गुरूवार, 9 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By
Last Updated : बुधवार, 29 मे 2024 (09:55 IST)

गुरमीत राम रहीम आणि डेरा सच्चा सौदाविषयीचे 11 मोठे वाद, जाणून घ्या

डेरा सच्चा सौदाचे प्रमुख गुरमीत सिंह राम रहीमला एका हत्या प्रकरणात पंजाब आणि हरियाणा उच्च न्यायालयाने निर्दोष ठरवलं आहे. या प्रकरणात गुरमीतसह चौघांना निर्दोष ठरवण्यात आलं आहे.
 
राम रहीम सध्या दोन शिष्यांवरील बलात्काराशी संबंधित प्रकरणात 20 वर्षांची तुरुंगवासाची शिक्षा भोगत आहेत. तसेच पत्रकार रामचंद्र छत्रपतिच्या हत्येप्रकरणीही त्याला शिक्षा झाली आहे.
 
हरियाणाच्या पंचकुलामध्ये एका सीबीआय न्यायालयाने या प्रकरणात राम रहीम आणि इतर चौघांना जन्मठेप सुनावली होती. रंजित सिंह हे पूर्वी डेराचे मॅनेजर होते. 2002मध्ये त्यांची हत्या झाली होती.
 
याशिवाय इतरही काही प्रकरणांमुळे गुरमीत सिंह राम रहीम आणि हा डेरा वादात सापडला होता.
 
डेरा सच्चा सौदा हे पंजाब, हरियाणा भागातील मोठं प्रस्थ आहे.
 
शाह मस्ताना यांनी 1948 मध्ये हा डेरा स्थापन केला. 1990 साली बाबा राम रहीम डेरा प्रमुख झाल्यापासून आजवर त्यांच्याशी निगडीत 11 मोठे वाद पाहूया.
 
1. मुलाचे मृत्यू प्रकरण
998 मध्ये बेगू गावातील एक लहान मुलगा डेराच्या जीपखाली आला. या नंतर ग्रामस्थांचा डेराशी वाद झाला.
 
घटनेचे वृत्त प्रसिद्ध केल्याबद्दल वृत्तपत्र प्रतिनिधींना धमकावल्याचे आरोप झाले. त्यानंतर डेरा सच्चा सौदाच्या व्यवस्थापन समिती आणि प्रसारमाध्यमांची पंचायत झाली.
 
यामध्ये डेरा सच्चा सौदाकडून लेखी माफी मागून हे प्रकरण मिटवण्यात आले.
 
2. लैंगिक छळाचा आरोप करणारे निनावी पत्र
मे 2002 मध्ये डेरा सच्चा सौदाच्या एका कथित साध्वीने डेरा प्रमुखावर लैंगिक शोषणाचा आरोप करणारे निनावी पत्र पंतप्रधानांना पाठवले होते.
 
त्याची एक प्रत पंजाब आणि हरियाणा उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायाधीशांनाही पाठवली होती.
 
10 जुलै 2002 रोजी डेरा सच्चा सौदाच्या व्यवस्थापन समितीचे सदस्य असलेल्या कुरुक्षेत्रातील रणजीत सिंह यांची हत्या करण्यात आली होती. रणजीतनेच या डेरामध्ये साध्वी असलेल्या आपल्या बहिणीमार्फत हे निनावी पत्र लिहिले होते, असा संशय डेरा प्रबंधकांना आला होता, म्हणूनच ही हत्या झाली असा आरोप लावण्यात आला होता.
 
24 सप्टेंबर 2002 रोजी उच्च न्यायालयाने साध्वी लैंगिक शोषण प्रकरणात निनावी पत्राची दखल घेत सीबीआयला तपास करण्याचे आदेश दिले होते.
 
3. पत्रकारावर प्राणघातक हल्ला आणि मृत्यू
24 ऑक्टोबर 2002 रोजी सिरसाच्या 'पुरा सच' या दैनिकाचे संपादक रामचंद्र छत्रपती यांच्यावर त्यांच्या घराबाहेर गोळीबार झाला. त्यायाचे आरोप डेरावर लावण्यात आले होते.
 
