गुरूवार, 28 नोव्हेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. मुंबई
Written By
Last Modified: शुक्रवार, 20 नोव्हेंबर 2020 (09:15 IST)

मुंबईतील २९ मॉल्सना अग्निशमन दलाच्यावतीने कारणे दाखवा नोटीस

मुंबईतील २९ मॉल्सना मुंबई महापालिकेच्या अग्निशमन दलाच्यावतीने कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली आहे. नागपाडा येथील सिटी सेंटर मॉलमध्ये लागलेल्या आगीनंतर मुंबईतील ७५ मॉलची तपासणी करून आग प्रतिबंधक उपाययोजनांची माहिती घेतली होती. यापैकी २९ मॉलमध्ये आग प्रतिबंधक उपाययोजना कागदावर असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.
 
नियम धाब्यावर बसवणाऱ्या या मॉल मालकांनी त्रुटी दूर न केल्यास परवाना रद्द करण्यासह कायदेशीर कारवाई करण्यात असल्याचा इशारा मुंबई अग्निशमन दलानं दिलाय. नागपाडा येथील सिटी सेंटर मॉल मध्ये लागलेल्या आगीवर तब्बल ५६ तासांनंतर नियंत्रण मिळवण्यात मुंबई अग्निशमन दलाला यश आले होते. या भीषण घटनेनंतर मुंबईतील मॉल्स मधील अग्नी सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला होता. 
 
गेल्या १० दिवसांत तब्बल ७१ मॉल्सची पहाणी करण्यात आली. यापैकी २९ मॉल्स मध्ये अग्नी प्रतिबंधक उपाययोजनांसह काही त्रुटी आढळून आल्या. या २९ मॉल्सना कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली आहे. एक महिन्याच्या आत त्रुटी दूर न केल्यास परवाना रद्द करण्यासह कायदेशीर कारवाई करण्यात येईल, असा इशारा मॉल्स धारकांना दिल्याचे मुंबई महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त सुरेश काकाणी यांनी सांगितले.