घालून पातळ द्रावण तयार करावे.

गॅसवर कढईत तेल घालून पाच-सात मिनिटांपर्यत गरम होऊ द्यावे. तेल तळणासाठी तयार झाल्यावर मिश्रणाचे गोळे बेसनाच्या द्रावणात घोळावे. गोळ्यावर बेसनाचा पदर तयार व्हायला हवा.

बेसनात तळलेला गोळा गरम तेलात तळायला टाकावा. मिश्रणापासून बनविलेले वडे कढईत झार्‍याच्या सहाय्याने परतावे. वड्यांना थोडा तांबूस रंग प्राप्त झाल्यानंतर वडे तळले गेले म्हणून समजायचे.

तळलेले वडे झार्‍याने काढावे. गरम खुमासदार वडे तयार. पाव चिरून तव्यावर बटर टाकून भाजून घ्यावे. पावात पुदिना चटणी व शेंगदाणा चटणी घालून मध्ये वडा घालावा. असा वडापाव खाण्यातील मजा काही औरच.