या घटनेनंतर पत्रकारांनी ठिकठिकाणी आंदोलने केली. रामचंद्र छत्रपती यांचे 21 नोव्हेंबर 2002 रोजी दिल्लीच्या अपोलो हॉस्पिटल मध्ये निधन झाले.
10 नोव्हेंबर 2003 रोजी उच्च न्यायालयाने पत्रकार रामचंद्र छत्रपती आणि रणजीत हत्या प्रकरणांची सुनावणी आयोजित करताना सीबीआयला एफआयआर नोंदवून तपास करण्याचे आदेश दिले होते.
 
डेराच्या याचिकेवर सर्वोच्च न्यायालयाने डिसेंबर 2003 मध्ये तपासाला स्थगिती दिली आणि त्यानंतर नोव्हेंबर 2004 मध्ये दुसरी बाजू ऐकून घेत तपास सुरू ठेवण्याचे आदेश दिले. यानंतर चंदीगडमध्ये हजारो डेरा समर्थकांनी सीबीआय अधिकाऱ्यांविरोधात निदर्शनं केली.
 
4. गुरू गोविंद सिंग यांच्यासारख्या पेहरावावरून वाद
मे 2007 मध्ये पंजाबच्या भटिंडा येथील डेरा सलवतपुरा याठिकाणी डेरा प्रमुख गुरमीत सिंह यांच्या पोशाखावरून वाद निर्माण झाला होता.
 
वृत्तपत्रात छापून आलेल्या छायाचित्रामध्ये दहावे गुरु गोविंद सिंग यांच्या पोशाखाची नक्कल असल्याचं काही शिखांचं म्हणणं होतं. याच्या निषेधार्थ भटिंडा येथे डेरा प्रमुखाच्या पुतळ्याचे दहन करण्यात आले.
 
या दरम्यान आंदोलक शिखांवर डेराप्रेमींनी हल्ला केला. यानंतर उत्तर भारतात अनेक ठिकाणी शीख आणि डेरा समर्थकांमध्ये मारामारी झाली.
 
5. डेरा समर्थकाने गोळी झाडली
7 मे 2007 रोजी सुनाममध्ये निदर्शने करणाऱ्या शिखांवर गोळ्या झाडण्यात आल्या. एका डेराप्रेमीने हे कृत्य केल्याचा आरोप होता.
 
या घटनेत शीख तरुण कोमल सिंगचा मृत्यू झाला. यानंतर शीख संघटनांनी डेरा प्रमुखाच्या अटकेसाठी आंदोलनं केली. पंजाबमध्ये डेरा प्रमुखाच्या भेटीवर बंदी घातली. याप्रकरणी कोणीही माघार घ्यायला तयार नव्हते.
 
18 जून 2007 रोजी भटिंडा न्यायालयाने राजेंद्र सिंह सिद्धूच्या याचिकेवर निकाल देताना डेरा प्रमुखाविरुद्ध अजामीनपात्र वॉरंट काढलं.
 
यानंतर पंजाबच्या बादल सरकारच्या विरोधात डेरा समर्थकांनी ठिकठिकाणी हिंसक निदर्शने केली.
 
6. बंदी असूनही नाव चर्चेत
16 जुलै 2007 रोजी डेरा सच्चा सौदाने प्रशासनाच्या बंदीनंतरही सिरसाच्या घुक्कांवाली गावात रॅली काढली. शिखांनी डेरा प्रमुखाच्या ताफ्याला काळे झेंडे दाखवले.
 
दोन्ही बाजूंनी दगडफेक झाली. डेरा प्रमुखाला मधूनच निघून जावं लागलं.
 
या घटनेच्या काहीच दिवसांनंतर म्हणजेच 24 जुलै 2007 रोजी मल्लेवाला गावातील एका डेरा समर्थकाने त्याच्या बंदुकीने गोळीबार केला, त्यात तीन पोलिस कर्मचाऱ्यांसह आठ जण जखमी झाले.
 
त्यानंतर बाबा राम रहीम यांना 'बिग बॉस'ची पण ऑफर आली होती.
 
