शुक्रवार, 10 जानेवारी 2025
  1. लाईफस्टाईल
  2. »
  3. वेबदुनिया विशेष 08
  4. »
  5. मुंबई कुणाची?
Written By वेबदुनिया|

मराठीच्या नवनिर्माणाचे 'राज'कारण

-अभिनय कुलकर्णी

NDND
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे व समाजवादी पक्षाच्या नेत्यांत गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेला शाब्दिक वितंडवाद रविवारी रस्त्यावर आला आणि दोन्ही पक्षाच्या कार्यकर्त्यांनी धुडगूस घातला. अर्थात सुरवात राज यांनीच केली होती. पण रविवारी झालेल्या देश बचाव रॅलीत मुलायमसिंह, अमरसिंह आणि अबू आझमी यांनी त्यात तेल ओतले. त्यातच राज यांनी अमिताभचे नाव घेतल्यामुळे तर समाजवादी पक्षाला चांगल्याच मिरच्या झोंबल्या. त्यानंतर त्यांनी आणखी आगलावी वक्तव्ये केली. त्यामुळे आता हे प्रकरण आणखी चिघळले आहे.

मुंबईत बिहारी व युपीमधून आलेल्या लोकांनी स्थानिकांचे व्यवसाय बळकावून घेतले आणि मुंबई आणखी घाण केली, असा सर्रास आरोप केला जातो. मनसेचाही मुद्दा तोच आहे. या उलट मुंबई हा या देशाचाच एक भाग असल्यामुळे आणि देशात लोकशाही असल्याने कोणीही कुठेही जाऊन स्थायिक होण्याचे स्वातंत्र्य त्याला आहे, असे विरोधकांचे म्हणणे आहे. या परिस्थितीत प्रांतीयतेचा मुद्दा पुढे आला आहे.

राज यांचा राग विशेष करून बिहारी व युपीवाल्यांवर आहे. पण मुंबईतील टॅक्सीवाल्यांना, रिक्षावाल्यांना मारून ते काय साध्य करू इच्छितात? केवळ त्यामुळे हा प्रश्न सुटणार आहे का? यातून निर्माण होणारे इतर प्रश्न काय याचाही विचार व्हायला हवा. उत्तर प्रदेश आणि बिहारमध्ये विकास नसल्याने हे लोक महाराष्ट्रासारख्या प्रगत राज्यात येतात. त्यांना तेथे रोजगार उत्पन्न झाल्यास हा लोंढा रोखला जाईल. मुंबईत त्यांचे येणे कोणत्या आधारावर रोखायचे? हा लोंढा रोखण्यासाठी त्या राज्यांचा विकास करणे जरूरीचे आहे.

त्याचवेळी महाराष्ट्रात येऊन आपल्या भागातील लोकांचे येथे येण्याचे समर्थन करणारे बिहार व युपीचे नेते आगलावी वक्तव्ये करण्यापलिकडे काय करतात? उत्तर प्रदेशची उत्तम प्रदेश अशी भलावण करून त्यासाठी अमिताभला ब्रॅंड एम्बेसेडर बनविणार्‍या मुलायम व अमरसिंह यांनी राज्यासाठी काय केले? जिथे सामान्य माणूस सायंकाळी सुरक्षितपणे फिरूही शकत नाही, हीच तेथील कायदा सुव्यवथा. असे असताना देश बचाव रॅली काढण्यात काय मतलब? ज्यांना आपला प्रदेश वाचविता येत नाही, ते देश काय वाचविणार? त्या तुलनेत शिवसेनेने सुरवातीला दक्षिण भारतीयांविरोधात 'हटाव लुंगी, बजाव पुंगी' असे आंदोलन केले होते. पण त्यानंतर त्या राज्यांचा विकास एवढा झाला की आता मराठी माणूस तेथे जातो आहे. आंध्र, कर्नाटक व तमिळनाडू, केरळच्या नेत्यांना जमले ते बिहार व युपीच्या नेत्यांना का जमत नाही?

