गुरूवार, 23 जानेवारी 2025
  1. लाईफस्टाईल
  2. सखी
  3. जागतिक महिला दिन
Written By
Last Modified: सोमवार, 20 फेब्रुवारी 2023 (17:19 IST)

प्रीती जाधव : एका खुर्चीपासून ब्युटी पार्लरची सुरुवात, आता मात्र 4 लाखांचा सेटअप

- श्रीकांत बंगाळे

"पूर्वीची प्रीती जाधव ही चूल आणि मूल, मिस्टरांचा डब्बा करणं आणि घरात लेकरं सांभाळणं इतकीच मर्यादित होती. पण आजची प्रीती जाधव तिच्या सोशल फिल्डमध्ये एवढी उतरलीय की आज रोजी तिला सोशल मीडियासुद्धा ओळखतंय."
 
हे सांगताना प्रीती गजानन जाधव यांच्या डोळ्यात एक वेगळीच चमक होती.
 
प्रीती औरंगाबाद जिल्ह्यामध्ये छोटाश्या रांजनगाव या गावात राहतात. इथल्या घरातच त्यांनी पार्लर सुरू केलं आहे.
 
या पार्लरच्या माध्यमातून त्या महिन्याला 30 ते 35 हजार रुपये कमावत आहेत. इतकंच नाही तर एका खुर्चीपासून सुरू झालेला त्यांचा हा प्रवास आता ब्युटिशियनच्या दोन अॅकॅडमी टाकण्यापर्यंत पोहचला आहे.
 
वाळूज भागातील रांजनगावात आम्ही पोहचलो तेव्हा एका छोट्याशा गल्लीत सौंदर्या ब्युटी पार्लरचा बोर्ड लागलेला दिसला.
 
आतमध्ये प्रीती जाधव आणि त्यांच्या काही विद्यार्थिनी बसलेल्या होत्या. घरातच एका बाजूला त्यांनी पार्लरसाठी खोली तयार केली आहे.
 
प्रीती यांची ब्युटिशियनच्या फिल्डमधील प्रवासाची सुरुवात 2007 पासून सुरू झाली.
 
सुरुवातीच्या दिवसांविषयी त्या सांगतात, "मी 2007 पासून या फिल्डमध्ये आहे. मम्मी-पप्पांकडची परिस्थिती बिकट होती. त्यात एवढं अॅडजस्ट होत नव्हतं. माझी आई शाळेत सेविका असल्यामुळे आणि पप्पा कॅज्युअलमध्ये काम करत असल्यामुळे घरची परिस्थिती बिकट होती.
 
त्यामुळे मला वाटलं की ब्युटिशियनचं फिल्ड निवडावं. त्यामुळे 2007 पासून मी या क्षेत्रात उतरले."
 
2008 मध्ये प्रीती यांचं लग्न झालं आणि त्यांचे पती वाळूंज एमआयडीसीमध्ये कामाला असल्यानं त्यांना इकडं यावं लागलं.
 
प्रीती सांगतात, "2013 मध्ये आम्ही एमआयडीसीमध्ये घर घेतलं. घर घेतल्यानंतर घराचे ईएमआय वाढले. तीन मुलं आहेत मला, 2 मुली आणि 1 मुलगा. त्यांच्या शिक्षणाचा खर्च. सोबतच घरखर्च. एवढं सगळं अॅडजस्ट नव्हतं होत.
 
त्यामुळे माझ्यामध्ये जी पार्लरची कला आहे ती आपण इतरांना सांगू शकतो, दाखवू शकतो, असं आम्ही दोघांनी ठरवलं. त्यातनं काही मंथली इन्कम आला तर आपल्याला भविष्यात ते फायदेशीरच आहे, असं याकडे पाहिलं. आणि अशापद्धतीनं 2013 पासून पार्लरची सुरूवात केली."
 