7. न्यायाधीशांना धमकीचं पत्र
31 जुलै 2007 रोजी सीबीआयने हत्या प्रकरणे आणि साध्वी लैंगिक अत्याचार प्रकरणाचा तपास पूर्ण केला आणि न्यायालयात चार्जशीट दाखल केली. सीबीआयने डेरा प्रमुख गुरमीत सिंहला तिन्ही प्रकरणांमध्ये मुख्य आरोपी बनवले.
 
न्यायालयाने डेरा प्रमुखांना 31 ऑगस्टपर्यंत न्यायालयात हजर राहण्याचे आदेश दिले. दरम्यान, सीबीआयच्या विशेष न्यायाधीशांना धमकीचे पत्र मिळाल्याने त्यांची सुरक्षा वाढवावी लागली.
 
8. डेराचे माजी व्यवस्थापक बेपत्ता झाल्याचा आरोप
2010 मध्ये डेराचे माजी व्यवस्थापक फकीर चंद बेपत्ता झाल्याची याचिका उच्च न्यायालयात दाखल करण्यात आली होती. ही याचिका डेराचे माजी व्यवस्थापक साधू राम कुमार बिश्नोई यांनी केली होती. बिश्नोईचा आरोप होता की डेरा प्रमुखाच्या सांगण्यावरून फकीर चंदची हत्या करण्यात आली होती.
 
या प्रकरणातही उच्च न्यायालयाने सीबीआय चौकशीचे आदेश दिले. यानंतर हरियाणा, पंजाब आणि राजस्थानमध्ये डेराप्रेमींनी सरकारी मालमत्तेचे नुकसान केले आणि बसेस जाळल्या.
 
मात्र, तपासादरम्यान पुरावे गोळा करू न शकल्याने सीबीआयने क्लोजर रिपोर्ट दाखल केला. बिश्नोई यांनी या क्लोजरला उच्च न्यायालयात आव्हान दिले.
 
9. गुरुद्वाऱ्यावर हल्ला
डिसेंबर 2012 मध्ये सिरसा भागात डेरा समर्थक आणि शिख समुदाय पुन्हा एकदा आमनसामने आले.
 
या ठिकाणी डेरा समर्थकांनी गुरुद्वाऱ्यावर हल्ला करून, शिखांच्या वाहनांची जाळपोळ केल्याचे आरोप होते.
 
परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी कर्फ्यु लावावा लागला. अनेक डेरा समर्थकांवर गुन्हे दाखल झाले होते.
 
10. डेराच्या साधूंना नपुंसक बनवल्याचा आरोप
फतेहाबाद जिल्ह्यातील तोहाना येथील रहिवासी हंसराज चौहान यांनी 17 जुलै 2012 रोजी डेरा सच्चा सौदा प्रमुखावर डेराच्या 400 साधूंना नपुंसक बनवल्याचा आरोप करत उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती.
 
रामचंद्र हत्याकांडातील आरोपी निर्मल आणि कुलदीप हे देखील डेरा सच्चा सौदाचे नपुंसक साधू असल्याचे चौहान म्हणाले होते. हत्या प्रकरणात तुरुंगात असलेल्या डेराच्या साधूंची चौकशी करण्याचे आदेश न्यायालयाने दिले.
 
यामध्ये त्यांनी आपण नपुंसक असल्याचे कबूल केले पण आपण नपुंसक स्वतःच्या इच्छेने बनल्याचं त्यांनी सांगितलं. आता हे प्रकरण न्यायालयात प्रलंबित आहे.
 
11. कॉमेडियन किकू शारदाला अटक
गुरमीत राम रहीम सिंगची नक्कल केल्याप्रकरणी हरियाणा पोलिसांनी 13 जानेवारी 2016 रोजी कॉमेडियन किकू शारदाला अटक केली होती. राम रहीमच्या समर्थकांनी धार्मिक भावना दुखावल्याप्रकरणी किकूवर गुन्हा दाखल केला होता.
 
31 डिसेंबर 2015 रोजी हा गुन्हा दाखल झाला होता. किकूने आपल्या ट्विटमध्ये याप्रकरणी माफीही मागितली होती. ही नक्कल आपण कोणत्याही द्वेषपूर्ण भावनेने केली नसल्याचे त्यांनी सांगितले होते.
 
Published By- Priya Dixit