1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. मुंबई
Written By
Last Modified: मुंबई , बुधवार, 7 एप्रिल 2021 (07:47 IST)

corona in mumbai: मुंबईतील करोना लशीचा साठा फक्त ३ दिवस पुरेल इतकाच: महापौर पेडणेकर यांची माहिती

राज्यात करोनाचे (Coronavirus)थैमान सुरू असून राज्य सरकार करोनावर नियंत्रण मिळवण्याचा कसोशीने प्रयत्न करत आहे. लॉकडाउन आणि कडक निर्बंधांसारखे उपाय करतानाच राज्य सरकारने दुसरीकडे लसीकरणही जलदगतीने करण्याचा प्रयत्न सुरू केला आहे. मात्र आता मुंबईत लसीचा तुडवडा निर्माण होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. ही शक्यता मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी व्यक्त केली आहे. मुंबईत सध्या कोविशिल्ड आणि कोवॅक्सिन या दोन्ही लशींचे मिळून १ लाख ८५ हजार इतकेच डोस शिल्लक आहेत. तसेच मुंबईला आता पुढचा लसीचा साठा १५ एप्रिलनंतर मिळणार आहे. त्यामुळे येत्या तिनेक दिवसांच्या काळात मुंबईत लशीचा तुटवडा निर्माण होऊ शकतो, अशी माहिती किशोरी पेडणेकर यांनी दिली आहे. (mumbai mayor kishori pednekar says that there is a shortage of corona vaccine in mumbai)
 
महापौर किशोरी पेडणेकर एका खासगी वृत्तवाहिनीशी बोलत होत्या. मुंबईत दररोज ५० हजार व्यक्तींना करोना प्रतिबंधत लशींचे डोस दिले जात आहेत. याबरोबरच मुंबईतच्या जम्बो कोविड सेंटर्समध्ये दिवसाला दीड ते दोन हजार लसींचे डोस दिले जात आहेत अशी माहिती, महापौर पेडणेकर यांनी दिली. लशीच्या साठ्याबाबत माहिती देताना पेडणेकर म्हणाल्या की, मुंबईत कोविशिल्ड लशीचे एकूण १ लाख ७६ हजार ५४० डोस शिल्लक आहेत. त्याचप्रमाणे कोव्हॅक्सिन या लशीचे ८ हजार ८४० डोस शिल्लक आहेत. हे पाहता येत्या २ ते ३ दिवसांमध्ये मुंबईत लशीचा तुटवडा निर्माण होईल.
 
केंद्र सरकारवर केली टीका
महापौर किशोरी पेडणेकर यांनी केंद्र सरकार राज्याला सापत्न वागणूक देत असल्याची टीका केली आहे. मुंबईत असलेला लशीचा साठा येत्या २ ते ३ दिवस पुरेल इतकाच आहे. पुढील लशीचा साठा १५ एप्रिलनंतरच येणार आहे. मग तोपर्यंत करायचं काय हा प्रश्न आहे असे सांगतानाच सह्याद्रीला नेहमीच केंद्र सरकारकडून सापत्न वागणूक दिली जात आहे, अशा शब्दांत महापौरांनी केंद्र सरकारवर निशाणा साधला.
 
राज्य सरकारने केंद्र सरकारकडे लशीच्या साठ्याची मागणी केलेली आहे. राज्य सरकार पत्र देखील पाठवत आहे. तरी आम्हाला लस मिळत नाही, असा तक्रारीचा सूर महापौरांनी लावला आहे.