बुधवार, 8 जानेवारी 2025
  1. वृत्त-जगत
  2. »
  3. मराठी बातम्या
  4. »
  5. मुंबईतली काळरात्र
Written By वेबदुनिया|

दहशतवाद्यांना पाकच्या अधिकार्‍यांकडूनच ट्रेनिंग

मुंबईवरील हल्ल्यांसाठी आलेल्या दहशतवाद्यांना आयएसआय या पाकिस्तानी गुप्तचर संस्थेच्या व लष्कराच्या माजी अधिकार्‍यांनीच प्रशिक्षण दिले, असा संशय अमेरिकेच्या एका माजी उच्चस्तरीय लष्करी अधिकार्‍याने व्यक्त केला आहे.

एकीकडे पाकिस्ताने मात्र या हल्ल्यात आपला काहीच सहभाग नसल्याचे स्पष्ट केले आहे. त्याचवेळी आता खुद्द अमेरिकेच्या एका अधिकार्‍यानेही पाककडे बोट दाखविले आहे.

न्यूयॉर्क टाईम्समध्ये हे वृत्त प्रसिद्ध झाले आहे. दहशतवादी व पाकिस्तानी सरकार यांच्यात थेट संबंध असल्याचे अमेरिका म्हणत नसली तरीही त्या देशाच्या परराष्ट्र मंत्री कोंडोलिसा राईस यांनी मुंबई हल्ल्याप्रकरणी पाकिस्तातनने सर्वतोपरी सहकार्य करावे असे आवाहन केले आहे. यातच त्यांना काय म्हणायचे ते येते, असे सांगण्यात येत आहे.

या हल्ल्यात लष्कर ए तैय्यबाचा हात असल्याचे आता अमेरिकी अधिकारीही भारताच्या सूरात सूर मिसळून सांगू लागले आहेत. या संघटनेवर बंदी घातल्याने सध्या ती भूमिगत राहून काम करत असली तरीही या तिला पाकिस्तानी गुप्तचर संस्थेचा वरदहस्त आहे, हे इतिहासात डोकावले तरी कळते. त्यामुळेच आता या संघटनेविरूद्ध शक्य तिथून पुरावे गोळा केले जात आहेत.

मुंबई हल्ल्यात पकडलेल्या मोहम्मद अजमल कसाब (२१) या दहशतवाद्याच्या कबुलीतूनही 'लष्करे'चा या हल्ल्यातील सहभाग उघड झाला आहे. आपल्याला गेल्या दीड वर्षात पाकिस्तानातील चार कॅम्प्समध्ये प्रशिक्षण देण्यात आले. त्यातील एका कॅम्पमध्ये आपली गाठ लष्करे तैय्यबाचा नेता हफीझ सईदशी घालून देण्यात आल्याचेही त्याने सांगितले आहे.

मुंबईहून दहशतवाद्यांनी लाहोरला जे फोन केले ते लष्करचाच अन्य एक नेता युसूफ मुझम्मिल याला केल्याचेही स्पष्ट झाले आहे. मुझम्मिल यानेच या कटाची आखणी केल्याचा कयास आहे.

लष्करे तैय्यबाचे काम लाहोरमध्ये अगदी उघडपणे चालते. पाश्चात्य लष्करी अधिकार्‍यांच्या मतानुसार, त्यांची अतिरेकी शाखा पाकिस्तान व्याप्त काश्मीर तसेच ग्रामीण भागात उघडपणे प्रशिक्षण तळ चालवते.

गुप्तचर अधिकार्‍यांचा लष्करेला आजही पाठिंबा असल्याबद्दल तेथील बुद्धिजीवी मंडळींमध्ये नाराजी व्यक्त केली जात आहे.