1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. मुंबई
Written By
Last Updated : शनिवार, 11 सप्टेंबर 2021 (15:23 IST)

बलात्काऱ्यांना सरकारचा राजाश्रय - चित्रा वाघांचा आरोप

मुंबईतील साकीनाका याठिकाणी खैरानी रोड परिसरात बलात्कार झालेल्या 30 वर्षीय महिलेचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. पीडित महिला 9 सप्टेंबर रोजी साकीनाका परिसरातील खैरानी रोड भागात बेशुद्धावस्थेत आढळून आली होती. याप्रकरणी साकीनाका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून एका व्यक्तीला अटकही करण्यात आली आहे.
 
या प्रकारानंतर भाजप प्रदेशाध्यक्ष चित्रा वाघ या अक्षरश: ढसाढसा रडल्या. त्या महिलेची विचारपूस करण्यासाठी चित्रा वाघ जात होत्या. मात्र त्यापूर्वीच त्या महिलेचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.
 
चित्रा वाघ म्हणाल्या, “मी निशब्द झाले. ज्या पद्धतीने एका महिलेवर अत्याचार झाला, तो राक्षसी होता. मी डॉक्टरांशी बोलले, मी तिला त्या ठिकाणी बघून आले अक्षरश: तिचे आतडे कापले गेले, तिच्या प्रायव्हेट पार्टमध्ये रॉड टाकला गेला. ज्या पद्धतीमध्ये हे अत्याचार चालले ते कुठेतरी थांबायला पाहिजे. आता आमचे शब्द संपले. महाराष्ट्र महिलांच्या सहनशीलतेचा अंत बघू नका.
 
प्रत्येक सरकारच्या कालावधीत महिला आणि मुलींवर बलात्कार होतात. पण सरकार काय भूमिका घेतं हे महत्त्वाचं असतं. मात्र, या सरकारमध्ये बलात्काऱ्यांना राजाश्रय देण्याचं काम केलं जात आहे. त्यातून विकृतांचं मनोबल वाढवण्याचं काम सरकारनं या माध्यमातून केलं, असा आरोप भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी केला.
 
"या महिलेवर राक्षसी पद्धतीनं बलात्कार करण्यात आला. ज्या पद्धतीने हे अत्याचार चालले आहेत, हे थांबायला पाहिजे. आता आमचे शब्द संपले आहेत. महाराष्ट्रातील महिलांच्या सहनशीलतेचा अंत बघू नका हे मला सरकारला सांगायचं आहे," असं त्या म्हणाल्या.
 
"गेल्या आठ दिवसांमध्ये राज्यात अनेक घटना घडल्या आहेत. साडे तेरा वर्षांच्या मुलीवर 14 लोकांनी बलात्कार केला. सहा वर्षाच्या मुलीवर रिक्षामध्ये बलात्कार झाला. ठाण्यात अतिरिक्त आयुक्तांची बोटं छाटली गेली. आज सकाळीच अमरावतीमध्ये एका सतरा वर्षाच्या, सात महिन्याची गर्भवती असलेल्या मुलीवर बलात्कार झाला. तिनं फाशी घेत स्वतःला संपवलं," असं चित्रा वाघ यांनी म्हटलं.
 
साकीनाक्याची तरुणी मृत्यूशी झुंज देत होती. मात्र आम्ही भाषणं आणि घोषणा करण्यापलिकडं काहीही करू शकलो नाहीत, याचं दुःख असल्याचं त्यांनी म्हटलं.
 
सरकार शक्ती कायदा आणणार होते, त्याचं काय झालं असा सवालही त्यांनी उपस्थित केला. राज्याच्या महिला आयोगाला अध्यक्ष नाही. त्यामुळे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांना खुर्चीवर बसण्याचा अधिकार नाही, असा घणाघात चित्रा वाघ यांनी केला.