रविवार, 22 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. मुंबई
Written By
Last Modified: गुरूवार, 21 मार्च 2024 (12:15 IST)

भूषण गगराणी BMC चे नवे आयुक्त, ठाणे आणि नवी मुंबई महापालिकेलाही नवे आयुक्त मिळाले

मुंबई आणि उपनगरात मोठे प्रशासकीय बदल करण्यात आले आहेत. आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मुंबई महानगरपालिकेचे (BMC) आयुक्त इक्बाल सिंग चहल यांच्यासह अनेक महापालिकांच्या प्रमुखांची बदली करण्यात आली आहे. केंद्रीय निवडणूक आयोगाच्या आदेशानंतर महाराष्ट्र सरकारने अनेक बड्या प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या बदल्या केल्या आहेत.
 
BMC चे नवे आयुक्त म्हणून IAS भूषण गगराणी यांची नियुक्ती करण्यात आली आहे. तर शेजारच्या जिल्हा ठाणे महापालिकेची कमान सौरभ राव यांच्याकडे सोपवण्यात आली आहे. यासोबतच कैलास शिंदे यांची नवी मुंबई महापालिकेच्या आयुक्तपदी नियुक्ती करण्यात आली आहे.
 
केंद्रीय निवडणूक आयोगाने राज्य सरकारला मुंबई महापालिकेच्या (BMC) विद्यमान उच्चपदस्थ अधिकाऱ्यांना हटवण्याचे आदेश दिले होते. यानंतर मे 2020 मध्ये बीएमसी आयुक्त बनलेले आयएएस अधिकारी इक्बाल सिंग चहल यांची बदली करण्यात आली. आता बीएमसीची जबाबदारी आयएएस भूषण गगराणी यांच्याकडे देण्यात आली आहे.
 
इक्बाल सिंग चहल हे 1989 च्या बॅचचे महाराष्ट्र केडरचे IAS अधिकारी आहेत. तर भूषण गगराणी हे 1990 च्या बॅचचे आयएएस अधिकारी आहेत. ते मुख्यमंत्री कार्यालयात अतिरिक्त मुख्य सचिव म्हणून कार्यरत होते. नगरविकास, जलसंपदा आणि मराठी भाषा विभागाची जबाबदारीही त्यांनी सांभाळली होती.
 
मुंबई महापालिकेच्या नगरसेवकांचा कार्यकाळ 7 मार्च 2022 रोजी संपला आहे. तेव्हापासून बीएमसीमध्ये प्रशासकीय राजवट सुरू आहे. म्हणजेच बीएमसीचे सर्व काम बीएमसी आयुक्त हाताळत आहेत.