बुधवार, 25 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. मुंबई
Written By
Last Modified: गुरूवार, 9 सप्टेंबर 2021 (08:19 IST)

अनिल देशमुख यांच्या मुंबई उच्च न्यायालयातील याचिकेवर गुरुवारी सुनावणी

सक्तवसुली संचालनालयाने (ED) बजावलेल्या समन्सविरोधात राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी मुंबई उच्च न्यायालयात धाव घेत याचिका दाखल केली आहे. या याचिकेवर गुरुवारी सुनावणी होणार आहे.
 
अनिल देशमुखांच्या याचिकेवर सुनावणी घेण्यास न्यायालयाने गेल्या आठवड्यात नकार दिला होता. त्यामुळे देशमुखांना दिलासा मिळालेला नाही. गेल्या आठवड्यात न्यायमूर्ती रेवती मोहिते-डेरे यांच्यासमोर ही याचिका सुनावणीसाठी आली होती. मात्र, काही कारणास्तव त्यांनी सुनावणीस नकार दिल्यानं आता न्यायमूर्ती संदीप शिंदे यांच्यासमोर गुरुवारी या याचिकेवर सुनावणी होणार आहे.
 
अनिल देशमुख यांनी गृहमंत्रीपदावर असताना दरमहा १०० कोटी रुपये वसुलीचे टार्गेट दिले असल्याचा गंभीर आरोप मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी केला होता. याप्रकरणी मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशानंतर गुन्हा दाखल करण्यात आला, तसेच सीबीआय आणि ईडीकडून चौकशी सुरू आहे. ईडीकडून देशमुख यांना पाच वेळा चौकशीसाठी समन्स बजावण्यात आले. मात्र, देशमुख हजर झाले नाहीत. या सर्व प्रकरणाविरोधात देशमुखांनी न्यायालयात धाव घेतली आहे.
 
ईडीने बजावलेले समन्स रद्द करण्याची प्रमुख मागणी याचिकेतून करण्यात आली आहे. तसेच, तपासयंत्रणेपुढे कागदपत्रे आणि जबाब हा इलेक्ट्रॉनिक पद्धतीने नोंदवण्याची परवानगीही याचिकेतून मागण्यात आली आहे. याशिवाय अधिकृत मध्यस्थामार्फत ईडीसमोर चौकशीला हजर राहण्याची परवानगी द्यावी, अशी मागणीही देशमुख यांनी अॅड. अनिकेत निकम यांच्यामार्फत आपल्या याचिकेतून केली आहे.