ठाण्यात बर्ड फ्लूचा शिरकाव झाला की काय?
ठाण्यामध्ये तब्बल १५ पाणबगळा जातीतील पक्षी मृत अवस्थेमध्ये सापडले आहेत. त्यामुळे बर्ड फ्लूचा ठाण्यात शिरकाव झाला की काय? अशी चर्चा आता सुरू झाली आहे. या पार्श्वभूमीवर अद्याप पक्ष्यांच्या मृत्यूचं कारण स्पष्ट नसून त्यांना तपासणीसाठी मुंबईच्या पशूसंवर्धन रुग्णालयात पाठवण्यात आलं असल्याची माहिती पशुवैद्यकीय विभागाकडून देण्यात आली आहे.
मध्य प्रदेश व अन्य काही जवळच्या राज्यात बर्ड फ्लूची साथ आली असतानाच ठाणे येथील विजय गार्डन या सोसायटीच्या उद्यानातील तब्बल १५ बगळे मृतावस्थेत आढळून आले. ठाणे महापालिकेच्या पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांनी यांना एकत्र करून लॅबमध्ये तपासणीकरिता पाठवले आहे. यामागचे कारण तपासणीचा अहवाल आल्यावरच कळणार असल्याचे वनाधिकारी नरेश मुठे यांनी सांगितले.