शुक्रवार, 29 नोव्हेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. मुंबई
Written By
Last Modified: सोमवार, 1 फेब्रुवारी 2021 (16:18 IST)

मुंबईतील सामान्य प्रवाशांसाठी रेल्वे प्रवास सुरु, लोकांची तूफान गर्दी

मुंबईतील सामान्य प्रवाशांसाठी रेल्वे प्रशासनाकडून आज सोमवार १ फेब्रुवारीपासून लोकलची दारे खुली झाली आहेत. त्यामुळे आज जवळपास ११ महिन्यांनी सर्वसामान्य प्रवाशांना रेल्वेतून प्रवास करता येत आहे. मात्र लोकलने प्रवास करताना प्रवाशांना वेळेचे बंधन पाळावे लागणार आहे, अन्यथा दंड भरावा लागू शकतो. तसेच महत्त्वाचे म्हणजे लॉकडाऊन काळात ज्या प्रवाशांच्या पासची मुदत संपली, त्यांना आजपासून शिल्लक राहिलेल्या दिवसांची मुदतवाढ देण्यात येईल, असे पश्चिम आणि मध्य रेल्वेकडून स्पष्ट करण्यात आले आहे.
 
सामान्य प्रवाशांना प्रवासासाठी निर्धारित वेळा आखून देण्यात आलेल्या आहेत. या निर्धारित वेळेत प्रवास न केल्यास २०० रुपये दंड आणि १ महिन्याचा तुरुंगवास अशी शिक्षा होऊ शकते. त्यामुळे रेल्वेने प्रवास करताना वेळेचे भान ठेवणे यापुढे अतिशय महत्त्वाचे असणार आहे. पहाटे पहिल्या लोकलपासून सकाळी ७ वाजेपर्यंत, दुपारी १२ ते ४ वाजेपर्यंत आणि रात्री ९ वाजल्यापासून अखेरच्या लोकलपर्यंत सर्व प्रवाशांना लोकल प्रवासाची मुभा असेल. मात्र यादरम्यानच्या वेळांमध्ये परवानगी नसतानाही प्रवास करणाऱ्यांना शिक्षा होणार आहे. त्यामुळे प्रवाशांवर तिकीट तपासनीस व रेल्वे पोलिसांची करडी नजर राहणार आहे. परिणामी आज तिकीट काढण्यासाठी सकाळपासून प्रवाशांनी स्थानकांबाहेर रांगा लावलेल्या असून लोकल चुकू नये यासाठी धावाधाव होताना दिसत आहे.
 
दरम्यान, कोरोनापासून संरक्षणासाठी प्रवाशांना मास्कचा वापर बंधनकारक असेल. अन्यथा प्रवासास मनाई करण्यात येईल. तसेच प्रत्येक रेल्वे स्थानकात अपेक्षित गर्दीनुसार राज्य रेल्वे पोलीस (जीआरपी), रेल्वे सुरक्षा बल (आरपीएफ), गृहरक्षक आणि महाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडळाचे प्रशिक्षित जवान तैनात असतील.