"जेव्हा मी सुरुवात केली तेव्हा माझ्याकडे फक्त एक आरसा, एक चेअर आणि एक कात्री होती. त्याच्या व्यतिरिक्त दुसरं काहीच नव्हतं. खरं म्हणजे माझ्या हातातली कला हीच माझी सुरुवात होती," प्रीती पुढे सांगतात.
 
'आधी फ्री मध्येच सर्व्हिस दिली'
सुरुवातीच्या काळात कमी साहित्य असल्यामुळे अनेकांना प्रीती यांनी मोफत सेवा दिली.
 
त्या सांगतात, "पहिले स्वत:ला खूप सिद्ध करून दाखवावं लागायचं. माझं पार्लरचं फिल्ड आहे. बाहेरच्या ठिकाणापेक्षा माझे खूप रिझनेबल रेट राहायचे. कुणीकुणी तर म्हणायचं की तू प्रॅक्टिस म्हणून करतेय तर आमचं फ्रीमध्ये करून दे. मी 2 वर्षं फ्रीमध्येच सर्व्हिस दिली मुलींना. होम सर्व्हिस दिली.
 
"कुणी म्हणायचं तुमच्याकडे साहित्य कमी आहे. आम्हाला देखावा पाहिजे. अशा बऱ्याच अडचणीतून मी सामोर गेले."
आता मात्र प्रीती यांची परिस्थिती बदलली आहे. त्या सांगतात, "एक टाईम असा होता की पहिले 200-300 रुपये पण महिन्याला यायचे नाही. पण मला सुरुवात म्हणून काहीतरी करायचं होतं आणि ते मी केली. तेव्हाचं आणि आताचं बघितलं तर आता 30 ते 35 हजार रुपये इन्कम येतो महिन्याचा."
 
एका साध्या चेअरपासून प्रीती यांनी पार्लरची सुरुवात केली. आता त्यांच्या पार्लरचा पूर्ण सेटअप 3 ते 4 लाखांचा आहे.
 
प्रीती यांनी 2 वर्षांपासून वाळूजमध्ये स्वत:च्या दोन अॅकॅडमी चालू केल्या आहेत. एक अॅकॅडमी काही कारणास्तव बंद आहे तर दुसरी चालू असल्याचं त्या सांगतात. या अकॅडमीत त्यांच्याकडे शिकाऊ असलेल्या मुलीला त्यांनी काम दिलं आहे. तीही आता तिथं रोजचा रोजगार कमावत आहे.
 
फेसबुक, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अकाऊंटवरून प्रीती त्यांनी केलेले मेकअपचे व्हीडिओ शेअर करत असतात. सोशल मीडियावरुनच अनेक ऑर्डर मिळत असल्याचं त्या सांगतात.
 
ब्युटिशियनच्या फिल्डला भविष्य कारण...
बदलत्या जीवनशैलीमुळे ब्युटिशियनच्या क्षेत्राला चांगलं भविष्य असणार आहे, अशा विश्वास प्रीती व्यक्त करतात.
 
कार्यक्रम कोणताही असो, मेकअप आलाच, असं त्यांचं म्हणणं आहे.
 
त्या सांगतात, "या बिझनेसला फ्युचर नक्कीच आहे, कारण 60वर्षांची आजी असली तरी ती म्हणते की, मला साधा तरी मेकअप करून दे. बर्थ डे, लग्नाआधीचं आणि नंतरचं शूट, बेबीचं शूट असा सगळीकडे आता मेकअप लागतोच. त्यामुळे या फिल्डला चांगलं भविष्य आहे."
"ब्युटिशियन म्हणजे फक्त मेकअप करणं नाही, आपल्या मनानं, शरीरानं सगळ्या गोष्टीनं ती ब्युटी असली पाहिजे. तिचा दृष्टिकोन पॉझिटिव्ह असला पाहिजे आणि इतरांचा तिच्याकडे बघण्याचा दृष्टिकोन पॉझिटिव्ह असला पाहिजे," असंही प्रीती पुढे सांगतात.