रविवार, 24 नोव्हेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. मुंबई
Written By
Last Updated :मुंबई , मंगळवार, 27 सप्टेंबर 2022 (19:33 IST)

22 वर्षांनी मिळाले चोरीचे सोने

gold
न्यायालयाच्या आदेशानंतर चराघ दिनचे मालक अर्जन दसवानी यांचे पुत्र राजू दसवानी यांना सोन्याचे नाणे, बांगड्या आणि वीट अशा त्यावेळी 13 लाख रुपये किंमत असलेल्या वस्तू  परत मिळाले. मुंबई सत्र न्यायालयाचे न्यायाधीश यू जे मोरे यांनी 5 जानेवारी रोजी आदेश काढत ही मालमत्ता दसवानींना देण्यास सांगितले. यामध्ये राणी व्हिक्टोरियाचे चित्र असलेले एक सोन्याचे नाणे, दोन सोन्याच्या बांगड्या आणि 1,300 ग्रॅम आणि 200 मिलीग्राम वजनाच्या दोन सुवर्णविटा (एकत्रितपणे त्यावेळी बाजारभावानुसार 13 लाख रुपये आणि आताची किंमत 8 कोटी रुपये) यांचा समावेश आहे. चराघ दिनचे संस्थापक अर्जन दासवानी यांचा मुलगा राजू दासवानी यांना ही मालमत्ता परत देण्यात आली आहे.
 
सरकारी वकील इक्बाल सोलकर आणि कुलाबा पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक संजय डोन्नर यांनी काही अटींच्या अधीन राहून मालमत्ता परत करण्यास कुठलीही हरकत नसल्याचे सांगितले. राजू दासवानी यांनी विविध बिले आणि पावत्या सादर केल्या, ज्यामुळे ही मालमत्ता त्यांच्या कुटुंबाची असल्याचं स्पष्ट झालं.
 
कोर्टान‍ी काय म्हटले  ?
19 वर्षांहून अधिक काळ लोटला असून  “वस्तू, विशेषत: सोन्याच्या वस्तू, पोलिसांच्या ताब्यात ठेवून कोणताही हेतू साध्य होणार नाही.  या खटल्यातील निर्दोष मुक्ततेचा निकाल सत्र न्यायालयाने दिला होता. दोन फरार आरोपींच्या अटकेत कोणतीही प्रगती झाली नाही. तक्रारदाराने स्वत:च्या मालमत्तेच्या परतीसाठी वर्षानुवर्षे वाट पाहिली. ही न्यायाची थट्टा आणि कायद्याच्या प्रक्रियेचा गैरवापर होईल,” असे आदेशात म्हटले आहे.
 
प्रकरण काय आहे?
8 मे 1998 रोजी मुंबईतील कुलाबा भागात मेरीवेदर रोड येथील जॉय ईडन इमारतीच्या चौथ्या मजल्यावर राहणाऱ्या अर्जन दासवानी यांच्या घरात चाकू घेऊन एक टोळी घुसली होती. या टोळक्याने सुरक्षा रक्षकाला मारहाण करून तिजोरीच्या चाव्या जबरदस्तीने घेतल्या, दासवानी आणि त्यांच्या पत्नीला बांधून लुटीच्या सामानासह पळ काढला. पोलिसांनी तीन आरोपींना अटक केली ज्यांच्यावर दरोडा, घुसखोरी आणि बॉम्बे पोलिस कायद्याच्या अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता.
 
1998 मध्ये पोलिसांनी लुटीचा काही भाग जप्त केला. 1999 मध्ये सत्र न्यायालयात खटला दाखल झाल्यानंतर खटला चालवण्यात आला आणि तिघांची निर्दोष मुक्तता करण्यात आली. आणखी तीन आरोपी अद्याप फरार आहेत. अर्जन दासवानी यांचे 2007 मध्ये निधन झाले.