पण त्याचवेळी राज यांनी हेही लक्षात घेतले पाहिजे, की महाराष्ट्र मराठी लोकांचा ही घोषणा महाराष्ट्रातून इतर राज्यांत गेलेल्या मराठी लोकांसाठी अडचणीची ठरणार आहे. स्थानिकांचा रोजगार हिरावला म्हणून त्यांच्याविरूद्ध आंदोलन सुरू झाल्यास किंवा त्यांना तिथून हाकलून दिल्यास काय होईल? याचाही विचार केला पाहिजे. आज बंगळूर, हैदराबाद, चेन्नई, म्हैसूर या आयटीच्या तीर्थक्षेत्री अनेक मराठी माणसे काम करीत आहेत. अमेरिकेतील सिलिकॉन व्हॅलीतही मराठी ध्वजा फडकत आहेत. तेथे मराठी माणसाने काही विशेष कर्तृत्व केले की आपण त्याचे मराठी म्हणून गोडवे गातो. मग तेथून त्यांना हाकलल्यानंतर आपण त्यांच्या तेथे रहाण्याचे समर्थन कोणत्या शब्दांत करणार? अमेरिकेच्या सिटी ग्रुपचे अध्यक्षपद विक्रम पंडितांसारख्या मराठी माणसाला अभिमानाची बाब असेल, तर मग त्या ग्रुपचे अध्यक्ष होण्याइतकी पात्रता एकही अमेरिकन माणसांत नाही, याची खंत अमेरिकन लोकांनी बाळगायची का? याचा विचार करायला हवा.

विकास हा जात, धर्म आणि प्रांतनिरपेक्ष आहे. त्यामुळे विकास होईल, तेथे लोंढा जाणार हे तर नक्कीच आहे. मुंबई आणि परिसरात विकास होतो आहे, म्हणून जगभरातून लोक तेथे येत आहेत. आपल्याल्या ज्या पात्रतेचे मनुष्यबळ हवे आहे, ते आपल्याच भागात मिळाले नाही, तर ते इतर ठिकाणांहून आपल्याला मागवावे लागणारच आहे. येथेच तर जागतिकीकरण आपल्याला उपयोगी पडते आहे. जागतिकीरणानंतरच भारतीयांनी जगभर कर्तृत्वाच्या ध्वजा उभारल्या आहेत. त्यामुळे आपल्याइथे येतो म्हणून कुणाला विरोध करणे आपल्याला परवडणारे नाही.

मुंबई महाराष्ट्रात असूनही मुंबईत महाराष्ट्र नाही, असे सर्रास म्हटले जाते. ते खरेही आहे पण हे चित्र मराठी माणसाचे कर्तृत्वच केवळ बदलू शकते, त्यासाठी बिहारी व युपीच्या लोकांवर हल्ले चढविण्याचे कर्तृत्व उपयोगी ठरणार नाही. मुंबईतील टॅक्सी, भाजी आणि आता अगदी मच्छिमारांचा मासेमारीचा व्यवसाय भय्यांनी मराठी माणसाकडून हातात घेऊन बळकावून घेतला आहे, असे म्हटले जाते. पण यातून भय्यांच्या व्यावसायिक आक्रमणापेक्षा मराठी माणसाचे नाकर्तेपणच सिद्द होते. भय्यांनी सर्वत्र घरपोच भाजी पोहोचवली. लोकांचे मंडईत जाण्याचे कष्ट वाचले. टॅक्सी घेऊन त्याने प्रसंगी झोपडपट्टीत राहून कुटुंब पोसले. सगळ्या प्रतिकूलतेवर मात करून हे लोक मुंबईत राहिले, टिकले आणि स्वतःचा आर्थिक बेस तयार केला. मराठी माणसाने नेमके हेच केले नाही, म्हणूनच तो मुंबईतून बाजूला पडला आहे. भय्यांनी मुंबईतील ही 'गॅप' ओळखली आणि ते मुंबईभर पसरले. पसरताना त्यांनी आपल्या नातेवाईकांना तिकडून आणले.

त्याचवेळी मराठी माणसाच्या बाबतीत काय घडले? मुंबईतील गिरण्या बंद पडल्यानंतर मराठी माणसाने काय केले? तेथे टिकून राहून प्रसंगी प्रतिकूल परिस्थितीशी लढा देऊन आज भय्ये जे करत आहेत, ते यांनी केले नाही. शिक्षणात झेप घेऊन मुंबईत उच्च पदे मिळवली नाहीत. त्याचवेळी मुंबईतील कॉस्मोपॉलिटिन कल्चरची भीती मनात ठेवून मराठीपणाचा भयगंड मात्र जपला. त्याच्या या भयगंडाला खतपाणी घालणारी शिवसेनाही त्यावेळी होतीच. आता तेच काम नवनिर्माण सेना करते आहे. मुंबईतील गुजराती व मारवाडी समाजाला हाकलण्याची ताकद मात्र कोणत्याही पक्षांत नाही. कारण त्याच्या आधारवरच आज मुंबई उभी आहे. त्यात त्यांचे कर्तृत्वही आहे.

