साहित्य : पातळ ताक 2 वाट्या, पाऊण वाटी बेसन, एक मोठा चमचा मेतकूट, 2 ओल्या मिरच्या, थोडे आले, 7-8 पाने कढीपत्ता, तूप 2 चमचे हिंग, हळद, जिरे, तिखट मीठ, साखर, थोडी जिऱ्याची पूड.
कृती : अर्धी वाटी बेसन घेऊन त्यात चवीप्रमाणे तिखट व मीठ, चिमूटभर हळद, जिरेपूड व चमचाभर गरम तेल घालून घट्ट भिजवून ठेवावे. ताकाला मेतकूट व बेसनाची पेस्ट करून लावावी. त्यात आले ठेचून घालावे. मीठ व साखर आवडीप्रमाणे घालावी. भिजवलेल्या बेसनपिठाचे बारीक गोळे करावेत. एका भांड्यात गोळे अर्धेअधिक भिजतील असे पाणी घालावे व ते उकळत असताना त्यात ते गोळे घालावे.
झाकण अर्धवट टाकून पाच मिनिटे शिजवून घ्यावे. कढी उकळत ठेवावी. कढी उकळू लागल्यावर त्यात ते गोळे घालावेत. नंतर तूप तापवून त्यात जिरे, हिंग, कढीपत्ता, मिरच्यांचे तुकडे, हळद घालून फोडणी करून कढीला द्यावी. कढी उकळून उतू येऊ लागली की उतरवावी. गरम गरम वाढावी.