येथे येणार्‍या युपी व बिहारी लोकांविषयी मात्र, एक अपेक्षा नक्की बाळगायला हवी. ती म्हणजे ज्या प्रांतात तुम्ही रहाता, तेथील संस्कृती आपलीशी करायलाच हवी. दक्षिणेत कायमचे रहायचे असेल, तर तेथे तेथील भाषा शिकावीच लागते. महाराष्ट्रात तसे होत नाही. म्हणूनच महाराष्ट्रात राहून युपी किंवा बिहारी म्हणून शक्तीप्रदर्शन केले जात असेल तर ते चुक आहे. उत्तर प्रदेशचा स्थापना दिवस महाराष्ट्रात साजरा करता, मग महाराष्ट्राचा स्थापना दिवस युपी किंवा बिहारमध्ये स्थापन केल्यास चालेल काय? याचा विचार करायला हवा.

मराठी माणसाच्या असंतोषाची दखल स्थानिक व केंद्रातील राजकीय नेत्यांनीही घ्यायची गरज आहे. मराठी माणसांच्या नोकरी, धंदे हिरावून घेणे, महाराष्ट्रातील रेल्वे भरतीच्या जाहिराती बिहारमध्ये देणे हे प्रकार रोखले पाहिजे. अन्यथा आपल्याला डावलण्यात येते, ही भावना मनात पक्की बसली तर आज आसाममध्ये हिंदी भाषिकांचे जे शिरकाण होते, तेवढे नाही, तरी त्या प्रमाणात हिंसक विरोध महाराष्ट्रातूनही होऊ शकतो. अमेरिकेत बाहेरून येणार्‍या लोकांवर बंधने घालायला हवीत म्हणूनच तेथे एचबी वन व्हिसावर बरेच निर्बंध घालण्यात आले. ब्रिटनमध्ये दोन दिवसांपूर्वीच इमिग्रेशन फिमध्ये वाढ करण्यात आली. शिवाय तेथे जाणार्‍यांमागे कागदपत्रांचे लचांडही लावण्यात आले. फ्रान्समध्ये तर स्थानिकांच्या प्रश्नावरून दंगल उसळली होती. त्यामुळे स्थानिकांना डावलण्याचे पडसादही समजून घेतले पाहिजे.

हे सगळे होत असताना या वादाला एक राजकीय पैलूसुद्धा आहे. मराठी मुद्द्यावर स्थापन झालेली शिवसेना आता उत्तर भारतीयांनाही जवळ करू लागली आहे. मुंबई व त्याला लागून असलेल्या ठाणे जिल्ह्यात नुकत्याच झालेल्या मतदारसंघ फेररचनेत मतदारसंघांची संख्या वाढली आहे. सहाजिकच राज्यात सत्ता कुणाची हे या भागावर अवलंबून असणार आहे आणि या भागात अमराठी लोकांची संख्या मोठी आहे, हे पाहता उत्तर भारतीयांना दुखवून चालणार नाही, असे मराठी माणसांच्या हक्कासाठी स्थापन झालेल्या शिवसेनेने ओळखले आणि त्यांनी उत्तर भारतीयांची संमेलने घेऊन उत्तर दिग्विजयाला सुरवात केली. आता शिवसेनेतूनच वेगळ्या झालेल्या राज यांना राजकीय बेस निर्माण करण्यासाठी आधाराची गरज तर आहेच, मराठी अस्मितेच्या मुद्दा हाती घेऊन तो बेस निर्माण करण्याचा त्यांचा प्रयत्न आहे, हे दिसून येतेच आहे. त्याचवेळी मराठी म्हणून स्थापन झालेल्या शिवसेनेच्या मूळ मराठी या राजकीय बेसला सुरूंग लावण्याचाही त्यांचा प्रयत्न आहे. तोच राज यांचा प्रयत्न असू शकतो.

हे सगळे पाहिल्यावर मराठी माणसाला पुढे आणण्यासाठी बिहारी, युपींवाल्यांवर हल्ला करण्यापेक्षा. त्यांना येथून हाकलून देण्यापेक्षा मराठी माणसाच्या उत्थानासाठी ठोस कृती करण्याची गरज आहे. तोडफोड करणे तुलनेने सोपे आहे. राज यांनी हे नवनिर्माण केले तर ते महाराष्ट्रासाठी जास्त फायदेशीर ठरेल.